‘काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं अशी ओरड करतंच शाह एम्समध्ये दाखल झाले’; काँग्रेसने काढला चिमटा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमित शहा यांना हलका ताप आल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसनं उपरोधिक शब्दात टोला लगावला आहे. “काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं, असा ओरडून सवाल करतंच अमित शाह उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले,” असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर लगावला आहे.

“पंडित जवाहरलाल नेहरू यांना दोष देत १९५६ मध्ये बाळ नरेंद्र यांनी स्थापन केलेल्या दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये काँग्रेसनं ७० वर्षात काय केलं, असा ओरडून प्रश्न विचारतच अमित शाह हे उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांची प्रकृती तातडीनं बरी व्हावी, अशी आम्ही प्रार्थना करतो,” असं सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

२ ऑगस्टला आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती अमित शाह यांनी दिली होती. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली, तरी अमित शाह यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नव्हती. पण खबरदारीचा उपाय म्हणून अमित शाह मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. जवळपास २ आठवडे येथे कोरोनावरील उपचार घेतल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती. त्यानंतर शाह यांना सुटी देण्यात आली होती. मात्र, मंगळवारी पुन्हा ताप आणि अंगदुखीचा त्रास जाणवल्यानं एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”