हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Thane Metro । ठाणेकरांचे मेट्रोचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने आज महत्वपूर्ण पाऊल पडले. मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो मार्ग 4 (वडाळा–कासारवडवली) आणि 4 अ (कासारवडवली–गायमुख) या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ केला. ठाणे मेट्रोसाठी एकनाथ शिंदे यांनी खूप प्रयत्न केले, त्यामुळे मी आज एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंचं कौतुक केलं.
मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ एकत्र मिळून सुमारे 35 किलोमीटर लांबीचा आहे. यावर एकूण 32 स्थानकं प्रस्तावित आहेत. आज मेट्रोच्या ट्रायल वेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रो मार्ग 4 आणि 4 अ हा मार्ग अत्यंत महत्वाचा असून आज आम्ही या रूटचे टेस्टिंग करत आहोत. या रूटची लांबी जवळपास 35 किलोमीटर आहे. याठिकाणी ८ डब्ब्यांची मेट्रो धावणार आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या भागांतील वाहतूक या मेट्रोमुळे सुलभ होईल. त्यादृष्टीने हा महामार्ग अतिशय महत्वाचा राहणार आहे. त्यामुळे हा देशातला सर्वात लांब मार्ग होईल. ठाणे मेट्रोतून (Thane Metro) दररोज २१ लाख ठाणेकर प्रवास करू शकतील. या मेट्रोमार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 ते 75 टक्के कमी होणार आहे. तसेच एलिव्हेटेड मार्ग असल्याने रस्त्यावरील वाहतूक देखील कमी होईल, असे फडणवीसांनी म्हटले. मी खास करून एकनाथ शिंदे यांचं यावेळी अभिनंदन करतो कारण त्यांनी ठाणे मेट्रो साठी खूप प्रयत्न केले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार? Thane Metro
१) कॅडबरी
२) माजीवाडा
३) कपूरबावडी
४) मानपाडा
५) टिकुजी-नी-वाडी
६) डोंगरी पाडा
७) विजय गार्डन
८) कासरवाडावली
९) गोवानिवाडा
१०) गायमुख
शिंदेंचं महाविकास आघाडीवर खापर –
दरम्यान, ठाण्याला उशिरा मेट्रो (Thane Metro) मिळाल्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर खापर फोडलं. मला ठाणे मेट्रोकरिता आंदोलन करावं लागलं होते. यापूर्वी पिंपरी चिंचवडला मेट्रो मिळाली, परंतु ठाण्याला मेट्रो नाकारण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने ठाणे मेट्रोच्या कामाला ब्रेक लावला… त्यामुळे ठाणे मेट्रोच्या कामाला उशीर तर झालाच याशिवाय तिचा खर्चही वाढला असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.










