सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पाचगणीत कोरोनाचा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठांमध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही बंदच ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत. मात्र, इतर व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा प्रशासनाच्याविरोधात आक्रमक झालेल्या व्यापाऱ्यांनी आज पाचगणी येथे रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी पाचगणी व परिसरात राहणाऱ्या छोट्या व्यापाऱयांनी सोशल डिस्टंगसिंगचे पालन करीत आंदोलन केले. पाचगणी येथील मुख्य चौक परिसरात सकाळी दहा वाजता सर्व दुकानाचे मालक, व्यापारी, कर्मचारी एकत्रित आले. त्यांनी स्वतासोबत आणलेले मागण्यांचे फलक हातामध्ये धरून प्रशासनास करण्याची विनंती केली.
यावेळी व्यापाऱ्यांनी “लॉकडाऊन हटवा व्यापाऱ्यांना हटवा, मत छिनो हमारा कारोबार हमारा भी है घर परिवार, कोरोनाच्या प्रसाराला छोटे व्यापारी जबाबदार कसे?, व्यापारी जगवा रोजगार वाचवा,” अशा घोषवाक्याचे फलक हातामध्ये धरले होते. प्रशासनाने तालुका पातळीवरील कमी असणारा कोरोना संसर्ग विचारत घेऊन पाचगणी पर्यटन स्थळावरील व्यवसायिकांचे उपजीविकेचे साधन लक्षात घेता आर्थिक नुकसान व होणारी उपासमार टाळण्यासाठी पर्यटन नगरीतील बाजारपेठ सुरूकरावी, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांनी केली.