Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5684

धोक्याची घंटा! दिल्लीत ३१ जुलैपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या साडे पाच लाख होईल- मनिष सिसोदिया

नवी दिल्ली । राजधानी दिल्लीला पुढच्या काळात कोरोनामुळे भयंकर स्थितीला समोर जावं लागू शकते. दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडे पाच लाख कोरोना रुग्ण होतील, असा गंभीर इशारा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिला आहे. दिल्लीत सामूहिक संसर्ग नाही, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. परंतु, दिल्लीत सामूहिक संसर्गला सुरुवात झाली आहे, असं दिल्ली सरकारचं म्हणणं असल्याचं सिसोदिया म्हणाले. त्यामुळं १५ जूनपर्यंत दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या ही ४४ हजारापर्यंत जाऊ शकते. हा आकडा ३० जूनपर्यंत वाढून १ लाखपर्यंत जाऊ शकतो. आणि १५ जुलैपर्यंत दिल्लीत करोनाचे सव्वा लाख रुग्ण असतील. तर ३१ जुलैपर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर जाईल, असंही सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार झाले पाहिजे. पण दिल्ली सरकारचा हा निर्णय नायब राज्यपालांनी रद्द केला. यामुळे दिल्लीकरांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. आम्ही राज्यपाल अनिल बैजल यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह केला. पण त्यांनी नकार दिला, असं सिसोदिया यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे दिल्लीकरांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. दिलीत गेल्या २४ तासांत ३७०० जणांची कोरोना चाचणी केली गेली. त्यात १००७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. म्हणजेच एकूण चाचण्यांपैकी २७ टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळलेत. गेल्या आठवड्यात हा दर २६ टक्के इतका होता. चाचणी केल्यावर बहुतेक नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. यामुळे दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिल्ली सोमवारी कोरोना चाचणीत २७ टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यानुसार दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही ३० हजारांवरजवळ पोहोचली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

धक्कादायक! यूट्यूबवरून बंदूक चालवणे शिकून महिलेनं केली पतीच्या गर्लफ्रेंडची हत्या

मुरादाबाद । एका महिलेनं पतीच्या प्रेयसीवर गोळ्या झाडून तिची हत्या केली. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. ही महिला यूट्यूबवरून बंदूक चालवायला शिकल्याचं समोर आलं आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मृत तरुणी गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. मुरादाबादमधील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या परिसरात ही खळबळजनक घटना घडली. आणखी एक

पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यानगरमधील रहिवासी मुहम्मद जफर यानं शबानाशी लग्न केलं होतं. त्यांना पाच मुलं आहेत. पतीचे दुसऱ्या तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचं शबानाला दीड वर्षांपूर्वी कळलं. तिनं अनेकदा जफरला त्या तरुणीशी संबंध तोडायला सांगितलं होतं. मात्र, त्यानं तसं केलं नाही. काही दिवसांपूर्वी तरुणी गर्भवती असल्याचं शबानाला समजलं. त्यामुळं शबाना अधिकच संतापली होती.

‘काही दिवसांपूर्वी घरात चोरी झाली होती. त्यानंतर पतीनं बंदूक आणून दिली. मात्र, तिनं तरुणीला संपवण्याचा प्लान केला. त्यासाठी यूट्यूबवरून ती चालवायला शिकली. नेम चुकू नये यासाठी ती बऱ्याच दिवसांपासून गोळीबाराचा सराव करत होती,’ अशी माहिती शबानानं दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. शबानानं तरुणी कुठे राहते हे शोधून काढले. ती तरुणीच्या घरी पोहोचली. तिला घराबाहेर बोलावून तिच्यावर चार गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर ती बंदूक हातात घेऊन परिसरात फिरत राहिली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी शबानाला अटक केली. तरुणीची अनेक नावे होती. तिला काही जण अनेक नावांनी ओळखत होते. ती बिजनौरमधील नूरपूर येथे राहत होती. तरुणीचं लग्नही झालं होतं. पण पतीशी वाद झाल्यानंतर ती वेगळी राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

न्यूझीलंडपेक्षा मुंबईची लोकसंख्या जास्त असल्याचे सांगत ‘या’ कीवी खेळाडूने चाहत्याला दिले धक्कादायक उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वात असे काही क्रिकेटर्स आहेत जे आपल्या मजेदार पोस्टसाठी ओळखले जातात. न्यूझीलंडचा क्रिकेटर जिमी नीशमही बर्‍याचदा अशाच वेगवेगळ्या ट्वीट करत असतो. तसेच आपल्या चाहत्यांना मजेदार उत्तरे देण्यातही तो मागे नाही. पुन्हा एकदा नीशम आपल्या पोस्टमुळे चर्चेत आलेला आहे. खरं तर, न्यूझीलंड हा देश आता कोरोना मुक्त झाला आहे आणि कोरोनाव्हायरसमुक्त झाल्यानंतर अष्टपैलू जिमी नीशमने आपल्या देशवासियांचे अभिनंदन केलेआहे. आपला देश कोरोना मुक्त का झाला हे नीशमने आपल्या ट्विट द्वारे स्पष्ट केले आहे. त्याच्या या ट्विटवर भारतीय चाहत्यांनी कमेंट करताना सांगितले की,आपली लोकसंख्या ४० लाख असल्याचे सांगितले तर न्यूझीलंडपेक्षा मुंबईची लोकसंख्या ही जास्त आहे.

भारतीय चाहत्यांची ही तुलना थोडी विचित्र होती, मात्र हे खरे आहे की मुंबईची लोकसंख्या ही न्यूझीलंडच्या तुलनेत तीनपट आहे. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जगातील अनेक शहरांपैकी मुंबई एक आहे. भारतीय चाहत्यांची ही कमेंट पाहून जिमी नीशम स्वत: ला रोखू शकला नाही आणि त्यानेही मग यावर एक मजेदार उत्तर दिले. नीशमने एक GIF पोस्ट केली, ज्यामध्ये एक माणूस थम्‍स अप करत आहे. तो काय बोलण्याचा प्रयत्न करीत आहे हे सांगण्यासाठी त्याचे हे पोस्ट पुरेसे होते.

https://t.co/66nm45M9Ao pic.twitter.com/5DldZqKS4M— Jimmy Neesham (@JimmyNeesh) June 8, 2020 https://platform.twitter.com/widgets.js

अशी जिंकली लढाई
न्यूझीलंड स्वत: ला कोरोनव्हायरस-मुक्त घोषित करणारा पहिला देश बनला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी नुकतेच जाहीर केले आहे की त्यांचा देश हा लेव्हल -१ च्या सतर्कतेच्या पलीकडे जाईल आणि आता निर्बंध न लावता विवाहसोहळे, अंत्यसंस्कार आणि सार्वजनिक वाहतुकीची तयारी सुरू आहे. नीशम म्हणाला,” कीवी लोकांची खासियत त्यांचे नियोजन, दृढनिश्चय आणि टीम वर्कमुळे त्याचा देश या साथीशी लढा देऊ शकला. न्यूझीलंड इतक्या लवकर कोरोना विषाणूंपासून मुक्त होण्याचे कारण कमी लोकसंख्या असणे हे देखील आहे. न्यूझीलंडची लोकसंख्या ही ५ दशलक्षाहूनही कमी आहे. हेच कारण आहे की तिथे काम करणे अतिशय सुलभ आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

औरंगाबादेत आणखी एका कोरोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन; ४८ तासांतील दुसरी घटना

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहातील दोन कोरोनाबधित आरोपी किलेंअर्क येथील कोविड सेंटर मधून खिडकीचे गज कापून पसार झाल्याच्या घटनेला अवघे 48 तासही उलटत नाही तोच शासकीय घाटी रुग्णालयातील मेडिसिन विभागात आयसीयू मध्ये उपचार घेणाऱ्या 38 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने आज सकाळी 6.45 च्या सुमारास रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे घाटी प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. कैलासनगर भागातिल दादाकोलोनी येथील 38 वर्षीय कोरिणाबधित रुग्णालयातून पळाला आहे.

किलेंअर्क कोविड सेंटर मधून हत्या व फसवणुकीचे गुन्हे असलेले दोन कोरोना बाधित रुग्ण रविवारी रात्री 10.45 पसार झाले होते.या मध्ये यंत्रणेचा हलगर्जीपणा समोर आल्यानंतर एका कारागृह पोलिसाला तातडीने निलंबन करून दोन्ही फरार कोरोना बाधित आरोपिना शोधण्यासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली आहे.तर राज्यातील सर्व चेकपोस्टना अलर्ट करण्यात आले आहे. या घटनेला 48 तासही उलटत नाही तेच आज सकाळी रुग्ण पलायनाची दुसरी घटना शासकीय घाटी रुग्णालयात समोर आली आहे.

शहरातील कैलासनगर दादा कॉलोनी भागातील 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ठ झाल्यापासून काही दिवसांपासून त्या रुग्णावर घाटी रुग्णालयाच्या मेडिसिन विभागातील पहिल्या मजल्यावर असलेल्या आयसीयू विभागात उपचार सुरू होते. आज सकाळी 6.45 वाजेच्या सुमारास कोरोना बाधित रुग्ण हा आयसीयू विभागातून पळाला.तो वॉर्डात दिसत नसल्याने नर्सिंग विभागातील कर्मचाऱ्यानी त्याचा शोध घेतला असता तो दिसून आला नाही. फरार झाल्याची खात्री होताच. रुग्णालय प्रशासनाने या बाबत बेगमपुरा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या घाटी पोलीस चौकी येथे कोरोना बाधित रुग्ण पाळाल्याची तक्रार दिली.त्या नंतर वैधकीय अधीक्षक डॉ.हरबडे, वैधकीय अधिकारी डॉ.कैलास झिने यांनी वॉर्डाची पाहणी करून आढावा घेतला. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे पाळलेल्या कोरोना बधितांचा माग काढण्यात येत आहे. पाळलेला रुग्ण हा मकाईगेट मार्गे बाहेर गेला की मग घाटी च्या मुख्य इन-आऊट गेट कडून पळाला याची दुपारपर्यंत माहिती समोर आली न्हवती.या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

घाटी रुग्णलायातील हलगर्जीपणा

ज्या मेडिसिन विभागात कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहे.त्या इमारती मध्ये फक्त कोरोना बधितांवर उपचार केले जातात. तेथे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, सफाई व इतर कर्मचारी व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही. बाहेर सुरक्षा राक्षकांचा खडा पहारा असतो.तर ज्या ठिकाणी उपचार सुरू होते त्या आयसीयू विभागाचा दरवाजा नेहमी बंद असतो त्यामध्ये मोजकेच रुग्ण आणि डॉक्टर, र्सिंग स्टाफ असतो. बेड वरील कोरोना बाधित रुग्ण आयसीयू मधून बाहेर पडला, तेंव्हा त्या वॉर्डातील डॉक्टर,नर्स स्टाफ यांनी त्या रुग्णाला पाहिले नाही का? पाहिले तर बाहेर जाऊ दिले कसे? का त्या वेळी वॉर्डात कोणीही न्हवते असे प्रश्न उपस्थित होत आहे.या प्रकारामुळे घाटी प्रशासनातिल हलगर्जीपणा समोर आला आहे.

शिफ्टचेंज होण्याच्या 15 मिनिट अगोदर पलायन..

मेडिसिन विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. सकाळी 7 वाजता या सुरक्षा रक्षकांची शिफ्ट चेंज होत असते त्यावेळी रात्रभर कर्तव्य बजावणारे सुरक्षारक्षकांची घरी जाण्यासाठी सामानाची अवराआवर होत असते.या शिफ्ट चेंज च्या कळताच त्या कोरोना बधिताने पलायन केले. बहुधा त्याला वेळ माहीती असावा म्हणूनच त्याने शिफ्टचेंज होण्याची वेळ पालायनासाठी निवडली असावी अशी चर्चा सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

खुलासा! ऑगस्टमध्येच पसरला होता कोरोनाचा संसर्ग; डिसेंबरपर्यंत चीनने लपविली माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिका आणि विशेषत: अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनवर कोरोनाव्हायरस वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला गेला असून चीनने जाणूनबुजून हा संसर्ग इतर देशात पसरु दिल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. तसेच त्याच्याविषयी कुठलाही गांभीर्याचा इशारा देखिल चीनने दिला नाही. आता हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की,’ ऑगस्ट महिन्यातच चीनमध्ये हा संसर्ग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. मात्र, चीनने ३१ डिसेंबर रोजी जगाला कोरोना संसर्गाची माहिती दिली होती.

जगभरात कोरोना विषाणूची लागण सुमारे ७ दशलक्षांहून अधिक लोकांना झाली आहे, तर ४ लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेसह अनेक देश सतत आरोप करीत आहेत की चीन कोरोनाच्या उद्रेकाविषयी सत्य बोलत नाही आणि त्यासंबंधित पुरावे लपवत आहे. मात्र, चीन या सर्व आरोपांचे खंडन करतोय आणि असे सांगतोय की, त्याने डब्ल्यूएचओ आणि इतर एजन्सीसमवेत सर्व माहिती शेअर केलेली आहे. परंतु, हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की,कदाचित हा विषाणू डिसेंबर महिन्यापूर्वीच चीनमध्ये पसरण्यास सुरू झाला होता.

सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने केला दावा
कमर्शियल सॅटेलाइट इमेजरीच्या मदतीने या रिसर्च टीम ने वुहान शहरातील काही छायाचित्रांचा अभ्यास केला आहे. ही छायाचित्रे वर्ष २०१९ ऑगस्ट मधील आहेत. त्यावेळी वुहान शहरातील रुग्णालयांच्या बाहेर मोठ्या संख्येने वाहने दिसून येतात. याआधीच्या महिन्यांत आणि वुहानमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अशी गर्दी केवळ संसर्गामुळेच दिसून आलेली आहे. या अभ्यासानुसार कोविड १९ चा उद्रेक होण्यापूर्वीच चीनमध्ये त्याचा प्रारंभ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हे देखील शक्य असू शकते की बराच काळ चीनला स्वतःलाच याची माहिती नव्हती. मात्र या संशोधनानुसार ऑगस्टपासूनच वुहानच्या पाच मोठ्या रुग्णालयांच्या बाहेर वाहनांची संख्या लक्षणीय होती. परंतु, असेही होऊ शकते की जे रुग्णालयात पोहोचले त्यांना हवामानामुळे खोकला-ताप आणि अतिसाराचा एक रुग्ण मानले गेला. कारण कोरोनाची लक्षणे देखील सामान्यच आहेत आणि डॉक्टरांना याबद्दल माहित मिळाली नसेल.

रिसर्च मुळे खूप मदत मिळेल
या रिसर्चचे नेतृत्व करणारे डॉ. जॉन ब्राउनस्टीन यांचे म्हणणे आहे की, हा पुरावा परिस्थितीजन्य आहे परंतु एका टीव्ही मुलाखतीत ते म्हणाले की,’ या विषाणूचे उद्दीष्ट समजून घेण्यात ही वस्तुस्थिती महत्वाची भूमिका बजावेल’ ते म्हणाले ,’ ऑक्टोबरमध्ये असे काहीतरी घडले होते. स्पष्टपणे, कोरोना विषाणूची लागण होण्यापूर्वीच वुहानमधील रुग्णालयात खूप गर्दी झाली होती. डिसेंबर २०१९ च्या सुरूवातीस चीनने न्यूमोनियासारख्या आजाराबद्दल डब्ल्यूएचओला सांगितले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी चीनने कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाची अधिकृत घोषणा केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आम्ही विना वेतन काम करु म्हणत तरुणीची शिक्षक भरतीची मागणी; रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अनेक दिवस राज्यातील नोकरभरती प्रक्रिया लांबली आहे. निवडणूक आचारसंहिता, राष्ट्रपती राजवट, राज्यावर आलेले संकट आणि सध्या सुरु असणारे कोरोना संकट यामुळे साधारण फेब्रुवारी २०१९ पासून नोकरभरतीची प्रक्रिया या विविध कारणांनी लांबली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महापोर्टल बंद करून सुधारित पद्धतीने महापोर्टल कडचा डाटा दुसऱ्या पोर्टल कडे हस्तांतरित करण्याचे काम सुरु असताना आता त्या प्रक्रियेला आणखी विलंब होत आहे. यामुळे राज्यातील बेरोजगार तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. शिक्षक भरतीची देखील हीच अवस्था आहे. यासंदर्भात रुहीनाझ यांनी त्यांच्या ट्विटरवरून राज्यातील संबंधित मंत्री तसेच व्यवस्थेतील लोकांना मागणी केली आहे. त्याबाबत रोहित पवार यांना केलेल्या ट्विटवर रोहित पवार यांनी उत्तर  दिले आहे.

आम्ही सर्व शिक्षक विना वेतन काम करण्यास तयार आहोत. पण तुम्ही शिक्षक भरती कधी सुरु करणार आहात? असे प्रश्न रुहीनाझ यांनी सातत्याने ट्विटरवरून पाठपुरावा केला आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी यासंदर्भात  पाठपुरावा करू असे म्हंटले आहे. रुहीनाझ यांनी ‘दादा, आपण नेहमीच युवा पिढीचे समस्या जाणून घेऊन ते नक्कीच सोडवतात, आम्ही गेल्या तीन महिन्यांपासून दररोज ट्विट, मेल, करत आहोत त्याकडे लक्ष द्या.आम्हाला आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत,आम्ही विना वेतन काम करू पण सरकारने नोकरी द्या’ असे ट्विट केले होते.

 

या ट्विट ला उत्तर देत रोहित पवार यांनी ‘ताई याकडं माझं बारकाईने लक्ष आहे. एक मात्र खरंय, ज्याप्रमाणे तुम्ही मला ट्विट, मेल पाठवून पाठपुरावा केला तसाच मीही सरकार पातळीवर याचा पाठपुरावा करतोय. शेवटी यश हे पाठपुराव्यानेच मिळत असतं. आपल्या प्रयत्नांनाही यश येईल, अशी अपेक्षा आहे.’  त्यांच्या या ट्विट मुळे शिक्षक भरतीच्या तरुणांना दिलासा मिळाला आहे. पवित्र पोर्टल द्वारे सुरु करण्यात आलेली शिक्षक भरती संचारबंदी मुळे स्थगित करण्यात आली होती. त्यासाठी फार वेळ न घेता लवकरात लवकर भरतीप्रक्रिया सुरु करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

‘बॉयफ्रेंड’ बरोबर पळून जाण्याच्या संशयावरून वडिलांनी आपल्या १४ वर्षाच्या मुलीचा कापला गळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराणमध्ये नुकतेच एक प्रकरण उघडकीस आले आहे, ज्यामध्ये एका पित्याने आपल्याच पोटच्या मुलीचा खून केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपल्या १४ वर्षाच्या मुलीचा शेतातील कापणी करण्यासाठी असलेल्या विळ्याने गळा कापण्यापूर्वी रझा अश्राफी नावाच्या एका शेतकऱ्याने आपल्या वकीलाला (अ‍ॅडव्होकेट) फोन करून सांगितले की,” त्याची मुलगी, रोमिना आपल्या २९ वर्षीय प्रियकरासह पळून जाऊन आपल्या कुटुंबाची बदनामी करणार आहे. त्याने वकिलाला विचारले की, “जर त्याने तिला मारले तर त्याला काय शिक्षा मिळेल?”

अशरफीच्या नातेवाईकांनी एका इराणी वृत्तपत्राला सांगितले की, मुलीचा एक पालक म्हणून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होणार नाही, मात्र त्यांना ३ ते १० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकते, असे वकिलाने त्याला आश्वासन दिले आहे.

वडिलांनी बेडरूममध्ये जाऊन मुलीचा गळा कापला
तीन आठवड्यांनंतर,या ३७ वर्षीय शेतकरी असलेल्या अशरफीने मुलीच्या बेडरूममध्ये प्रवेश केला, जिथे ती झोपली होती आणि तिचा गळा कापला.

उत्तर इराणच्या हिरव्यागार टेकड्यांच्या एका छोट्याशा गावात गेल्या महिन्यात झालेल्या या तथाकथित ऑनर किलिंगमुळे संपूर्ण देश हादरला आहे आणि महिला व बालकांच्या हक्क संरक्षणासाठी देशातील सामाजिक, धार्मिक आणि कायदेशीर यंत्रणा अपयशी ठरल्याबद्दल देशभर चर्चा होते आहे.

घटनेनंतर सोशल मीडियावर #MeToo मोहीम सुरू झाली
यामुळे महिलांसाठी सोशल मीडियावर ‘#MeToo मोहीम’ देखील सुरू झाली आहे ज्यामध्ये सामान्यतः पुरुष नातेवाईकांकडून होणार्‍या अत्याचाराखाली दडपल्या गेलेल्या आणि कधीही वाच्यता ना होणारी प्रकरणे उघडकीस आणली जातात.

तेहरानमधील दोन मुलांची असलेल्या ४९ वर्षीय मीनू म्हणाली की, तिच्या नवऱ्याने तिच्या १७ वर्षाच्या मुलीला मारहाण केली होती जेव्हा एका पुरुष मित्रासह रस्त्यावर दिसली होती.

महिला स्वतःशी संबंधित हिंसाचाराच्या गोष्टी सांगत आहेत
पीएचडी फिलॉसॉफीची विद्यार्थिनी असलेली हन्नेह रजाबीने ट्विट केले की, तिच्या वडिलांनी एकदा तिला बेल्टने मारहाण केली होती आणि तिला काही आठवडे शाळेत जाऊ दिले नाही का तर ती शाळेतुन घरी बसने येण्याऐवजी आईस्क्रीम खाण्यासाठी घरी चालत आली. इतरही अनेक महिलांनी बलात्कार, शारीरिक आणि भावनिक अत्याचार तसेच सुरक्षिततेच्या शोधात घरातून पळून जाण्याच्या गोष्टी शेअर केल्या.

इराणमध्ये स्त्रियांची परिस्थिती तुलनात्मकदृष्ट्या चांगली आहे
किमिया अब्दुल्लाझादेह यांनी ट्विट केले की, “इथे हजारो अशा रोमिना आहेत ज्यांकडे या देशात कोणतीही सुरक्षा नाही.” तसे पाहायला गेले तर इराणमधील महिलांची स्थिती हि मध्य पूर्व आशियातील इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगली आहे.

इराणी महिला वकील, डॉक्टर, वैमानिक, चित्रपट दिग्दर्शक आणि ट्रक चालक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे विद्यापीठाच्या ६०% जागा आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या संख्या देखील ५०% आहे. त्या निवडणुका लढवू शकतात आणि त्या संसदेत आणि मंत्रिमंडळातही पदे देखील भूषवू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिंताजनक! देशात मागील २४ तासात ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशची वाटचाल लॉकडाऊनकडून अनलॉक होण्याच्या दिशेने होत असताना कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील 24 तासांत 9987 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 331 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 598 वर पोहोचली आहे.

तर दिलासा देणारी एकमेव बाब म्हणजे मागील 24 तासांत सुमारे 5 हजार लोक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 29 हजार 214 झाली आहे. सध्या देशात 1 लाख 29 हजार 917 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 41 हजार 682 लोकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली असून आतापर्यंत 49 लाख 16 हजार 116 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 88 हजारांच्या पुढे गेली आहे तर 3169 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2553 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 109 लोकांचा मृत्यू झाला. तर 40 हजार 975 लोकं आतापर्यंत बरे झाले आहेत. राज्यात आता 44 हजार 374 रुग्ण उपचार घेत आहेत.

दिल्लीमध्ये सोमवारी एक हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढले तर 17 लोकांचा मृत्यू झाला. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालाच्या आधारे, 30 मे ते 6 जून या कालावधीत 62 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची उशिरा नोंद झाली आहे. एकूण रूग्णांची संख्या ३० हजारांच्या जवळपास असून 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या 33 हजार 229 वर गेली असून 286 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील रूग्णांची एकूण संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 1249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत येथे 480 रुग्णांची वाढ झाली असून 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

विद्यार्थी संघटनांची राज्यपालांकडे भेटीची मागणी; भाजपाच्या प्रत्येक नेत्याला भेटणारे राज्यपाल विद्यार्थ्यांना भेटणार का?

पुणे | राज्यात करोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने शेवटच्या वर्षांच्या परीक्षा सोडून बाकी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात भर टाकून राज्य सरकारने शेवटच्या वर्षाच्याही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत रद्द केल्या.

मात्र या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता न देता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील असे सरकारला पत्र लिहून कळविले आहे. राज्यपालांच्या या भूमिकेला विद्यार्थी संघटना व विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला असून, आमच्या आरोग्याची जबाबदारी राज्यपाल घेणार का असा सवाल त्यांच्याकडून विचारला जात आहे. यामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बाबत विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट राज्यपाल कडे मांडण्यासाठी काही विद्यार्थी संघटनांनी राज्यपालांकडे भेट मिळावी म्हणून विनंती केली आहे.

यात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस आकाश झांबरे पाटील , जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव कुणाल पवार, महाराष्ट्र राज्य फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे अध्यक्ष भूषण भदाणे ,जळगाव जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांचा समावेश आहे. विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना कायम उपलब्ध असणारे राज्यपाल विद्यार्थ्यांना भेटणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मीरा भाईंदर महापालिकेच्या शिवसेना नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

मुंबई । कोरोना विषाणूची लागण झालेले मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हरिश्चंद आंमगावकर यांना आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एका आठवड्यापूर्वी आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचार सुरु असताना आंमगावकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या पत्नीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता. तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

हरिश्चंद्र आंमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये दोन टर्म नगरसेवक होते. तर या अगोदर त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते म्हणून होते. तर आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख जात होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”