कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
ज्यांच्या विरोधात आम्ही मते मागितली होती. त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून सत्तेत बसणे म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार होता. आमच्या मतदारसंघातील आम्ही सुचवलेल्या कामांचेही राष्ट्रवादीच्या आमदार- खासदारांनी उद्घाटन केली, हा हस्तक्षेप ही आम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागला. त्यामुळे आमची गळचेपी उघड- उघड होत होती, असा आरोप शिवसेनेचे शिंदे गटाचे आ. शंभूराज देसाई यांनी केला आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. शंभूराज देसाई यांनी विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व पाटणचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावरही रोख धरला. माझ्या मतदार संघात माझ्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार, विद्यमान खासदार जावून भूमिपूजन, उदघाटने करत होती. सध्या असलेल्या विद्यमान शिवसेनेचे आमदारापेक्षा पडलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्त निधी दिला. उठाव केलेल्या 40 आमदारांपैकी अनेक आमदारांनी चार्ट आकडेवारीसह पक्ष प्रमुखांना दाखवून दिले आहे. बजेटमध्ये जो माझ्या विरोधात 2024 ला उभा राहणार आहे, त्यांना राष्ट्रवादी काॅंग्रेस ताकद देत होती.
2024 ला भाजपा- सेनेचे आमदार वाढवू
पण पक्ष प्रमुखांनी ही आघाडी स्वीकारली. त्यामुळे आमची अडचण झाली. परंतु आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये नामधारीच असे होतो. आमच्या अधिकार वृद्धी संदर्भातही आम्ही बोललो होतो. त्याकडे फारसे गांभीर्याने बघण्यात आले नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही शिवसैनिकांना प्रचंड त्रास झाला सर्व बाबी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने आम्ही उठावाचा निर्णय घेतला. आगामी काळात सातारा जिल्ह्यात 8 पैकी 4 आमदार आहेत, ती संख्या नक्की आम्ही वाढवून दाखवू, असा विश्वासही आ. शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.