सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने समृद्ध करण्यासाठी व पर्यावरणाची बांधिलकी निर्माण व्हावी या हेतूने सातारा वन विभागाच्या वतीने दि. 21 मार्च रोजी जागतिक वन्य दिनानिमित्त नाईट जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या हद्दीत सातशे पाणवठे विकसित करणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
वनविभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प लवकरच सुरू होत असून त्याच्या रंगीत तालमी घेतल्या जात आहेत. यासंदर्भात बोलताना मोहिते पुढे म्हणाले, कास पठार हे जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आलेले पठार आहे. याशिवाय महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, कोयनानगर, जावली, पाटण यासारखे भाग सुनियोजित पद्धतीने वनविभागाच्या हद्दीतून विकसित केल्यास वनपर्यटन आला मोठी संधी आहे. त्यामुळे कास, महाबळेश्वर व कोयनानगर येथे पहिल्या टप्प्यात 21 मार्च पासून नाईट जंगल सफारी सुरू होत आहे. या सफारीमध्ये सुरक्षित नियम पाळून रात्री वन्यजीवांचा अभ्यास करणे तसेच पाणवठा विकसनाचे नियम निश्चित करणे, दुर्मिळ वनौषधी प्राणी व पक्षी यांची स्लाईड शो असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्याला वन पर्यटनामध्ये मोठी संधी आहे. ताडोबा जंगल सफारी च्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातही अशा सफारी विकसित होऊ शकतात. त्याचाच हा एक प्रयत्न असल्याचे महादेव मोहिते यांनी सांगितले उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या माध्यमातून हिंस्त्र श्वापदे पाणी अथवा शिकारीसाठी थेट मानवी वस्तीत येऊ नये, याकरिता वनविभागाच्या हद्दीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तीनशे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे आठशे 700 पाणवठे विकसित करण्यात येणार आहेत. तसेच देवरायांचे विकसन व पाण्याची उपलब्धता व दुर्मिळ जलस्त्रोत शोधणे आणि त्याचे संवर्धन या विविध उपक्रमांसाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 21 मार्च पासून आयोजित नाईट जंगल सफारी करता तयारी सुरू असून ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.