सांगली प्रतिनिधी । कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष व नेते रोहित पाटील यांच्या पाठीशी आहेत. पक्षातील काही मंडळी विरोधात आहेत. त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनी दिली. तर भाजपचे आ.गोपीचंद पडळकर धन्याला खूश करण्यासाठी बेताल वक्तव्ये करत आहेत त्यांनी हत्तीवर भुंकण्यापेक्षा विधायक कामे करावीत, असा टोला देखील पाटील यांनी लगाविला.
ते म्हणाले, कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पॅनेल उभे केले आहे. रोहित पाटील नेतृत्व करत आहेत. राष्ट्रवादीची काही स्थानिक मंडळी विरोधात आहेत. याच्यावरील कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी रोहित पाटील यांच्याबरोबर आहे. पक्षाच्या 13 पैकी 13 जागा निवडून येण्यात कोणतीही अडचण नाही. काही अपप्रचार होत आहे. पण राष्ट्रवादीची सर्व टीम प्रचारात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर समाजिक सलोखा बिघडविण्याचे काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी स्व. आर. आर. पाटील, अनिल बाबर, राजेंद्र देशमुख, खासदार संजयकाका पाटील यांच्यावर टीका केली होती.
त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टीका केली होती. आता पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांविरोधात टीका करत आहेत. केवळ धन्याला खूश करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. त्यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाली आहे. त्यांनी नेत्यांवर आरोप करणे थांबवावे, त्यांच्या वक्तव्याचे आता हसू होत आहे. त्यांच्यावर कोणते संस्कार झाले आहेत. हे सर्वांना दिसत आहे. त्यामुळे त्यांनी हत्तीवर भुंकण्यापेक्षा जनतेची विधायक कामे करावीत म्हणजे भविष्यात त्यांच्या आमदारकीची ओळख राहील, असा टोला अविनाश पाटील यांनी पडळकर यांना लगाविला.