Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5687

सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच- फडणवीस

मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक चांगलं काम केलं. त्याचं कौतुक झालं पाहिजे’ असं फडणवीस म्हणाले. निसर्ग चक्रीवादळामुळं बाधित झालेल्या कोकणातील नागरिकांना भाजपच्या वतीनं आज मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांना राज्यात सध्या गाजत असलेल्या सोनू सूद प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे वक्तव्य केलं.

‘आमचं सरकार राज्यात जलयुक्त शिवारचं काम करत असताना नाम फाऊंडेशन आणि आमीर खानची पाणी फाऊंडेशनही समांतर काम करत होती. पण आम्ही हेवेदावे ठेवले नाहीत. ते एकप्रकारे सरकारला मदत करत होते. त्यामुळं त्यांना मदत कशी करता येईल हेच आम्ही पाहिलं,’ असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेला दिला. ‘जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणं पूर्णपणे चुकीचं आहे,’ असंही फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत
‘कोरोना संसर्गाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो?, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो?,’ असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. कोरोनाच्या काळात अनेक क्रिकेटपटू व सेलिब्रिटींनी केलंय. पण त्यांचे दान गुप्तच राहिले. कारण हे सर्व लोक प्रायोजित नव्हते. सोनू सूदचा रस्त्यावरचा अभिनय चांगला असला तरी त्याचा दिग्दर्शक राजकीय आहे,’ अशी टीकाही राऊत यांनी केली होती.

कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय,’ अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पाक संघव्यवस्थापनाने माझ्यावर लावला होता बलात्काराचा खोटा आरोप – अख्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  हेलोच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने हेलो लाईव्हवर आज मोठा गौप्यस्फोट केला. २००५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात मला संघातून फक्त अनफिट आहे म्हणून काढले नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आणि पाकिस्तानी कर्णधाराने माझ्यावर बलात्काराचा आरोप लावून मला संघाबाहेर केले होते. आजपर्यंत त्यांनी हे आरोप मागे घेतले नसल्याचेही तो म्हणाला. पाक संघातील खेळाडूच्या एका चुकीमुळे हे खोटे आरोप माझ्यावर करण्यात आले आणि मला संघाबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. मी हा प्रसंग कधीच कोणत्या मीडियामध्ये प्रसिद्ध केला नाही, पण आज मी हा प्रसंग Helo वर सांगतोय असे तो म्हणाला.

पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड आणि संघातील खेळाडू अनेकदा माझ्या मीडियातील प्रसिद्धीमुळे मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे पण मला मिळालेली प्रसिद्धी आणि यश हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. मला त्रास देणारे ते खेळाडू आज नामशेष आहे तर मला आजही संपूर्ण क्रिकेटविश्वात ओळखले जाते. तसेच भारतातही मला कधी द्वेषाला सामोरे जावे लागले नाही. भारतात मला नेहमी प्रेम मिळाले आहे.

या लाईव्हमध्ये शोएबने विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीचे आहे असे सांगितले, शोएबच्या मते विराटला कसोटी , एकदिवसीय सामने मोठ्या प्रमाणात खेळण्याची संधी मिळते. पण पाकिस्तानात आता क्रिकेटची परिस्थिती बेताची आहे. खेळाडूंना म्हणावी तशी संधी उपल्बध होत नाही. आणि पाकिस्तान क्रिकेटच्या तिजोरीत खडखडाट असल्याने खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची जास्त संधी मिळत नाही. त्यामुळे विराट आणि बाबर यांच्यातील तुलना चुकीची आहे. दोन्ही खेळाडू आपआपल्या जागेवर उत्तम कामगिरी करत असून आपआपल्या देशाचे नाव उंचावत आहे.

शोएबने भारतीय कर्णधारांविषयी बोलताना सांगितले की जर आज महेंद्रसिंग धोनीने संघाला नाव मिळवून दिले तर सौरव गांगुलीने भारताच्या संघाचा पाया रचला होता. सौरवने भारतीय संघासाठी त्यावेळी योग्य निर्णय घेतले. आधी पाकिस्तान संघ भारताला सहज हरवून जायचा पण सौरवने तयार केलेल्या भारतीय संघाने पाकिस्तानला अनेकवेळा पराभूत करुन स्व:ताला सिद्ध केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

संपूर्ण देश कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केल्यानंतर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी चक्क केला डान्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगातील अनेक देशांत याच्या संसर्गाचा आकडा हा सातत्याने वाढतोच आहे. एकीकडे जगभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच न्यूझीलंडमधून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोमवारपासून न्यूझीलंडने कोरोनाच्या बचावासाठी देशभरात लावलेले सर्व निर्बंध मागे घेतलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेला शेवटचा रुग्ण बरा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण न्यूझीलंड देश हा कोरोनामुक्त झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आलेली आहे.

आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसून न्यूझीलंड कोरोनामुक्त झालेला आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या बातमी नुसार, न्यूझीलंड या देशाच्या आरोग्य मंत्रालयाकाडून याबाबतची माहिती देण्यात आली. “ आमच्याकडील शेवटचा रुग्ण बरा झाला आणि आम्ही आता कोरोनामुक्त झालो आहोत हे कळल्यानंतर मी आनंदाने आमच्या घरातच थोड्या वेळासाठी डान्स केला”, असं न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन म्हणाल्या. “कोरोनाला आम्ही सध्यातरी न्यूझीलंडमधून हद्दपार केला असल्याचा आम्हांला विश्वास आहे. मात्र देशांतर्गत असलेले निर्बंध हटवण्यात आले असले तरी देशाच्या सीमा या काही काळासाठी बंदच राहतील”, असंही जसिंडा आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे.

देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून असे जाहीर करण्यात आलेले आहे कि,‘न्यूझीलंडमध्ये १७ दिवसांपूर्वी शेवटचा कोरोनाचा रुग्ण समोर आला होता. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत या देशात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही’. जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यन्त १५०० च्या आसपास लोकांना करोनाची लागण झाली होती. त्यापैकी फक्त २२ जणांचाच मृत्यू झाला. भारतात तर सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या हि अडीच लाखांच्या वर गेली आहे. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमधून आलेली ही बातमी नक्कीच दिलासा देणारी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘या’ सरकारी योजनेअंतर्गत श्रमिकांना मिळणार वार्षिक ३६ हजार रुपये पेन्शन; अशी करा नोंदणी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या संकटात सरकारकडून सध्या दोन प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत. आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) आर्थिक पॅकेज आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजना. या दोन्ही योजनांमुळे सर्वसामान्य, गरीब आणि शेतकरी वर्गाला फायदा होणार आहे. सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पेन्शन योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना, असं या योजनेचं नाव आहे. या योजनेद्वारे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. म्हणजे वार्षिक ३६ हजार रुपये मिळणार आहेत.

यांना घेता येईल योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत कचरा वेचणारे, घरकाम करणारे, रिक्षा चालक, धोबी आणि शेतमजुरांना फायदा होणार आहे. त्याशिवाय पेन्शन घेणाऱ्या लाभार्थीचा मृत्यू झाल्यास, मृत्यूनंतर त्याला मिळणाऱ्या पेन्शनची 50 टक्के रक्कम लाभार्थीच्या जीवनसाथीला मिळणार आहे. भारतात जवळपास 42 कोटी लोक असंघटित क्षेत्राशी जोडलेले आहेत. हे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 6 मेपर्यंत जवळपास 64.5 लाख लोकांनी यासाठी नोंदणी केली आहे.

या योजनेबाबत नियम, अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याकरता वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असावी. या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राशी जोडलेला कोणताही कामगार, ज्याचं वय 40 वर्षांहून कमी आहे आणि त्याने आतापर्यंत कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घेतला नसेल असा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचं महिन्याचं वेतन 15000 रुपयांहून अधिक असू नये. 18 व्या वर्षात या योजनेशी जोडल्यास त्या व्यक्तीला 55 रुपये प्रतिमाह जमा करावे लागणार आहेत. तर 29 वर्ष वय असल्यास 100 रुपये आणि 40 वर्षीय कामगाराला 200 रुपये भरावे लागणार आहेत. हा सर्वाधिक प्रिमियम आहे. ही रक्कम वयाच्या 60व्या वर्षापर्यंत जमा करावी लागणार आहे.

नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी
नोंदणी करण्याकरता कामगाराकडे मोबाईल फोन, बचत बँक खातं आणि आधार कार्ड असणं अनिर्वाय आहे. या योजनेसाठी सामान्य सेवा केंद्रावर जाऊन आधार क्रमांक आणि बचत बँक खातं किंवा जन धन खाते क्रमांक स्वत: प्रमाणित करुन नोंदणी करु शकता. एकदा नोंदणी झाल्यानंतर कामगाराची संपूर्ण माहिती ऑनलाईन माध्यमातून सरकारकडे जमा होईल. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 18002676888 वर माहिती घेता येऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अबब.. !! हे काय एकाच IMEI क्रमांकाचे तब्बल १३ हजार फोन;जाणून घ्या काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक मोबाइल फोनची विशिष्ट अशी ओळख ठेवण्यासाठी त्याला ‘IMEI’ हा क्रमांक दिला जातो. ‘इंटरनॅशनल इक्विपमेंट आयडेटिंटी’ अर्थात ‘IMEI’ क्रमांक केवळ मोबाइल फोन साठीच नव्हे तर मोबाइल वापरनाऱ्याच्या ओळखीसाठीही खूप महत्त्वाचा असतो. अनेकदा जत मोबाइल चोरीला गेला असेल किंवा त्याचा गैरवापर झाला असेल तर अशा गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठीही हा IMEI क्रमांक महत्वाचा ठरतो. त्यामुळेच या क्रमांकाला अनन्यसाधारण असे महत्व असते. त्यामुळेच प्रत्येक मोबाइलचा IMEI क्रमांक हा वेगळा असावा असे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. मात्र मेरठमध्ये असेच प्रकरण समोर आले आहे जिथे एकाच IMEI क्रमांकाचे एक दोन नव्हे तर तब्बल १३ हजारहून अधिक मोबाइल आढळून आले आहेत. पोलिसही यामुळे एक्दम चक्रावून गेले आहेत. यासंदर्भातील एक वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं नुकतेच दिलेलं आहे.

गुरुवारी मेरठ पोलिसांनी या IMEI क्रमांका बाबत एक धक्कादायक असा खुलासा केलेला आहे. भारतामध्ये एकाच आयएमईआय क्रमांकाचे तब्बल १३ हजार ५०० मोबाइल कार्यरत असल्याची माहिती मेरठ पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून मोबाइल निर्मिती करणारी कंपनी तसेच त्यांच्या सर्व्हिस सेंटरविरोधात फसणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेरठ शहराचे पोलिस अधीक्षक अखिलेश सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा एक नुकताच घेतलेला मोबाइल फोन काम करत नसल्याने तो त्याने सायबर सेलच्या तज्ज्ञाकडे तपासण्यासाठी दिला आणि त्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी आपल्या यंत्रणेच्या मदतीने या कर्मचाऱ्याच्या मोबाइलचा IMEI क्रमांक तपासून पाहिला असता त्यांना धक्काच बसला. या पोलीस कर्मचाऱ्याकडे असणाऱ्या या फोनच्या IMEI क्रमांकाचे आणखी १३ हजार ५०० फोन कार्यरत असल्याची माहिती समोर आल्याचे सिंग म्हणाले.

मात्र सुरुवातीच्या तपासानुसार मोबाइलची निर्मिती करणाऱ्या या कंपनीच्या चुकीमुळे हे एकाच क्रमांकाचे IMEI असलेले इतके फोन वापरात आल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र इतक्या प्रचंड प्रमाणावर एकाच IMEI क्रमांकाचे फोन वापरले जात असतील आणि जर ते चुकीच्या कामासाठी वापरले गेल्यास त्यांचा तपास करणे अवघड जाणार असल्याचे मत पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. या प्रकरणासाठी एका स्पेशल टीमची स्थापना करण्यात आली असून मोबाइल निर्मिती करणाऱ्या या कंपनीबरोबरच त्यांच्या सर्व्हिस सेंटरविरोधातहि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ प्रश्नाचं सरकारकडे तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही

मुंबई । लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शहरांत होत असलेली गर्दी व गोंधळाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याची टीका मनसेनं केली आहे. ‘पुनश्च हरिओम’ म्हणत राज्यातील ठाकरे सरकारनं लॉकडाऊनमधून हळूहळू बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ जून, ५ जून आणि ८ जून अशा तीन टप्प्यांत एकेका गोष्टीवरचे निर्बंध सरकारनं उठवले आहेत. त्यामुळं आजचा दिवस उजाडताच मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडले.

मुंबई, ठाण्यात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. एरवीच्या तुलनेनं सार्वजनिक वाहने कमी असल्यानं बस थांब्यांवर लोकांचीही गर्दी झाली होती. मॉर्निंग वॉकसाठीही लोक घोळक्यानं बाहेर पडू लागले आहेत. मुंबईसह इतर मोठ्या शहरातील या परिस्थितीला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याचं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

राजू पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला ट्विटरवर प्रश्न विचारला आहे. “तुमचा लॉकडाउनचा एक्झिट प्लान काय ?” असा सवाल राजसाहेबांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही” अशी टीका त्यांनी टि्वटमधून केली आहे. हे टि्वट त्यांनी महाराष्ट्र सीएमओ, ऑफिस ऑफ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टॅग केले आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं घेतलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही सहभागी झाले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी सरकारला लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा ‘एक्झिट प्लान’ काय आहे असा प्रश्न विचारला होता. तसा प्लान तयार करण्याची सूचना राज यांनी केली होती. राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या याच सूचनेची सरकारला आठवण करून दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

जम्मू-काश्मीरमध्ये मागील २४ तासात हिज्बुलच्या कमांडरसह ‘इतक्या’ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर । जम्मू काश्मीर येथे दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण ९ दहशतवाद्यांचा मागील २४ तासात खात्मा करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या ३ कमांडर्सचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां प्रांतात ही कारवाई करण्याच आली असून, दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सोमवारी सकाळी येथे ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. दक्षिण काश्मीरमधील पिंजोरा भागामध्ये संरक्षण दलात कार्यरत कर्मचाऱ्यावर गोळीबार करणाऱ्या या दहशतवाद्यांचा तेथेच खात्मा करण्यात आला. ‘शोपियांमध्ये पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सुरु झालेल्या दहशतवादीविरोधी कारवाईमध्ये एकूण ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला’, अशी माहिती विक्टर फोर्सचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल ए. सेनगुप्ता यांनी एएनआयला दिली.

भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू- काश्मीर पोलीसांना मिळून ही कारवाई केली. गुप्तचर यंत्रणांकडून या भागात दहशतवादी हालचाली पाहिल्या गेल्याची अधिकृत माहिती मिळताच संरक्षण यंत्रणांकडून लागलीच पावलं उचलली गेली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘या’ महिन्यात लागणार CBSE दहावी, बारावीचे निकाल; केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) च्या दहावी, बारावीच्या निकालाची लाखो विद्यार्थी-पालकांना प्रतीक्षा आहे. मात्र सीबीएसई दहावी, बारावीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा अद्याप व्हायच्या आहेत. पण लॉकडाऊनमुळे आधीच उशिराने होत असलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाला लागतील तरी कधी याबाबत विद्यार्थी-पालक प्रश्न विचारत आहेत.

दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक (HRD Minister Ramesh Pokhriyal  Nishank) यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. ‘CBSE बोर्डाच्या निकालांची घोषणा १५ ऑगस्टपर्यंत केली जाऊ शकते. बोर्ड काही दिवसांच्या अंतराने दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करेल ‘ अशी माहिती रमेश पोखरियाल यांनी दिली.

पोखरियाल म्हणाले की १५ ऑगस्ट २०२० पर्यंत CBSE दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील. हे निकाल फेब्रुवारी-मार्च २०२० आणि जुलै २०२० या दोन्ही टप्प्यांत झालेल्या परीक्षा मिळून तयार केला जाईल. तोपर्यन्त CBSE शाळा आणि संबंधित विभाग १ जुलैपासून सुरू होणाऱ्या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, लॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेल्या CBSE दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ जुलै पासून होणार आहेत. १५ जुलैपर्यंत सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण करण्यात येणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

नाभिक संघटनेच्या ‘या’ निर्णयामुळे; राजकीय नेते, अधिकाऱ्यांची होणार पंचाईत

मुंबई । राज्य अनलॉक होत असताना अन्य व्यवसायांप्रमाणेच सलून व्यवसाय सुद्धा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने शासनाला केली आहे. तसेच नाभिक समाजाच्या प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात प्रत्येकी १५ हजार रुपये जमा करावेत, यासोबत सलून व्यावसायिकांना ५० लाखांचे विभा संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करतानाच जोपर्यंत या मागण्यापूर्ण होत नाहीत, तोपर्यंत राज्यातील कोणत्याही नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या दाढी-कटींग करणार नाही, असा संतप्त इशाराच नाभिक समाज संघटनेने दिला आहे.

याचसोबत उद्यापासून राज्यात ‘हत्यारबंद आंदोलना’ची हाकही या संघटनेने दिली आहे.लॉकडाऊनमुळे सलून चालक, मालक आणि कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात राज्य अनलॉक होत असताना सलून व्यवसायाला सुरु करण्याची अजूनही परवानगी शासनाकडून मिळाली नाही आहे. करोना लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम सलून चालक, मालक, कारागिरांनी शासनास सहकार्य करून आपली दुकाने बंद ठेवली. पण शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले व सलून दुकाने उघडण्यास आजही परवानगी नाकारली आहे.

आमच्याकडे उदरनिर्वाहसाठी पारंपारिक नाभिक व्यवसायाशिवाय इतर साधन नाही. ९०% लोकांकडे शेती नाही, दुकानेही भाडेपट्ट्याने घेतली आहेत. त्यामुळे भाडे, वीजबील, कर्ज, घरचा खर्च, औषधांचा खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च इतर उधार उसनवारी आदी खर्च कसा करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी कैफियत नाभिक संघटेननेतील सलून व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही यावरील लस तयार करण्यात यशस्वी होताना दिसते आहे. अमेरिकेत असे म्हटले आहे की, जर सर्व काही ठीक झाले तर ते २ अब्ज लस डोस तयार करू शकतात. जाणून घ्या, लसीच्या बाबतीत कोठे पावले उचलली जातात.

जर आपण भारताबद्दल चर्चा केली तर इथे ग्लोबल लस समिट नुकतेच पार पडले आहे. वर्चुअल मार्गाने आयोजित केलेल्या या शिखर परिषदेत भारतसह ५० देशांचा समावेश होता. यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्या नेतृत्वाखालील या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. त्याअंतर्गत Gavi ला १५ दशलक्ष डॉलर्स देण्याबाबत बोलले गेले. Gavi ही आंतरराष्ट्रीय वॅक्सीन अलायंस आहे जी कोणत्याही साथीच्या रोगावर लस तयार करण्यापासून ते गरजू देशात पोहोचवण्यापर्यंतचे काम करते.

असा विश्वास आहे की Gavi ला देण्यात आलेल्या या आर्थिक पाठबळामुळे भारतात या लसीची किंमत कमी होईल. पंतप्रधान मोदी स्वत: म्हणाले म्हणून की या लसीची किंमत जागतिक पातळीवर देखील कमी करता येऊ शकते.

आता जर आपल्याला लस उत्पादनाच्या पातळीवर यश मिळताना दिसत असेल तर AstraZeneca ही फार्मा कंपनी कोरोना लस तयार करण्यात यशस्वी ठरली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या लसचे नाव आता AZD1222 आहे. फार्मा कंपनीचे मुख्य कार्यकारी पास्कल सोरियट यांनी याबाबत बीबीसी रेडिओशी बोलताना सांगितले. पास्कलच्या मते, सध्या असे मानले जात आहे की या उन्हाळ्याच्या अखेरीस त्यांना याबाबतचा संपूर्ण डेटा मिळेल आणि सप्टेंबर पर्यंत आमच्याकडे यावरची प्रभावी लस आहे की नाही हे हे निर्धारित होईल.

AstraZeneca ला या लसीच्या यशाकडे वाटचाल करताना पाहून, अनेक कंपन्यांनी त्यांच्याबरोबर या लसीचे उत्पादन वाढविण्यासाठी करार केला आहे. त्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देखील आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास कंपनी भारतासह कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही लस पोहोचविण्यास सक्षम असेल.

दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, एप्रिलमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठाने शेकडो लोकांवर या कोरोनाच्या लसीची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणीचा अंतिम टप्पा आता होणार आहे, जो १०,००० लोकांवर असेल. ब्राझीलमध्ये जूनच्या अखेरीस ही चाचणी सुरू होऊ शकते, कारण सध्या कोरोनामुळे तेथे बरेच लोक मृत्युमुखी पडले आहेत.

जर ही चाचणी यशस्वी झाली तर ही फार्मा कंपनी पहिले यूएसला ४०० मिलियन डोस तर यूकेला १०० मिलियन डोस देईल. यासाठी यापूर्वीच एक करार झाला आहे.

ऑस्ट्रेलियामध्येही या लसीचे उत्पादन वेगाने होत आहे. येथे क्वीन्सलँड विद्यापीठ आणि फार्मा कंपनी CSL एकत्र काम करत आहेत. इथल्या लॅबमध्ये या लसीचे चांगले रिपोर्ट्स मिळाले आहेत आणि आता त्याची मानवी चाचणी जुलैमध्ये होणार आहे. क्वीन्सलँड विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार याच्या पहिल्या मानवी चाचणीसाठी १२० जणांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. जर ते यशस्वी झाले तर त्यानंतर सुमारे १००० लोकांवर याची चाचणी घेतली जाईल.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, २ मिलियन कोरोना लसीचे डोस सध्या तयार आहेत आणि जेव्हा शास्त्रज्ञांनी हे सुरक्षित आणि प्रभावी आहे असे म्हटले तेव्हा लगेचच त्याचा वापर करण्यास सुरवात होईल. जपान आणि सिंगापूरमध्येही कोरोना लसीवर वेगाने काम केले जात आहे. असा विश्वास आहे की लवकरच हे दोन्ही देश एखाद्या निर्णयावर पोहोचू शकतील. तसे पहायला गेले तर, केवळ या दोनच देशांमध्येच नाही, तर जगभरातील जवळपास १२० प्रयोगशाळांमध्ये कोरोना लस बनविण्याचे काम चालू आहे. यापैकी १० लसीच्या मानवी चाचण्या देखील घेण्यात आलेल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.