Saturday, March 25, 2023

देशात एकाच दिवसात ५१ जणांचा कोरोनाने मृत्यू, रुग्ण संख्या ३० हजारांजवळ

- Advertisement -

नवी दिल्ली । देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १ हजार ५९४ कोरोना पॉझिटिव्ह आढळले रुग्ण आहेत. या नव्या रुग्णाची भर पडल्यानंतर देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर वाढून तो २३.३ टक्क्यांवर आला आहे.

भारतातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आणि या साथीच्या आजारामुळे झालेल्या मृत्यूची संख्या पाहता भारतील स्थिती जगाच्या इतर सर्वाधिक फटका बसलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांच्या तुलनेत चांगली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारताशी तुलना केल्यास मोठ्या लोकसंख्येच्या २० करोनाग्रस्त देशांतील रुग्णांची संख्या भारताच्या ८४ पट, तर मृत्यू पावलेल्यांची संख्या २०० टक्के आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

- Advertisement -

गेल्या २८ दिवसांमध्ये देशभरातील १७ जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नसल्याचेही ते पुढे म्हणाले. या जिल्ह्यांच्या यादीत एका जिल्ह्याचे नाव गळले असून आणखी दोन जिल्ह्यांची नावे जोडली गेली आहेत. यात पश्चिम बंगाल राज्यातील कलिमपोंग आणि केरळमधील वायनाड या जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. तर, बिहारमधील लखीसराय या जिल्ह्यात एक रुग्ण आढळल्याने या जिल्ह्याचे नाव या यादीतून वगळण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”