Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5715

भारतीय लष्कराची गुप्त माहिती मिळविण्याचा डाव; दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्याला अटक

नवी दिल्ली । भारतीय सैन्याची गुप्त माहिती मिळविण्याचा आयएसआय चा डाव लष्करी तपास यंत्रणांनी आणि पोलिसांनी उधळून लावला आहे. पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयात व्हिसा अधिकारी म्हणून काम करणारा अबिद हुसेन हे काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने त्याच्या संपर्कात असलेल्या भारतीय व्यक्तीला भारतीय तपास यंत्रणापासून वाचण्यासाठी व्हाट्सअप अप्लिकेशन चा वापर करण्यास सांगितले होते. म्हणजे तो तपास यंत्रणेच्या नजरेत येणार नाही. मात्र भारतीय लष्करी गुप्तचर यंत्रणेने त्याला प्रलोभन देण्यासाठी हा डाव मांडला असल्याची त्याला कल्पनाही नव्हती.

भारतीय गुप्तचर यंत्रणा त्याच्या मागावर आहेत हे त्याला माहीतही नव्हते. अबिदने एका माणसाला हेरले होते. तो लष्करात असल्याचा त्याचा समज होता. लष्करात व्हाट्सअप वापरण्याची परवानगी नाही असे म्हंटल्यावर अबिद हुसेनने त्या व्यक्तीला लपून छपून व्हाट्सअप वापरायला सांगितले. लष्करातील कनिष्ठ अधिकाऱ्यांना पकडून त्यांच्याकडून भारतीय सैन्याच्या हालचाली काय आहेत हे जाणूनघ्यायचा त्याचा प्रयत्न होता. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात [पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयातील ३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

भारतीय लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि दिल्ली पोलिस यांच्या विशेष पथकाने हे ऑपरेशन केले आहे.  भारत आणि पाकिस्तान मध्ये आधीच मोठ्या प्रमाणात तणाव आहेत. या प्रकरणानंतर तो आणखी वाढला आहे. अबिद हुसेन आणि ताहीर खान या दोघांना परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ देश सोडून जाण्याचा सल्ला दिला आहे. अशाचप्रकारे २०१६ साली पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचीही पुन्हा रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणी ऑफिशिअल सिक्रेट कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

१ महिना व्हेंटीलेटरवर राहूनही ५ महिन्यांच्या एका मुलीची कोरोनावर मात जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलमध्ये एका महिन्यापासून व्हेंटिलेटरवर असूनही एका ५ महिन्यांच्या बाळाने कोरोनाव्हायरसवर मात केली. डॉक्टर हा एक चमत्कारच मानत आहेत. येथे काही महिन्यांपूर्वी ५ महिन्यांची एक मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीएनएनच्या वृत्तानुसार, ही मुलगी गेल्या एका महिन्यापासून कोमामध्ये होती असे असूनही ती वाचली गेली.

या बाळाच्या आई-वडिलांनी याला एका चमत्कारापेक्षा कमी मानले नाही. ते म्हणाले आहेत की, एखाद्या नातेवाईकाने भेट देताना या मुलीला संसर्ग झाला असेल. डोम नावाच्या या मुलीला रिओ दि जानेरो प्रो कॉर्डिको रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर जवळपास ५४ दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर तिला आता घरी सोडण्यात आले आहे.

सीएनएनशी बोलताना बाळाच्या वडिलांनी सांगितले की, आपल्या मुलीला श्वास घेण्यात त्रास होत होता. सुरुवातीच्या काळात डॉक्टरांनी हा एक प्रकारचा बॅक्टेरियाचा संसर्ग असल्याचे मानले. मात्र यावर काहीच इलाज चालला नाही आणि तिची प्रकृती अधिकच खराब झाली. यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने तिला दुसर्‍या एका हॉस्पिटलमध्ये हलवले. यावेळी या मुलीची कोरोना टेस्ट घेण्यात आली, ज्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

लॅटिन अमेरिकेत ब्राझील हा देश कोरोना विषाणूचे केंद्र बनला आहे. कोरोनामुळे इथे आतापर्यंत १२ महिन्यांच्या जवळपास २५ मुलांचे मृत्यू झालेले आहेत. देशाच्या आरोग्य विभागाने हा डेटा जाहीर केला आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये आतापर्यंत ५ लाख १४ हजार ८४९ जणांना विषाणूच्या संसर्ग झाल्याची नोंद आहे. या विषाणूमुळे इथे २९ हजार ३०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

डीजीसीएने विमानातील मधल्या सीटसंदर्भातील नियम बदलले,३ जूनपासून लागू होणार नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्व एअरलाइन्स कंपन्यांना आता आपल्या विमानातील मधली सीट प्रवासावेळी रिकामी ठेवावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर सिविल एविएशन रेगुलेटरी डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यात काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्समध्ये एअरलाईन्सला आता आपल्या विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. जर हे शक्य नसेल तर अशा परिस्थितीत मधल्या सीटवरील प्रवाशाला त्याचे संपूर्ण शरीर झाकले जाईल असा गाऊन द्यावा असे सांगण्यात आलेले आहे. मात्र हे गाऊन्स वस्त्रोद्योग मंत्रालयाने मंजूर केलेल्या मानकांनुसार असावे लागतील. एखाद्या प्रवासावेळी एकाच कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्याशिवाय सर्व प्रवाशांना एअरलाइन्सकडून सेफ्टी किट देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्यामध्ये मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझर पाउचचा समावेश असेल. या नवीन गाइडलाइन्स ३ जूनपासून लागू होतील.

प्रत्यक्षात प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सरकार आणि डीजीसीएच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने २६ मे रोजी याविषयी तज्ञांची एक समिती नेमली होती. या समितीने प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित सुरक्षेबाबतच्या प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाला आपल्या काही शिफारशी सुचवल्या. मधली जागा मोकळी सोडण्यासारख्या इतरही अनेक सूचना यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. यामध्ये सर्व प्रवाशांना एअरलाइन्सद्वारे सुरक्षा किट प्रदान करणे हेदेखील समाविष्ट आहे. या किटमध्ये मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझर (पाउच) यांचा समावेश आहे.

>> या शिफारसींमध्ये, कोणतेही गंभीर आरोग्याविषयीचे कारण असल्याशिवाय विमानात कोणत्याही प्रवाश्याला जेवण आणि ड्रिंक्स देण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. अनेक जणांना एकाचवेळी न घेता टप्प्याटप्प्याने प्रवाशांचे बोर्डिंग आणि डी-बोर्डिंग करण्याची शिफारस केली आहे. तसेच विमानातील वातानुकूलन यंत्रणा अशा प्रकारे सेट करावी लागेल की कमीतकमी अंतराने हवा बदलली जाईल.

>> एअरलाइन्सला प्रत्येक प्रवासानंतर आपले विमान स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ट्रांजिट फ्लाइटमध्ये प्रवासी जेव्हा विमानात असतात तेव्हा फक्त रिकाम्या झालेल्या जागांचीच स्वच्छता केली जाईल. दिवसाच्या शेवटी प्रत्येक विमानाला पूर्णपणे स्वच्छ करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत. विमानातील स्वच्छतागृहे पुन्हा पुन्हा स्वच्छ केली जातील याची काळजी घेण्यास सांगितले आहे. एअरलाइन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी केली जावी. या व्यतिरिक्त सर्व केबिन क्रूना पूर्ण गीअर प्रोटेक्टिव्ह सूट देण्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

निसर्ग चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांना धोका? जाणुन घ्य‍ा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात आणि लक्षद्विपजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची भीती होती. हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे जे चक्रीवादळ निर्माण होईल त्याला निसर्ग असे नाव देण्यात आले आहे. सर्वप्रथम हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करेल आणि ३ जूनला ते उत्तर महाराष्ट्रात तसेच गुजरातकडे जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

सध्या हा पट्टा तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आहे त्यामुळे कोणत्याही वेळी चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते असे सांगण्यात आले आहे. अरबी समुद्रातील हा टप्पा आज (सोमवारी) सायंकाळी पूर्ण होईल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. हे वादळ उद्यापर्यंत अधिक तीव्र होईल असेही हवामान खात्याच्या संबंधित विभागाने सांगितले आहे. २ जून ला सकाळी ते उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर आणि उत्तरपूर्वेकडे आणि नंतर उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात किनाऱ्याकडे रायगडमधील हरिहरेश्वर आणि दमनच्या पट्ट्यात वळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हे सर्व काही ३ जूनच्या संध्याकाळपर्यँत घडण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड आणि दमन मधील साधारण २६० किमीचा पट्टा येतो जो देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या घनतेचा आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर,बदलापूर आणि अंबरनाथ या क्षेत्रांचा या पट्ट्यात समावेश आहे. त्यामुळे मुंबईवर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली आहे. दरम्यान नुकसान रोखण्यासाठी एनडीआरएफच्या ९ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.  गृहमंत्री अमित शहा यांनी या टीमसोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भारतीय हवामान खात्याने ३ जूनला या चक्रीवादळाचा वेग १०५-११० किमी प्रति तास एवढा असेल असे सांगितले आहे. यामुळे किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

निसर्ग चक्रीवादळाची भीती: मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या तुकड्या तैनात 

वृत्तसंस्था। अरबी समुद्रात ठिकठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याची माहिती हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिली होती. केरळ किनारपट्टीवरचा कमी दाबाचा पट्टा ज्यावर महाराष्ट्रातील मान्सून अवलंबून होता. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत होता. या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता वाढून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचप्रमाणे गेल्या १०४ वर्षात प्रथमच मागच्या वर्षी अरबी समुद्रात ५ चक्रीवादळे घोंगावल्याचीही माहिती देण्यात आली होती. अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता वाढली असून प्रशासनाकडून त्याच्या व्यवस्थापनाची पूर्वतयारी केली जात आहे. यासाठी मुंबईसह इतर भागात एनडीआरएफच्या ९ टीम तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

अरबी समुद्रातील चक्रीवादळाची स्थिती पाहून या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यातील ३ टीम मुंबईमध्ये, २ टीम पालघर मध्ये आणि उरलेल्या प्रत्येकी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफच्या टीम किनारी प्रदेशात सर्वेक्षण करीत आहेत. या टीम महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन विभागाच्या तसेच हवामान खात्याच्या संपर्कात आहेत. आपत्ती व्यवस्थापन मंडळाने या टिमना दुप्पट आपत्तीला सामोरे जाण्याइतपत प्रशिक्षित करण्यात आले असून त्या सज्ज असल्याचे सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कोळी लोकांना चक्रीवादळाची शक्यता असल्याने समुद्रात कोणतेही साहसी काम करू नका असे आवाहन केले आहे. त्यांनी पुढच्या २-३ दिवसात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे त्यामुळे समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका असे सांगितले आहे. राज्यात कोरोनाचे थैमान सुरु असताना आता अरबी समुद्रातील चक्रीवादळाच्या शक्यतेचा नवा धोका उद्भवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शेतकऱ्यांनसाठी खूषखबर! कर्जफेडीसाठी मिळाला आगस्टपर्यंतचा वाढीव कालावधी 

वृत्तसंस्था। केंद्रात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. या बैठकीत शेती व शेतीशी संबंधित उद्योगांच्या ३ लाखांपर्यंतच्या कर्जफेडीची मुदत ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकरी हिताचे जे निर्णय घेण्यात आले आहेत त्याचा देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे तोमर यांनी सांगितले.

या बैठकीत सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) ५० -८३% वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे ते म्हणाले. चालू वित्तीय वर्षात (२०२०-२१) भाताचे समर्थन मूल्य १८६८ रु प्रति क्विंटल करण्यात आले आहे. ज्वारीचे समर्थन मूल्य २६२० रु प्रति क्विंटल तर बाजरी चे समर्थन मूल्य २१५० रु प्रति क्विंटल करण्यात आले आहे. यासोबतच नाचणी, भुईमूग, मूग, सोयाबीन, तीळ आणि कापसाच्या किमान आधारभूत किंमतीत ५०% वाढ करण्यात आली आहे.

 

यावेळी त्यांनी सरकारने या कठीण परिस्थितीतही शेतकरी आणि गरीब यांच्यावर लक्ष केंद्रित केले असून त्यांच्यासाठी सरकार सदैव कार्यरत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संकटकाळातही शेतकऱ्यांनी अधिक पीक घेतल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मक्याच्या पिकात ५२% वाढ झाली आहे. तसेच शासनाने ९३ मॅट्रिक टन भाताची खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा; शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरु

मुंबई । भाषिक तत्त्वानुसार मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. या भाषेनेच राज्याला सांस्कृतिक, सामाजिक ओळख निर्माण करून दिली आहे. म्हणून या भाषेचे जतन तसेच विकास करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यादृष्टीने राज्य शासनाने राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये किमान इयत्ता ८ वी पर्यंत मराठी भाषा अध्यापन व अध्ययन अनिवार्य व्हावे या दिशेने मराठी भाषा अनिवार्यतेबाबत स्वतंत्र उल्लेख असलेले शासन निर्णय निर्गमित करण्यात आले होते. मराठी भाषेचा वापर करण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई, आय.बी, यासारख्या अभ्यासक्रमांमध्येही मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे.

या अधिनियमानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या राज्य अभ्यासक्रम राबविण्यात येणाऱ्या मराठी, इंग्रजी व इतर माध्यमांच्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारी, अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त शाळा आणि केंद्रीय इतर मंडळांचे उदाहरणार्थ सी.बी.एस.ई, आय.सी.एस.ई, आय.बी, तसेच केंद्रीय व अन्य व्यवस्थापान/मंडळाचे अभ्यासक्रम असलेल्या खाजगी/केंद्रीय शाळांमध्ये इयत्ता १ली ते इयत्ता १०वी साठी अध्यापन व अध्ययनामध्ये मराठी विषय अनिवार्य राहील. आणि तो अनिवार्य करून देण्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची/मंडळाची राहील. राज्याच्या सरकारी, अनुदानित व खाजगी शाळामध्ये ही अंमलबजावणी सुरु राहील.

 

राज्यातील केंद्र शासन कार्यालये, राज्य शासन कार्यालये, न्यायालयीन कामकाज व दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यासाठी शासनाने हा नियम निर्गमित केला आहे.  या मध्ये परदेशातून आलेल्या आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्य अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा अधिनियम २०२० कलम १९ नुसार मराठी विषयामध्ये अंशतः किंवा संपूर्ण सूट देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. शासनाच्या या अधिनियमानुसार आता इतर व्यवस्थपनाच्या शाळांमध्येही ८ वी पर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सातारा जिल्ह्यात दिवसभरात 22 नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या 538 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सकाळी ५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आज दिवसभरात सातारा जिल्ह्यात २२ नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या बोपेगांव ता. वाई येथील रक्त दाबाचा त्रास असलेल्या 85 वर्षीय महिला, सारीचा आजार असलेली गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिला तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पश्चात त्यांच्या घाशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

बाधित रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे –
फलटण तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळे येथील 35 वर्षीय पुरुष.
जावळी तालुकयातील गवडी येथील 52 वर्षीय महिला, काळोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील विंग येथील 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण.
पाटण तालुक्यातील काळेवाडी येथील 21 वर्षीय महिला, नवसरेवाडी येथील 25 व 22 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला.
खटाव तालुक्यातील अंभेरी येथील 3 व 6 वर्षीय बालीका, 29 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला, गोरोशी येथील 72 वर्षीय महिला.
वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक.

१ जूनपासून ‘या’ गोष्टींमध्ये झालेत मोठे बदल; तुमच्या खिशावर पडणार प्रभाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक जून म्हणजेच आजपासून आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. यात रेल्वे, बस, रेशनकार्ड आणि एअरलाइन्सशी संबंधित बदलांचा समावेश आहे. यामध्ये लॉकडाउननंतर आपल्यासाठी बर्‍याच गोष्टी पुन्हा सुरू होत आहेत, तर बर्‍याच गोष्टी या स्वस्त आणि महाग होत आहेत. कोरोनाव्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. आजपासून आपल्या आयुष्यात काय काय बदल होईल आणि त्याचा आपल्या खिशावर काय परिणाम होईल याबद्दल सांगूयात…

१. एक राष्ट्र, एक रेशन कार्ड योजना सुरू केली
आजपासून देशातील २० राज्यांमध्ये ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना राबविण्यात येत आहे. यानंतर या २० राज्यांमधील रेशनकार्डधारक इतर कोणत्याही राज्यातील शासकीय शिधा केंद्रातून रेशन खरेदी करू शकतील. केंद्र सरकारच्या या योजनेमध्ये मोठ्या संख्येने गरीब लोकांना अत्यंत कमी किंमतीत आवश्यक ते धान्य दिले जाते.

२. रेल्वेच्या २०० अतिरिक्त गाड्या धावणार
कोरोनाव्हायरसमुळे सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी भारतीय रेल्वेच्या आजपासून अतिरिक्त २०० गाड्या धावणार आहे. या २०० गाड्या नॉन एसी असतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे १ जूनपासून २०० नॉन एसी गाड्या या आपल्या टाईम टेबलनुसार धावणार आहेत.

३. पेट्रोल महाग होऊ शकते
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे बर्‍याच राज्यांनी आता सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक पुन्हा सुरू केली आहे, ज्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. यापूर्वी अनेक राज्यांनी व्हॅट वाढवून फ्यूल महाग केले होते आणि आता या यादीमध्ये मिझोरम देखील सामील झाले आहे जेथे १ जूनपासून पेट्रोल आणि डिझेल महाग होतील. मिझोरम सरकारने १ जूनपासून पेट्रोलवर अडीच टक्के तर डिझेलवर ५ टक्के व्हॅट वाढविण्याची घोषणा केली असून त्यानंतर राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतील.

४. गोएअर फ्लाइट्स सुरू होतील
बजट कॅरियर गोएअर १ जूनपासून शासकीय सूचना आणि नियमांचे पालन करीत देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी ट्विटरवर जाहीर केले की,२५ मे पासून देशांतर्गत प्रवासी उड्डाणे सुरू होतील, परंतु यासाठी प्रवासी आणि विमान कंपन्यांना काही नियम पाळावे लागतील. गोएअर वगळता एअर इंडियासह इतर सर्व भारतीय विमान कंपन्यांनी शुक्रवारपासून देशांतर्गत उड्डाणांचे बुकिंग सुरू केल्या आहेत.

५. एलपीजीच्या किमती वाढतील
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) च्या किंमतींमध्ये बदल होतो आहे. गेल्या महिन्यात एटीएफ आणि एलपीजीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली होती.

६. महाग गॅस सिलेंडर्स
सर्वसामान्यांना आता मोठा धक्का बसला आहे. देशातील ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी गॅस सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर) च्या अनुदानाशिवाय किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत प्रति सिलेंडर ११.५० रुपयांनी महाग झाली आहे. आता नवीन दर ५९३ रुपयांवर पोहोचले आहेत. इतर शहरांमध्येही आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. कोलकातामध्ये ३१.५० रुपये, मुंबईत ११.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ३७ रुपये महाग झाले आहेत. यापूर्वी मे महिन्यात किंमतीत १६२.५० रुपयांची घट झाली होती. त्याचवेळी १९ किलो सिलिंडरची किंमत ११० रुपयांनी वाढून ११३९.५० रुपये झाली आहे.

७. सुधारित फॉर्म २६ एएस लागू होईल
प्राप्तिकर विभागाने जारी केलेला २६ एएस सुधारित फॉर्म १ जून पासून अंमलात येणार आहे. संबंधित आर्थिक वर्षात वजा केलेल्या करा व्यतिरिक्त अन्य व्यवहाराचे देखील तपशील असतील. आयकर विभागाच्या साइटवर करदाता आपले ‘पॅन’ टाकून हा फॉर्म काढू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘या ‘ १७ वर्षीय पाकिस्तानी गोलंदाजानं विराट कोहलीला दिलं आव्हान म्हणाला,’घाबरत नाही’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम नोंदवले आहेत. यामुळेच जगभरातील गोलंदाजांमध्ये त्याच्याविषयी एकप्रकारची भीती आहे. मात्र, पाकिस्तानचा एक १७ वर्षीय गोलंदाज नसीम शाह म्हणतो की, तो जगातील या पहिल्या क्रमांकाच्या फलंदाजाला अजिबात घाबरत नाही. पाकिस्तानच्या रावळपिंडीचा असणारा हा गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे.

नसीम कोहलीला घाबरत नाही
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा सामना करण्यास मी फार उत्सुक आहे आणि त्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचे या पाकिस्तानी युवा गोलंदाजने सांगितले. तो म्हणाला, ‘अर्थातच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळणे हे खूप विशेष आहे. मला यापूर्वीच सांगितले गेले आहे की हा सामना एखाद्या खेळाडूला हिरो किंवा खलनायक बनवू शकतो. आता दोन्ही संघांमध्ये कमी सामने होत आहेत, अशा परिस्थितीत ते अधिकच विशेष बनते.

कोहलीविरूद्ध गोलंदाजी करण्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, ‘मला आशा आहे की मी भारताविरुद्ध चांगली कामगिरी करीन आणि माझ्या चाहत्यांना मी निराश करणार नाही. मी कोहलीचा आदर करतो पण मला त्याची भीती वाटत नाही. जिथे आपण आपल्या खेळाची पातळी सुधारता तिथे सर्वोत्कृष्ट खेळाडू विरूद्ध चांगली कामगिरी करणे हे नेहमीच आव्हानात्मक असते. मी विराट कोहलीविरुद्ध खेळण्याची वाट पाहत आहे.

नसीमने गेल्या वर्षी पदार्पण केले होते
१७ वर्षीय नसीम शाहने गेल्या वर्षीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने डेव्हिड वॉर्नरला बाद केले आणि या प्रकारात तो त्याचा पहिला बळी ठरला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नसीम शाहने इतिहास रचला. नसीम शाह कसोटी सामन्यात हॅटट्रिक करणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. नसीम शाहने वयाच्या १६ व्या वर्षी हा पराक्रम केला. कसोटीत हॅटट्रिक करणारा पाकिस्तानचा नसीम शाह हा चौथा गोलंदाज ठरला आहे. वसीम अक्रमने कसोटीत २ वेळा हॅटट्रिक केली आहे. त्यांच्याशिवाय अब्दुल रझाक आणि मोहम्मद सामी यांनीही कसोटीत हॅटट्रिक केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.