विरोधीपक्षनेते फडणवीस आणि मंत्री सामंत यांच्या भेटीवरून राजकीय खळबळ ! उदय सामंत यांनी केला खुलासा म्हणाले …

fadanvis & samant
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशात एकीकडं कोरोना परिस्थिती गंभीर असताना दुसरीकडे मात्र विरोधी पक्ष नेते आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे राजकारण चांगलंच रंगात आले आहे. नुकतेच राज्यात येऊन गेलेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या पाहणी दौऱ्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाल्याचा दावा भाजप नेते निलेश राणे यांनी केला. याबाबतचे वृत्त काही माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी हे वृत्त आता फेटाळून लावले आहे.

याबाबत माहिती देताना उदय सामंत यांनी म्हटलं की, “20 मे 2019 रोजी रत्नागिरी शहरातील शासकीय विश्रामगृहात मी दुपारी एक वाजता चक्रीवादळ नुकसानीचा आढावा घेत होतो. त्यामुळे दुपारी दोन वाजता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार प्रसाद लाड हे त्या ठिकाणी पाहणी दौरा आटोपून आले होते. त्यावेळी उदय सामंत आणि भाजपा नेते यांच्यात दोन मिनिटांची सदिच्छा भेट झाली ” असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.

भाजपाचे पदाधिकारी निलेश राणे यांनी भेट गुप्त असल्याचे एका व्हिडिओ द्वारे प्रसिद्ध केले मात्र ही कोणतीच गुप्त भेट नव्हती उघडपणे सर्वांसमोर सदिच्छा भेट झाली यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. तर दुसरीकडं निलेश राणे यांनी ट्विट करून खुलासा केला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,”देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले, रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूम पर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले. प्रसार माध्यमं काय भलतच दाखवत आहेत, कृपया दुरुस्ती करावी”. अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.