Friday, January 2, 2026
Home Blog Page 3012

Petrol Price : पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर, तुमच्या शहरातील किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी मालकीची तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. सध्या इंधनाच्या दरात आजही बदल करण्यात आलेला नाही. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आज पेट्रोलचा दर 109.98 रुपये प्रति लीटर आहे, तर डिझेल 94.14 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही.

झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक लिटर पेट्रोल 98.52 रुपये दराने विकले जात आहे. त्याच वेळी, डिझेलचा दर 91.56 रुपये प्रति लिटर आहे. झारखंड सरकारने जाहीर केले आहे की, 26 जानेवारी 2022 पासून, मोटरसायकलस्वार आणि स्कूटर स्वारांना प्रति लिटर 25 रुपये कमी दराने पेट्रोल मिळेल.

पेट्रोल डिझेलची किंमत
>> दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर आहे.
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर आहे.
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर आहे.
>> श्रीगंगानगर पेट्रोल 114.01 रुपये आणि डिझेल 98.39 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता किंमत बदलते
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

अशा प्रकारे तुम्ही आजच्या नवीन किंमती जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर आणि 9223112222 या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

स्मार्ट बसचा एसटीसोबतचा करार मनपा करणार रद्द

smart city bus

औरंगाबाद – शहर बससाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने एसटी महामंडळासोबत केलेल्या कराराचा फेर विचार केला जाणार आहे. शहर बसला पुढील वर्षात स्वतंत्र करू, असे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल सांगितले. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाने घेतला होता. त्यानुसार टाटा कंपनीकडून 100 बस खरेदी करण्यात आल्या. बस सेवा चालविण्यासाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधी सामंजस्य करार 2018 मध्ये करण्यात आला आहे.

तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. महापालिकेने यापूर्वी खासगी कंत्राटदारामार्फत शहर बससेवा सुरू केली होती; पण ती चार वर्षातच बंद पडली. हा अनुभव लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून कर्मचारी घेण्यासाठी करार करण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी 2019 पासून शहर बससेवा सुरू झाली. दरम्यान, काही महिन्यांपासून एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. शहर बससेवा सध्या बंदच आहे. यासंदर्भात प्रशासक पांडेय यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले नव्या वर्षात शहर बस स्वतंत्र केली जाईल. महामंडळ सध्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडचणीत आहे. त्याचा फटका शहर बसला बसला आहे. त्यामुळे शहर बससाठी स्वतंत्र कर्मचारी घेण्याचे नियोजन आहे. येत्या वर्षभरात सामंजस्य कराराचा फेर आढावा घेतला जाईल.

30 इलेक्ट्रिक बस घेणार –
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार शहर बसच्या ताफ्यात 30 इलेक्ट्रिक बस येतील. यातील पाच बस पर्यटनमार्गावर धावतील, 20 बस मार्चपर्यंत येतील. असे पांडेय यांनी नमूद केले. तसेच पाच इलेक्ट्रिक कार 26 जानेवारीपर्यंत खरेदी केल्या जाणार आहेत.

सातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नव्या वर्षात नवा आदेश : आजपासून विवाह, सार्वजनिक कार्यक्रमांसह अत्यसंस्कारवरही मर्यादा

shekhar singh

सातारा | राज्य शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्याकरिता नव्याने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्हयाकरिता जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शेखर सिंह यांनी साथरोग अधिनियम, 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 1 जानेवारी 2022 रोजीचे 00.00 वा पासून ते पुढील आदेश होईपर्यंत खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत.

विवाह व विवाहाच्या अनुषांगिक सोहळयांचे बाबतीत, विवाह व त्या अनुषांगिक सोहळे बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, त्यासाठी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

कोणताही मेळावा किंवा कार्यक्रम मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक इत्यादी सर्व प्रकारचे कार्यक्रम, बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मोकळया जागेत असो, याबाबतीत उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल. अंत्यसंस्काराच्या बाबतीत, जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 व्यक्तींपुरती मर्यादित असेल.

जिल्हयातील पर्यटन स्थळे, मोकळी मैदाने अथवा जास्त गर्दी होणारी ठिकाणे तसेच लोकांच्या मोठ्या गर्दीला आकर्षित करणारी इतर ठिकाणे याबाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे, या कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या दि.24 डिसेंबर २०२१ अन्वये आवश्यकतेनुसार फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करु शकतात.

या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित केलेल्या व अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोविड अनुरूप वर्तनाचे नियम/धोरणे, वरील प्रमाणे असतील आणि त्यामध्ये विशेषरित्या नमूद न केलेले कोविड अनुरूप वर्तनाशी संबंधित असणारे इतर कोणतेही विषय/मुद्दे या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या व अंमलात असलेल्या प्रचलित नियमांनुसार/आदेशांनुसार असतील .

CONTAINMENT ZONE बाबत संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे ज्या ज्या वेळी स्वतंत्र आदेश काढून CONTAINMENT ZONE जाहीर करतील व सदर क्षेत्रामध्ये जे निर्बंध लागू करतील ते आदेश CONTAINMENT ZONE क्षेत्रास लागू राहतील.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

मावस भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

rape

औरंगाबाद – अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच वारंवार अत्याचार करून गर्भवती केले. पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, गोलवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्याच मावस भावाने वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. तिला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी 29 डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडिता ही सात महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला. पीडितेची सात महिन्याची गरोदर असताना घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मावस भावानेच अत्याचार केल्याचे समोर आले.

या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी डी. एन.ए.नमुना घेतला असून तो तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; एकाच दिवशी 8 हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला असून काल एकाच दिवसात तब्बल 8 हजारांहून अधिक रुग्णसंख्येची भर पडली असून तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येची सर्वाधिक वाढ ही मुंबईत असून काल मुंबईत तब्बल 5 हजारांहून अधिक रुग्ण सापडले.

शुक्रवारी ८ हजार ६७ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.११ टक्के एवढा असून, ॲक्टिव्ह रुग्ण २४ हजार ५०९ एवढे आहेत. शुक्रवारी १ हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहता नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने काही कठोर निर्बंध राज्यात लावले आहेत. तरीही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता वाढली आहे.

गुंठेवारीला आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद – गुंठेवारी अधिनियमानुसार शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी काल दिला.

राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करत डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून महापालिका गुंठेवारी भागातील मालमत्तांचे प्रस्ताव घेत आहे. गुंठेवारीच्या फाईल तयार करण्यासाठी 52 वास्तुविशारदांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. 1500 चौरस फुटापेक्षा लहान जागेवरील मालमत्ता नियमित करण्यासाठी रेडीरेकनरच्या 50 टक्के शुल्क आकारून बांधकामे नियमित केले जात आहेत. सप्टेंबर महिन्यापासून गुंठेवारीच्या फायली स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत महापालिकेकडे चार हजार 214 फायली आल्या असून, यातील दोन हजार 37 फायली मंजूर करण्यात आल्या आहेत. फायली दाखल करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती. दरम्यान पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुंठेवारीचा आढावा घेतला. त्यात मुदतवाढ देण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार आता 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढ देण्यात येत असल्याचे पांडेय यांनी सांगितले.

373 मालमत्तांना शेवटची संधी –
गुंठेवारी भागात 373 व्यावसायिक मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांनी बेकायदा बांधकामे नियमित करून घ्यावेत, अशा नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. त्यांना ही शेवटची मुदतवाढ असेल, अशा इशारा पांडेय यांनी दिला.

कोरोनानंतर आता फ्लोरोनाचे संकट; पहिला रुग्णही सापडला

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातले असतानाच आता फ्लोरोना नावाचा नवा विषाणू आला आहे. इस्राईल मध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला असून यामुळे पुन्हा एकदा जनतेच्या मनात धडकी भरली आहे. आधीच ओमायक्रोन मुळे तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आता फ्लोरोना मुळे जनतेच्या मनातील धाकधूक वाढली आहे.

इस्त्रायलमध्ये फ्लोरोना व्हायरस चा रुग्ण सापडला असून कोरोना आणि इन्फ्लूएन्झाच्या दुहेरी संक्रमणाचा हा प्रकार असल्याचे इस्त्रायलचे वृत्तपत्र ‘Yediot Ahronot’ म्हटले आहे. या आठवड्यात रॅबिन मेडिकल सेंटरमध्ये मुलाला जन्म देणाऱ्या गर्भवती मातेला या फ्लोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, इस्रायलच्या राष्ट्रीय आरोग्य प्रदात्यांनी शुक्रवारी कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना COVID-19 विरुद्ध चौथी लस देण्यास सुरुवात केली. इस्रायल हा जगातील पहिला आणि सध्या एकमेव देश आहे जिथे कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन बूस्टर डोस दिले जात आहेत. इथल्या  वृद्ध रूग्णांसाठी जेरियाट्रिक सुविधांवरील लस मंजूर केली.

नववर्षाच्या प्रारंभी धक्कादायक : माता वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी 12 भाविकांचा मृत्यू तर 13 जखमी

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 12 यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून 13 यात्रेकरू जखमी झाल्याची घटना आज शनिवारी दि. 1 जानेवारी 2022 रोजी पहाटे 2.45 मिनिटांनी घडल्याचे सांगण्यात येत आहे. नववर्षाच्या सुरूवातीला ही दुःखद घटना घडली असून या घटनेतील मृतांना 2 लाख तर जखमींना 50 हजार रूपयांची मदत दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे.

मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्रिकुटा टेकडीवर असलेल्या मंदिराच्या गर्भगृहाबाहेर ही घटना घडली.  वैष्णो देवी भवनात नवीन वर्षाच्या प्रारंभानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली तेव्हा चेंगराचेंगरी झाली. किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर ही चेंगराचेंगरी झालीय यामध्ये 12 यात्रेकरू ठार आणि किमान 13 जण जखमी झाल्याची पुष्टी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चेंगराचेंगरीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि नित्यानंद राय यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. सर्व जखमींवर श्राइन बोर्डाकडून उपचार केले जातील, असेही राज्यपाल कार्यालयाने जाहीर केले आहे.

भीषण अपघात : कराड-पाटण मार्गावर ओमनी दोनवेळा पलटी, दुचाकीचा चक्काचूर

कराड | कराड -पाटण मार्गावर शुक्रवारी 31 डिसेंबरच्या रात्री साडेदहा वाजता चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. कराड आरटीओ कार्यालय समोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ओमनीने दोन वेळा पलटी घेतली. तर दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.

पाटणकडून कराडकडे जाणारी चारचाकी ओमनी क्रमांक (एम एच- 12-ए एन-84 90) व कराडकडून पाटण मार्गाकडे येणारी दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. दुचाकीवरील जखमी हे सुपने येथील ऊसतोड मजूर असल्याचे प्राथमिक माहितीनुसार समजत आहे.

दोन्ही वाहनांच्या धडकेचा आवाज मोठा झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. कराडच्या आरटीओ कार्यालय समोर झालेल्या या अपघातात रस्त्यावरती काचांचा थर पडलेला होता.

विजयनगर व सुपने गावच्यामध्ये आरटीओ कार्यालयासमोर हा अपघात झाला आहे. या अपघातात ओमनी गाडीचा चालका कडील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुचाकीचा पुढील सर्व भाग तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. दुचाकी गाडीच्या नंबर प्लेटचा चक्काचूर झाला. दुचाकीवरील गंभीर जखमी चालकांना कराडला उपचारासाठी नेण्यात आले आहे. घटनास्थळी कराड शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी धाव घेवून माहिती घेतली.

कंटेनर- कारच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा तर एकाच कुटुंबातील 4 जण ठार

accident

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अपघाताच्या घटना वाढतच आहेत. अशातच आज उस्मानाबाद येथून लातूरकडे निघालेल्या लातुरातील पाडे कुटुंबावर काळाने घात घाला घातला असून, समोरुन येणाऱ्या कंटेनरवर कार धडकल्याने झालेल्या भीषण अपघात चार जण जागीच ठार झाले. हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला. हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय 70), उमेश मुरलीधर पाडे (वय 50), सविता उमेश पाडे (वय 45) आणि प्रतिक उमेश पाडे (वय 23) असे मृतांची नावे आहेत.

लातूर येथील प्रकाशनगर येथे राहणारे पाडे कुटुंबीय काही कामानिमित्त कारने (एम.एच. 24 ए.ए. 8055) बाहेरगावी गेले होते. दरम्यान, काम आटोपल्यानंतर ते लातूरच्या दिशेने निघाले असताना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भडाचीवाडी येथे समोरून येणाऱ्या कंटेनरवर नियंत्रण सुटल्याने पाडे यांची कार कंटेनरखाली घुसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच उस्मानाबाद ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोहेका. एस.एस. कट्टे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने मृतांना बाहेर काढून येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी दाखल केले.या आपघाताची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

मृतांत एकाच कुटुंबातील आई,पती-पत्नी व मुलगा ठार –
या भीषण अपघातात हिरकणाबाई मुरलीधर पाडे (वय 70), उमेश मुरलीधर पाडे (वय 50), सविता उमेश पाडे (वय 45) आणि मुलगा प्रतिक उमेश पाडे (वय 23, सर्व रा. प्रकाश नगर लातूर) यांचा समावेश आहे. हृदय पिळवटून टाकणारे टाकणाऱ्या आपघाताने पाडे कुटुंबावर घालाच घातला आहे.