हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेली भेट आणि काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्या सोबतच्या गुप्त भेटीनंतर राज्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी सूचक विधान केले.
भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चुक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल” असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील नरिमन पॉईंट येथे संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्तभेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या कार या एकाच ठिकाणाहून बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान, अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिले आहे.