हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकारावरून भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये “या प्रकरणाची तातडीने दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यांचे म्हणणे प्रत्यक्ष ऐकून घेत त्यांना न्याय द्यावा.”, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.
फडणवीसांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे की, माझी आपल्याला विनंती आहे की, आपण यात तत्काळ लक्ष घालून हस्तक्षेप करावा. या महिला अधिकार्याला आपण स्वत: बोलावून घेऊन त्यांची तक्रार ऐकून घ्यावी आणि त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि तत्काळ त्यावर तोडगा काढून त्या अधिकार्याला न्याय द्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या महिला अधिकार्याची इतकी अवहेलना होऊ नये.
नगर जिल्ह्यातील पारनेर येथील तहसिलदार श्रीमती ज्योतीताई देवरे यांनी केलेले अतिशय गंभीर आरोप, आत्महत्येचा इशारा देणारी त्यांची ऑडिओ क्लिप, एकूणच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने हस्तक्षेप करून त्यांना न्याय देण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांना पत्र pic.twitter.com/HfhG2RECMK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 20, 2021
“नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांची एक ऑडियो क्लिप जारी करून अनेक गंभीर आरोप स्थानिक लोकप्रतिनिधीवर आणि वरिष्ठ अधिकार्यांवर केले आहेत. लसीकरणावरून काही कर्मचार्यांना पोलिस अधिकार्यांच्या समोर मारहाण करणे, अश्लील शिविगाळ करणे, महिला कर्मचार्यांना मारण्यासाठी महिला पोलिसांना बोलाविण्यास सांगणे यातून महिला अधिकार्यांचे खच्चीकरण करणे, असे अनेक गंभीर आरोप त्यांनी केले असल्याचीही माहिती फडणवीसांनी पत्रात दिली आहे.