औरंगाबाद – आपल्याला नोटीस न देता थकीत वीजबिलामुळे मीटर काढून नेल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त करत सहाय्यक अभियंत्यास शिवीगाळ केल्याची कथित ऑडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावरून एकच खळबळ उडाली आहे. शिवीगाळीसोबतच लोणीकर यांनी अभियंत्यास आयकर विभागाची धाड टाकण्याची धमकी देखील दिली आहे
हाती आलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरामधील सातारा परिसरात बबनराव लोणीकर यांचा एक बंगला आहे.या ठिकाणचे दोन वर्षांपासूनचे 3 लाख रुपयांचे थकीत वीजबिल आहे. वसुलीसाठी लोणीकर यांच्या घराच्या अनेक चकरा मारल्या तसेच मुलासोबत बोलणे झाले, तरीही बिल भरले नाही,असे महावितरणचे सहाय्यक अभियंता फोनवरून लोणीकर यांना सांगतात. मात्र, नोटीस न देता वीज मीटर कसे काय काढून नेले याचा जाब विचारत लोणीकर यांनी अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ केलेले क्लिपमधून ऐकण्यात येते. परंतु, अभियंता मीटर काढून नेले नाही असे वारंवार सांगतात. यावरही लोणीकर यांनी अभियंत्याला,”तुम्हाला अक्कल पाहिजे ? माज चढला का ? एका मिनिटात घरी पाठवेल,अरे नालायकांनो झोपडपट्ट्या, दलित वस्तीत वीजचोरी होते तेथे जाऊन कारवाई करा”,असे आव्हानही देत आकडे टाकणाऱ्यांची वीज तोड असे आव्हान करून आमच्यासोबत नीट राहायचे,एका मिनिटात सस्पेंड करून टाकेल, अशा धमक्या लोणीकर यांनी फोनवरून अभियंत्यास दिल्या आहेत.
वीज वितरण कंपनीच्या आडून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे. माझे कुठलेही मीटर वीज वितरण कंपनीने काढून नेलेले नाही. त्यामुळे, मी कोणाला फोन लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणावर दिली आहे.