हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहकार क्षेत्राबाबत चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच इतर सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या मंडळींनी सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर आरोप केला. “राज्यात साखर कारखानदारीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रात साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये भेदभाव केला जातो आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे जे साखर कारखाने आहेत त्यांना परीघाबाहेर जाऊन मदत केली जात आहे तर बाकीच्यांना नियम दाखवले जात आहेत,”असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.
दिल्ली येथे सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या शिष्टमंडळाने शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून नोटिशी आल्या आहेत. राज्यातील ज्या साखर कारखान्यांना नोटीसा आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
फडणीस म्हणाले की, सर्वाना अडचणीचा ठरणारा मुद्दा म्हणजे आयकर विभागाची आलेली नोटीस, हा मुद्दा सातत्याने बाहेर येतो आणि कारखानदारांना त्रास होतो. त्यावर काहीतरी उपाय करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त दर दिल्यामुळे जवळजवळ गेले पंधरा ते वीस वर्षांपासून हा मुद्दा बाहेर येतो. सध्यादेखील हा मुद्दा बाहेर आला आहे. यावर कायमस्वरुपी उपाय काढायला हवा अशी अमित शहा यांच्याकडे आमच्या शिष्टमंडळाने मागणी केली आहे.