Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5862

कृषी कर्जाचा व्याजदर शून्य टक्के करा; शरद पवारांची केंद्र सरकारला सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | संपूर्ण जगभरातच हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या देशभरातील घडामोडींचा आढावा शरद पवारांनी यावेळी घेतला. देशातील कोरोनाबधितांचा आकडा वाढत चालला असला तरी प्रशासन सजगतेने काम करत असून येत्या काळात ही परिस्थिती निश्चित नियंत्रणात आणली जाईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. फेसबुक लाईव्हद्वारे आयोजित संवादात शरद पवार बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन करत शरद पवार यांनी आजच्या फेसबुक लाईव्हची सुरुवात केली. यानंतर कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या दुःखद निधनाबाबत शोक व्यक्त करतानाच शरद पवार यांनी त्यांच्याप्रति भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. या दोघांच्या जाण्याने कला क्षेत्राचं मोठं नुकसान झाल्याची भावनाही शरद पवारांनी बोलून दाखवली.

केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांशी असलेल्या समन्वयातून या परिस्थितीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट होत चाललेली असताना यावेळी काय करता येऊ शकतं यासंदर्भातील सुचनांचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलं असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. ६ कोटी ६८ लाख लोकांना धान्याचं वाटप झाल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली. राज्यांत विविध ठिकाणी अडकलेल्या मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मदतीची हेल्पलाईन दिली असून 022-22027990, 022-22023039, 9821107565, 8007902145 या नंबरवर फोन करुन आपल्या समस्या सांगण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं.

येत्या काळात बेरोजगारीची समस्या मोठी असणार असून शेती, व्यापार आणि उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात मूलभूत बदल करावे लागणार असल्याच्या शक्यता शरद पवारांनी बोलून दाखवल्या. शेतकरी हे अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी असणाऱ्या कर्जाचा दर शून्य टक्क्यांवर आणण्याच्या सूचना शरद पवार यांनी यावेळी केल्या. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोककलावंतांना मदत केली जात असल्याची माहिती शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हमधील संवादात दिली. बँकांना सरकारने योग्य ते आदेश देण्याची गरज असून वैद्यकीय क्षेत्राला आवश्यक ती मदत पोहचवण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची विनंतीही केंद्र सरकारला शरद पवार यांनी यावेळी केली.

यावेळी अनेक दर्शकांनी आपले प्रश्न विचारले त्याचीही उत्तरं शरद पवार यांनी दिली. माथाडी कामगारांचा प्रश्न, औद्योगिक क्षेत्र सुरु न झाल्यामुळे अडचणीत आलेले कामगार यांनी यावेळी आपल्या अडचणी बोलून दाखवल्या.

शरद पवारांकडून ऋषी कपूर आणि इरफान खान यांना श्रद्धांजली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लॉकडाऊन काळात फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे लोकांच्या संपर्कात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज इरफान खान आणि ऋषी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दोन अभिनेत्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचं मोठं नुकसान झालं असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली. आपण या दोन्ही कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं सांगत कपूर आणि खान कुटुंबियांना यावेळी शरद पवार यांनी धीर दिला.

सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं गुरुवारी सकाळी वयाच्या ६७ व्या वर्षी कॅन्सरच्या दुर्धर आजाराने निधन झालं. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

२०२० साल हे अनेक धक्कादायक घटनांची मालिका घेऊनच उजाडलं आहे. कोरोना संकटाशी लढत देत सर्वसामान्य भारतीय जगत असताना आधी इरफान खान आणि आता ऋषी कपूर यांची अकाली एक्झिट लोकांना हळहळायला लावून गेली आहे. ऋषी कपूर यांना कॅन्सरने ग्रासले होते आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यामुळेच त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

https://twitter.com/SrBachchan/status/1255709029336322048

रोमँटिक चित्रपटांचा बेताज बादशहा म्हणून ऋषी कपूर यांची अवघ्या भारतीयांना ओळख होती. दिवाना, मेरा नाम जोकर, कर्ज, जमाना, दामिनी, बोल राधा बोल, ओम शांती ओम, अग्निपथ, प्रेमरोग, कपूर अँड सन्स अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. १९८५ ते २०१९ च्या कालावधीत अनेक दर्जेदार चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

https://twitter.com/taapsee/status/1255716163947913217https://twitter.com/HashTagCricket/status/1255716911003860992?s=19

औरंगाबादेत आज पुन्हा १४ जण कोरोना पोझिटिव्ह, एकुण रुग्णसंख्या १४४ वर

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. औरंगाबाद शहर मागील काही दिवसांपासून कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले असून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज औरंगाबादेत कोरोनाचे आणखी १४ नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या १४४ वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सापडलेल्या रुग्णांमध्ये भीमनगर येथील ६, किलेअर्क १, आसिफिया कॉलनी २, नूर कॉलनी १, कैलास नगर १, चिकलठाणा १, सावरकर नगर १, जिल्हा रुग्णालय घाटी मधील १ अशा १४ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या अवघ्या २ दिवसांत तीनपट झाली अाहे. औरंगाबाद कर‍ांसाठी ही धोकेची घंटा असून नागरिकांनी संतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सेलूतील महिलेला कोरोनाची लागण; शहरात तीन दिवसाची संचारबंदी घोषित

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

परभणी जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेल्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे दोन आठवड्या पुर्वी निष्पन्न झाले होते. हा पेशंट आता ठणठणीत बरा झाल्यानंतर, पुन्हा उपचारासाठी बाहेरून आलेल्या सेलू येथील महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे ढग दाटले आहेत. त्यामुळे सदरील रुग्ण राहत असलेला परिसर तीन किलोमीटरपर्यंत सील करत, सेलू शहरांमध्ये तीन दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

सेलू शहरातील ५५ वर्षीय महिला आरोग्य उपचारासाठी औरंगाबाद येथे गेली होती. २७ एप्रिल रोजी सदरील महिला सेलू शहरांमध्ये वापस आली. यावेळी या महिलेची तब्येत खालावल्याने परभणी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले होते. दरम्यान सदरील महिलेचा उपचार करण्यास खासगी डॉक्टरांनी नकार दिला. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणी मध्ये सदरील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग परत खडबडून जागा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या संपर्कामध्ये आतापर्यंत १९ व्यक्ती आल्याची माहिती मिळत आहे. या महिलेने सेलू ते नांदेड दोन रुग्णवाहिकेत द्वारे प्रवास केल्याचेही पुढे आले आहे. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय घेत सेलू शहरातील कोरोना बाधित रुग्ण महिला राहत असलेल्या परिसराला तीन किलोमीटर पर्यंत सील केले आहे. तर सेलू शहरांमध्ये १ मे संध्याकाळी बारा वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.

दरम्यान १६ एप्रिल रोजी जिल्ह्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असणारा २१ वर्षीय मुलगा पुण्यावरून आल्यानंतर कोरणा संसर्ग पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. चारच दिवसांपूर्वी सदरील रुग्ण याच्या दोन तपासण्या नेगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. परंतु आता परत जिल्ह्यात रुग्ण आढळल्याने यंत्रणेमध्ये धावपळ वाढली आहे. सोबतच जिल्ह्यातील नागरिकांनी सर्तक राहत, काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोदी है तो मुमकिन है! नितेश राणेंचा राऊतांना टोला

मुंबई | सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आमदारकीचा पेचप्रसंग उभा ठाकला आहे. याबाबत ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यावरुन आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मोदी है तो मुमकिन है! असं म्हणत राणे यांनी ट्विट केलं आहे.

उद्या सामना मध्ये एक अग्रलेख होऊन जाऊदे. मोदी है तो मुमकिन है! हो कि नाही राऊत साहेब? असं राणे यांनी या ट्विट मध्ये म्हणले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मध्यस्थीमुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचा आमदारकीचा मार्ग सुकर होणार असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात आहे. नेमका यालाच हात घालत राणे यांनी राऊत यांना यानिमित्ताने टोला लगावला आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात माध्यामांची मुस्कटदाबी सुरु असल्याची तक्रार केली होती. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणुन नेमत नसल्याने अनेकांना यात राजकिय खेळी दिसत होती. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लाॅकडाउन असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे आता राज्यपाल कोश्यारी काय निर्णय घेतात यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री!

मुंबई | सध्या राज्यावर कोरोनाचे संकट आले आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास १० हजार वर पोहोचली आहे. अशात आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपदच धोक्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे यांच्या आमदारकी निवडीबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. विरोधीपक्ष या संधीचा योग्य फायदा उठवून राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभुमीवर जर ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला तर आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे यांच्या आमदारकीबाबत शिफारस केली होती. तज्ञांच्या मतानुसार राज्यपालांना मंत्रीमंडळाची शिफारस मान्य करावीच लागते. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री कायम राहतील आणि राज्यपाल ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणुन नियुक्त करतील असं बोललं जात आहे. मात्र समजा काही कारणाने उद्धव ठाकरे य‍ांना आमदार म्हणुन नियुक्त केले गेले नाही तर शिवसेनेकडून प्लान बी म्हणुन आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये आदित्य ठाकरे यांना तात्पुरते मुख्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. महाविकास आघाडिचे सरकार सत्तेत येईपर्यंत शिवसेनेची एक अट होती. ती म्हणजे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असणार. आता या तांत्रीक कचाट्यात शिवसेना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडणे कदापी शक्य नाही. तसेच आदित्य हे वरळी मतदार संघातून लोकनियुक्त आमदार आहेत. त्यांना आता पर्यावरण मंत्री पदाचा अनुभव देखील आहे. त्यामुळेच मुख्यमंत्रीपदासाठी त्य‍ांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र अगदी शेवटचा पर्याय म्हणुन याकडे पाहिले जात आहे.

वास्तविक राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा निर्णय फेटाळल्यावर पुन्हा शिफारस करता येते. अजून तरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिफारस अमान्य केलेली नाही. तरीही पुढील कायदेशीर लढाईच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने पुन्हा शिफारस करण्याची खेळी केली. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नियुक्तीबाबत राजभवनकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यपाल भाजप नेत्यांच्या कलाने वागत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांकडून केला जात आहे.

३० एप्रिलपासून सातारा शहरासह आसपासच्या ‘या’ ९ गावांमध्ये कडक कर्फ्यू, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा शहरासह सातारा तालुक्याच्या हद्दीतील दहा ग्रामपंचायत परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज (३० एप्रिल) रात्री १२ पासून पुढच्या आदेशापर्यंत कर्फ्यू लागू असणार आहे. कर्फ्यू काळात सदरील परिसरांत दोन पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखन्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हे पाऊल उचलले आहे.

सातारा शहरात आज कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणुन शहर आणि आसपासची गावे सील करण्यात आली आहेत. यामध्ये खेड ग्रामपंचायत, विलासपूर ग्रामपंचायत, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाडे, कोडोली, संभाजीनगर, सातारा नगरपालिका या क्षेत्र‍ांचा समावेश आहे.

दरम्यान, कर्फ्यू काळात दवाखाने मेडीकल नर्सिंग होम वगळता सर्व दुकाने राहणार बंद राहणार आहेत. अत्यावश्यल सेवेतील कर्मचार्‍यांना यातून वगळण्यात आले आहे. तसेच नियम मोडणा-यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. यापुर्वी कराड शहर आणि परिसरातील ११ गावांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर जावळी आणि पाटन येथेही जिल्हाधिकाऱ्यांनी कडक संचारबंदी लागू केली होती.

सपना चौधरीच्या तू चीज बडी गाण्यावर कुस्तीपटूचा भन्नाट डान्स! पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | सध्या देशात कोरोनामुळे चिंतेचे वातावरण आहे. घरात राहून अनेक जण बोअर झाले आहेत. अशात एका खेळाडून एक भन्नाट व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतपय. घरामध्ये व्यायाम करताना हा भारताचा खेळाडू सपना चौधरीच्या गाण्यावर थरकताना दिसत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओचं कौतुक होत असून याला अनेक व्हिव्ज मिळाले आहेत.

देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून भारतातील अनेक खेळाडू आपल्या घरातच आहेत. या कालावधीमध्ये त्यांनी घरात राहून व्यायाम सुरु ठेवला आहे. कारण ज्यावेळी क्रीडा स्पर्धा सुरु होतील, तेव्हा आपण पूर्णपणे फिट राहायला हवे, असे त्यांना वाटत आहे.

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया हा घरामध्ये व्यायाम करतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये बजरंग सपना चौधरीच्या एका गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे हरयाणामध्ये भरपूर प्रसिद्ध झाले असून ‘तू चीज बड़ी है’ अशा या गाण्याच्या ओळी आहेत. या गाण्यावर बजरंगने धम्माल डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडीओ युनायडेट वर्ल्ड रेसलिंगने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

सातारा येथे कोरोना रुग्ण आढळलेला ‘तो’ परिसर सील

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा नगर परिषद हद्दीतील सदरबझार येथे कोरोना संक्रमीत रुग्ण आढळल्याने ते केंद्र स्थान धरुन 1 किमी चा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र व केंद्र स्थान धरुन 3 कि.मीचा परिसर बफर क्षेत्र म्हणून उपविभागीय दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांनी घोषीत केला आहे.

बुधवारी सातारा शहरात एक बाधित रुग्ण सापडला. जिल्हा रुग्णालयात ही महिला एक्सरे टेक्निशियन म्हणून कार्यरत आहे व जिल्हा रुग्णालय परिसर म्हणजे सदर बझार येथीलच एका अपार्टमेंटमधील रहिवासी आहे. अहवाल पॉझेटिव्ह आल्यांनातर आरोग्य व पोलीस यंत्रणा गतिमान झाली आहे.तसेच सदरबाझर परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोरोना विषाणुचा संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करुन बाधित रुग्णाने प्रवास केलेला असल्याने सातारा नगर पालिका हद्दीतील सदरबझार येथील हद्द केंद्र स्थान धरुन 1कि.मी. चा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र व केंद्र स्थानी धरुन 3 कि.मी. चा परिसर बफर क्षेत्र म्हणून दंडाधिकारी मिनाज मुल्ला यांनी घोषीत केला आहे. बुधवारी सकाळी जिल्हयात तीन जण कोरोनामुक्त झाले असताना दुपार पर्यंत दोन रुग्णांची वाढ होत जिल्ह्याचा आकडा 43 झाला आहे.