Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5868

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मैदानात; राज्यपालांची घेतली भेट

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी कुठलीही निर्णय घेतला नाही. जवळपास दीड महिना उलटून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद नियुक्तीचा राज्यपाल निर्णय घेत नसल्यानं शेवटी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत थेट राजभवन गाठत राज्यपालांची भेट घेतली.

या भेटीत उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ या सर्व मंत्र्यांनी राज्यपाल यांना एकदा उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीच्या मागणीचे पत्र दिले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर “जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे” अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की, “जो प्रस्ताव आम्ही दिला होता त्यासंबधी राज्यपालांना पुन्हा पत्र दिलं आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुसऱ्यांदा ठराव करुन जो प्रस्ताव दिला आहे तो मान्य करावा अशी विनंती राज्यपालांना करण्यात आली आहे”. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी यासंबंधी ट्विट करत म्हटलं होतं की, “सद्यस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे मंत्रिमंडळानं आज महाराष्ट्र विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीनं कार्यवाही करावी,या विनंतीचा पुनरुच्चार केला”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इन्फोसिसच्या अभियंत्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

पिंपरी चिंचवड । देशात सर्वत्र लॉकडाउन असून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना दिल्या आहेत. मात्र घरात बसून बसून अनेक जण नैराश्यात जात आहेत. पुण्यातील वाकड येथील एका अभियंत्याने अशातूनच इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वाकड परिसरात आयटी अभियंत्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास घडली असून प्रसून कुमार झा ( २८, रा. लॉरेल सोसायटी, वाकड) असे आत्महत्या केलेल्या अभियंत्याचे नाव आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, प्रसून हे हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड येथे राहत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. झा यांचा विवाह निश्चित झाला होता. त्यातील काही वादातून त्यांनी आत्महत्या केली का, याची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, वाकड पोलिस तपास करीत आहेत.

म्हणुन त्या आज्जी विकतायत १ रुपयाला १ इडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील बरेच लोक इतरांना त्यांच्या त्यांच्या मार्गाने मदत करण्यात व्यस्त आहेत. त्याच वेळी, पुष्कळ लोक असे आहेत जे या महागाईच्या काळात पैसे कमविण्यात व्यस्त आहेत, असेही बरेच लोक आहेत जे पैशाची पर्वा न करता स्वस्तात वस्तू विकण्यात गुंतले आहेत जेणेकरून इतरांना कोणतीही अडचण येऊ नये. कोयंबटूरमध्येही अशीच एक महिला राहते जी गेल्या ३० वर्षांपासून अवघ्या एका रुपयात इडली विकत आहे. लॉकडाऊनमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती वाढत असतानाही, ८५ वर्षांच्या या वृद्ध महिलेने आपल्या इडलीची किंमत वाढविली नाही. कमलाथल नावाची ही वयोवृद्ध महिला आजही आपल्या ग्राहकांना एक रुपयातच इडली देत ​​आहे.

अलांडुरईजवळच हि वृद्ध महिला घराबाहेरच खाण्या-पिण्याचे दुकान चालवते तिच्या इथे सुमारे ३०० लोक दररोज इडली खातात. असेही काही लोक आहेत ज्यांना लॉकडाऊनमुळे घरी जाता आलेले नाही आणि कमलाथल त्यांचीही सेवा करतात. कमलथळ यांचे म्हणणे आहे की उडीद डाळची किंमत १०० ते १५० रुपयांपर्यंत वाढली आहे. मिरचीचा दरही दीडशे रुपयांवरून २०० रुपयांवर गेला आहे, परंतु या सर्वांमध्ये मी माझ्या इडलीच्या किंमतीत वाढ केलेली नाही. ते कसं तरी शिल्लक ठेवतात आणि १ रुपयांना इडली विकतात. इतकेच नाही तर कमलाथल लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळायलाही शिकवते. ती लोकांना इतरांपासून दूर राहण्याची आणि इडली खाण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या जागी बसण्यास सांगते.

त्याच वेळी, हि महिला म्हणाली की असे बरेच लोक आहेत जे भाजीपाला, खाणेपिणे वाहतूक करुन मदत करतात. लोक डाळी, भाज्या आणि तांदूळ देत आहेत, यामुळे त्यांना खूप आनंद झाला आहे. नुकतेच द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महिलेशीही चर्चा केली.यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये सोशल मीडियावर एक रुपयामध्ये कमलथळ इडली विकत असल्याची बातमी जोरदार व्हायरल झाली होती. त्याचबरोबर, यावर्षी लॉकडाऊनमध्येही इडलीच्या किंमतीत वाढ न केल्याबद्दल त्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

२४ तासात औरंगाबादेतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दुपटीने वाढ; एकूण रुग्णसंख्या १०५ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत लक्षणीय वाढ झाली आहे. २४ तासांत शहरात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असून, सध्या जिल्ह्यात एकूण १०५ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. या बाधितांमध्ये पाच वर्षांपासून ते ९५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व बाधित शहर परिसरातील आहेत.

शहरात सोमवारी (२७ एप्रिल) दुपारपर्यंत बाधितांचा आकडा ५३ होता. मात्र सोमवारी सायंकाळी एकाचवेळी २९ नवे बाधित आढळून आले. त्यामुळे सोमवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितांचा आकडा ८२ झाला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १३ बाधित नव्याने आढळून आले. एकूण बाधितांचा आकडा ९५ झाला. त्यानंतर दुपारी साडेतीनला झालेल्या चाचण्यांमध्ये आणखी १० बाधित असल्याचे स्पष्ट झाले आणि बाधितांचा आकडा १०५ झाला आहे. त्यामुळे केवळ २४ तासांत शहरातील बाधित ५३ वरून १०५ वर पोहोचले आहेत. हे सर्व बाधित किलेअर्क, पैठण गेट, भीमनगर-भावसिंगपुरा, दौलताबाद, संजयनगर, मुकुंदवाडी, बडा तकिया मशीद, सिल्लेखाना, भावसिंगपुरा, नूर कॉलनी, आसेफिया कॉलनी, काला दरवाजा आदी भागांतील असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यातील बहुसंख्य बाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात, तर काही बाधितांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) उपचारासाठी दाखल केलं आहे. तसेच आतापर्यंत शहरातील सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.

सोनं झालं स्वस्त; सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण

मुंबई । अक्षय्य तृतीयेला वधारलेल्या सोन्यामध्ये नफेखोरी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी कमाॅडिटी बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून सोनं ४६ हजारांखाली आले आहे. सोन्याचा भाव ४०१ रुपयांनी कमी झाला. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये (MCX)सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४५७९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे.

देशात करोनाबाधितांची आणि मृत्युंची संख्या वाढत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लाॅकडाऊन आहे. यामुळे सराफा बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे. कमाॅडिटी बाजारात सोने दरात तेजी दिसून आली होती. सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र मागील दोन सत्रात नफावसुली झाल्याने या मौल्यवान धातूच्या किंमतींमध्ये घसरण झाल्याचे जाणकारांनी सांगितले.

लॉकडाउनमुळे ऐन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरील सोनेखरेदीचा मुहूर्त रविवारी सर्वांचाच हुकला. काही सोने व्यापाऱ्यांकडे ऑनलाइन बुकिंगची सोय होती. पण दुकाने बंद असल्याने एकूण खरेदी-विक्री फारच कमी झाली. त्यातून मुंबई व परिसरातून किमान ५०० किलो सोन्याची उलाढाल ठप्प झाली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील आज ४३० रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव किलोला ४१५२७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बाजारात सोने दरात एक टक्का घसरण झाली. सोन्याचा भाव १७.११ डाॅलरने कमी झाला आणि १६९६.८८ डाॅलर प्रती औंस झाला. चांदीचा भाव प्रती औंस १५.०५ डाॅलर प्रती औंस आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

एका अफवेमुळे इराणमध्ये ५ हजार जणांनी पिले इंडस्ट्रियल अल्कोहोल; ७२८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण सरकारने आता कबूल केले आहे की हजारो लोकांनी अफवेमुळे इंडस्ट्रियल अल्कोहोल प्यायले आणि त्यांचा मृत्यू झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणमध्ये एक अफवा पसरली की मद्यपान केल्यामुळे कोरोनाव्हायरस बरा होतो,त्यानंतर शेकडो मुलांसह हजारो लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल पिले. इराण सरकारने सोमवारी सांगितले की या घटनेत एकूण ७२८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

इराणच्या मृत्यूचा मागोवा घेणार्‍या कार्यालयाने सोमवारी सांगितले की इंडस्ट्रियल अल्कोहोल पिण्याच्या घटनेत केवळ ७२८ लोकच मरण पावले नाहीत तर अनेक मुलांसह शेकडो लोकांची दृष्टी देखील गेली आहे. अल जजीरामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार इराण सरकारने अशी माहिती दिली आहे की विषबाधेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये या मृत्यूंचा समावेश आहे. हे सर्व लोक कोरोना संसर्गावर उपचार घेण्याच्या अफवांना बळी पडले आहेत.

Iran reports largest spike in coronavirus as 147 more die ...

इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते किनुष जहांपौर म्हणाले की, या अफवामुळे सुमारे ५०११ लोकांनी इंडस्ट्रियल अल्कोहोल घेतले. अगदी बर्‍याच पालकांनी आपल्या मुलांना अल्कोहोल दिले होते. यातील ९० लोकांची दृष्टी गेली आहे. या अफवेनंतर या सर्व लोकांनी अल्कोहोलचा शोध सुरू केला आणि ते सापडले नाही म्हणून त्यांनी मिथेनॉल प्यायले. प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोक भीतीमुळे समोर आलेले नाहीत आणि ते प्याल्याने आंधळे झालेल्यांची संख्याही जास्त असू शकते.

मिथेनॉलचा वास आणि चव अगदी अल्कोहोल प्रमाणेच आहे. मात्र, हे थेट नुकसान करते. जरी इराणमध्ये, कोरोना संसर्गामुळे बर्‍यापैकी विध्वंस झाले,तरी आता येथे यावर बरेच नियंत्रण केले गेले आहे. इराणमध्ये १,००० पेक्षा जास्त संसर्गाची नोंद झाली आहे तर ५८०६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Iran to call dead medical staff 'martrys' as virus kills 291

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशात एकाच दिवसात ५१ जणांचा कोरोनाने मृत्यू, रुग्ण संख्या ३० हजारांजवळ

नवी दिल्ली । देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ५९४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले रुग्ण आहेत. या नव्या रुग्णाची भर पडल्यानंतर देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो २३.३ टक्क्यांवर आला आहे.

भारतातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आणि या साथीच्या आजारामुळे झालेल्या मृत्यूची संख्या पाहता भारतील स्थिती जगाच्या इतर सर्वाधिक फटका बसलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांच्या तुलनेत चांगली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारताशी तुलना केल्यास मोठ्या लोकसंख्येच्या २० करोनाग्रस्त देशांतील रुग्णांची संख्या भारताच्या ८४ पट, तर मृत्यू पावलेल्यांची संख्या २०० टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

गेल्या २८ दिवसांमध्ये देशभरातील १७ जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याचेही ते पुढे म्हणाले. या जिल्ह्यांच्या यादीत एका जिल्ह्याचे नाव गळले असून आणखी दोन जिल्ह्यांची नावे जोडली गेली आहेत. यात पश्चिम बंगाल राज्यातील कलिमपोंग आणि केरळमधील वायनाड या जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. तर, बिहारमधील लखीसराय या जिल्ह्यात एक रुग्ण आढळल्याने या जिल्ह्याचे नाव या यादीतून वगळण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

इरफान खानच्या प्रकृतीत बिघाड, ICU मध्ये एडमिट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता इरफान खान याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इरफान मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल हलवले आहे. अलीकडेच इरफान खानची आई सईदा बेगम यांचे निधन झाले होते.त्यावेळी अशा बातम्या आल्या होत्या की लॉकडाऊनमध्ये घरापासून दूर असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अभिनेत्याला आपल्या आईची शेवटची झलक पाहायला मिळाली. इरफान खान सध्या मुंबईत आहे.

दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये इरफानला त्याच्या आजाराचे निदान झाले होते. त्याने स्वत: ही धक्कादायक बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती.त्याने आपल्या आजारपणाचा खुलासा एका ट्वीटद्वारे केला होता – आयुष्यात अचानक असे काहीतरी घडते जे आपल्याला पुढे घेऊन जाते. माझ्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस असेच होते. मला न्यूरो-एंडोक्राइन ट्यूमर नावाचा आजार झाला आहे. पण आजूबाजूच्या लोकांच्या प्रेम आणि शक्तीने मला एक आशा दिली आहे.

 

पुढे त्याने लिहिले की, मी उपचारासाठी परदेशात जात आहे. मी सर्वांना विनंती करतो माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या आजाराबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल, मी हे सांगतो की न्यूरो नेहमी मेंदूत नसतो. ज्यांनी माझ्या विधानाची वाट पहिली मला आशा आहे की मी आणखी अपडेट्स घेऊन परत येईल.

५४ वर्षीय इरफानवर लंडनमध्ये उपचार सुरू होते. यावेळी तो बॉलिवूडपासून लांबच राहिला. बऱ्याच दिवसांपासून या आजारातून बरे झाल्यानंतर तो बॉलिवूडमध्ये परतला. गेल्या वर्षी सप्टेंबर २०१९ मध्ये तो भारतात परतला. त्याला विमानतळावर व्हीलचेयरवरून येताना स्पॉट केले गेले होते. परत आल्यानंतर त्यानेअंग्रेजी मीडियम या चित्रपटासाठी शूटिंग सुरू केली.अंग्रेजी मीडियम हा त्याच्या आजारानंतरचा पहिलाच रिलीज झालेला चित्रपट होता.मात्र ,कोरोना व्हायरस या साथीच्या रोगामुळे हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही.

इरफान खान पत्नी सुतापा सिकंदर हिच्यासोबत राहतोय. त्यांना दोन मुले बाबील आणि अयान आहेत. सध्या तिघेही इरफानबरोबर हॉस्पिटलमध्येच आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

न्या. दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई | कोलकाता उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. सायंकाळी मुंबईतील राजभवन येथे निवडक लोकांच्या उपस्थितीत झालेल्या छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली.

राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नियुक्तीची राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखविली. त्यानंतर, राज्यपालांनी न्यायमूर्ती दत्ता यांना शपथ दिली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात व सांगता राष्ट्रगीताने झाली. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर (फिजिकल डिस्टनसिंग) ठेवण्यासह योग्य खबरदारी घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, न्या. दत्ता यांचे कुटुंबीय, मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजय कुमार, महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

दिनांक ०९ फेब्रुवारी १९६५ रोजी जन्मलेल्या न्या. दीपांकर दत्ता यांनी दिनांक १६ नोव्हेंबर १९८९ रोजी वकिलीला सुरुवात केली. त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालय, गुवाहाटी उच्च न्यायालय, झारखंड उच्च न्यायालय तसेच काही वेळा सर्वोच्च न्यायालयात एकूण १६ वर्षे सेवा बजावताना दिवाणी, घटनात्मक, कामगार, सेवा, शिक्षण व वाहतूक विषयक प्रकरणे हाताळली. घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. दिनांक २२ जून २००६ रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये त्यांची कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा कार्यकाळ २७ एप्रिल २०२० रोजी संपला, या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली.

देशातील ५० कर्जबुडव्या उद्योगपतींचं तब्बल ६८ हजार ६०७ कोटींचे कर्ज RBI ने केलं माफ

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती. त्यात आरबीआयने ५० कर्जबुडव्यांचे कर्ज माफ केल्याचे सांगण्यात आलं.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अर्थमंत्री निर्मला सितारमन आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना भारतातील मोठ्या कर्जबुडव्यांच्या कर्जाची स्थिती काय आहे? यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावेळी या दोघांनीही या प्रश्नाचे उत्तर दिले नव्हते. म्हणून मी या कर्जबुडव्यांच्या कर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी आरबीआयकडे आरटीआय अंतर्गत याबाबत अर्ज केल्याचं साकेत गोखले यांनी सांगितले.

त्यानंतर जे सत्य केंद्र सरकारने लपवलं होत त्याची माहिती आरबीआयचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी अभय कुमार यांनी २४ एप्रिलच्या उत्तरामध्ये दिली आहे. ज्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. असं साकेत यांनी सांगितलं. आरबीआयच्या उत्तरात ६८ हजार ६०७ कोटी रक्कमेचा थकबाकी तसेच तांत्रिकदृष्ट्या / हेतूपूर्वक राइट ऑफ (बुडवलेली) रक्कमेचा समावेश आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची अशी कर्जे राइट ऑफ करण्यात आली आहेत. असं साकेत यांनी सांगितलं. दरम्यान, देशातील सर्वोच्च बँकेने सुप्रीम कोर्टाच्या १६ डिसेंबर २०१५ च्या निकालाचा हवाला देत कर्ज घेऊन परदेशात गेलेल्या व्यक्तींची माहिती देण्यास नकार दिला असल्याची माहितीही साकेत यांनी दिली.

या ५० कर्जबुडव्यांच्या यादीत चोकसीच्या मालकीची गितांजली जेम्स लिमिटेड पहिल्या स्थानावर आहे. चोक्सीच्या कंपन्यांनी एकूण ५ हजार ४९२ कोटींचे कर्ज घेतलं होतं. तर गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे १ हजार ४४७ आणि १ हजार १०९ कोटींचे कर्ज घेतले होते. मेहुल चोकसीने अँटिगाचे नागरिकत्त्व मिळवले आहे. तर चोकसीचा भाचा आणि पीएनबी बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असणारा नीरव मोदी हा लंडनमध्ये आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आरआयई अ‍ॅग्रो लिमिटेडचा समावेश आहे. या कंपनीने ४ हजार ३१४ कोटींचे कर्ज घेतले होते. या कंपनीचे संचालक संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांची मागील वर्षभरापासून ईडीच्या चौकशीच्या जाळ्यात अडकले आहेत. तिसऱ्या नंबरवर जितेन मेहता यांची विन्सम डायमंड्स अ‍ॅण्ड ज्वेलरी या कंपनीचा समावेश असून कंपनीने ४ हजार ७६ कोटींचे कर्ज घेतले होते. सीबीआयकडून वेगवेगळ्या बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीची चौकशी सुरु आहे.

दोन हजार कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्या कंपन्याच्या यादीमध्ये कानपूरमधील रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सहभाग आहे. ही कंपनी कोठारी ग्रुपचा भाग असून कोठारी ग्रुपने २ हजार ८५० कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचबरोबर कुडोस केमी, पंजाब (२ हजार ३२६ कोटी), बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्या मालकीची रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेड, इंदूर (२ हजार २१२ कोटी) आणि झूम डेलव्हलपर्सं प्रायव्हेट लिमिटेड, ग्वालियर (२ हजार १२ कोटी) या कंपन्यांचाही या यादीत समावेश आहे. या यादीत १८ कंपन्यांची १ हजार कोटी कर्ज घेतल्याची माहिती आहे. त्यात हरिश मेहता यांची अहमदाबादमधील फॉरएव्हर प्रेशियस ज्वेलरी अ‍ॅण्ड डायमंड्स प्रायव्हेट लिमिटेड (१ हजार ९६२ कोटी) आणि फरार असणाऱ्या विजय माल्याची किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड (१ हजार ९४३ कोटी) या कंपन्यांचा समावेश आहे. तर एक हजार कोटींहून कमी कर्ज घेतलेल्या २५ कंपन्यांची यादी आहे. ५० मोठ्या कर्जबुडव्यांपैकी ६ जण हे हिरे तसेच ज्वेलरी उद्योगाशी संबंधित आहेत. या प्रकरणातून कोणताही उद्योग वाचला नाही. यामध्ये आयटी, बांधकाम, ऊर्जा, सोने-हिरे व्यापार, औषध क्षेत्रातील कंपन्यांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”