हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांना सुरळीतपणे परीक्षा देता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी MPSC परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. मात्र हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी अजुन वेळ मिळणार आहे.
कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती . अखेर सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे
महाराष्ट्रात दरवर्षी साधारणपणे 18 ते 20 लाख तरुण एमपीएससीची परीक्षा देतात. मात्र वेगवेगळ्या खात्यांमधील दरवर्षी भरल्या जाणाऱ्या पदांची संख्या असते चार ते पाच हजार. मात्र वेळेत परीक्षा घेऊन वेळेत निकाल लावण्याचं काम राज्य लोकसेवा आयोग कधीच करत नाही. मागील दोन वर्षांपासून आधी राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट राहिल्यानंतर कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून एमपीएससीच्या परीक्षा वेळेत झालेल्याच नाहीत.