आमचा पाठिंबा भाजपला नव्हे तर नागालँडच्या मुख्यमंत्र्याना; पवारांचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागालँड मध्ये भाजप NDPP सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाठिंबा दिल्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आलं. महाराष्ट्रात भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्र्रवादीने नागालँड मध्ये पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाच विचारलं असता त्यांनी या एकूण सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, नागालँड मध्ये आमचा पाठिंबा हा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे. आम्ही मुख्यमंत्री नेफियू रियो यांच्याबरोबर आहे. नागालँडच एकंदरीत चित्र बघितलं तर त्या राज्यामध्ये स्थैर्य यायला तिथल्या मुख्यमंत्र्यांना आमची मदत होत असेल तर तर ती करावी हा आमचा निर्णय आहे. यामध्ये भाजपचा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

यावेळी शरद पवारांनी मोदींच्या भूमिकेवरही बोट ठेवलं. मेघालय आणि शेजारच्या राज्यांमध्ये ज्या निवडणूक झाल्या त्या निवडणुकीच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दोघेही गेले होते, त्यावेळी त्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यामुळे त्यांचा पराभव करा असं सांगितलं. परंतु निवडणूक झाल्यानंतर भाजपचं त्यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आणि शपथविधीला मोदी सुद्धा उपस्थित राहिले असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला.