Thursday, February 2, 2023

अन्यथा कासच्या तलावात 26 जानेवारीला घेणार जलसमाधी : ग्रामस्थांचे उपोषण

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
कास तलावाची उंची वाढविण्याच्या कामामुळे शेतजमिनी पाण्याखाली जाणार असल्याच्या कारणाने कास ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना दिले असून, यात पाणीसाठ्यानंतर बाधित होणाऱ्या स्थानिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कास येथील तलावाची उंची वाढविण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. परंतु कास ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे मागण्यांचा विचार न झाल्यास कासच्या धरणात तरूण 26 जानेवारी रोजी जलसमाधी घेणार असल्याचे यावेळी सांगितले.

या तलावासाठी 1860 मध्ये 255 एकर क्षेत्र संपादित करण्यात आले होते. यानंतर सांडव्याच्या कामासाठी पुन्हा 1981 रोजी पाच, तर 2014 मध्ये पुन्हा 35 एकर क्षेत्र संपादित करण्यात आले. याठिकाणच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम सध्या सुरू असून, यामुळे पाणीसाठ्यात 12 फुटाने वाढ होणार आहे. पाणीसाठा वाढल्यानंतर शिल्लक जमिनीत जाण्यासाठीची पायवाट देखील बंद होणार असून, शेतीसह रहिवासाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

निवेदनात शिल्लक जमिनीत जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची, मुलकीपड जागेतील भूमापन क्रमांक 70 मधील जागा गावठाणासाठी देण्याची, पुनर्वसन कायदा लागू करण्याची, बाधितांना पालिकेत नोकरी देण्याची, काससाठी स्वतंत्र पाणी योजना करण्याची, तसेच पूर्णतः बाधित ग्रामस्थांचे गावठाणामध्ये पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार कार्यवाही न झाल्यास ता. 26 जानेवारी रोजी जलसमाधी घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी दिला.