हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्याचे डॅशिंग नेते आणि नुकतीच वंचित बहूजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवलेले वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. येत्या ९ जुलै रोजी वसंत मोरे यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार असून याबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपण ९ जुलैला ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितलं.
वसंत मोरे म्हणाले, आज मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सर्व प्राथमिक चर्चा पार पडल्या आहेत. ९ जुलै रोजी माझा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मी वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्विकारलं नाही. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होत आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडवे आव्हान देऊ, असेही वसंत मोरे यांनी म्हंटल. विधानसभा निवडणूक लढवणार का? असा सवाल केला असता पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय होईल असं म्हणत वसंत मोरे यांनी अधिक बोलणं टाळलं. मात्र वसंत मोरे खडकवासला किंवा हडपसर मधून विधानसभा लढवू शकतात असं बोललं जातंय.
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र पुण्यातून काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचे तिकीट फायनल झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवली. मात्र लोकसभेत त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. वसंत मोरेंच्या पक्ष प्रवेशामुळे पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
Kitchen Tips : किचनमधील रेफ्रिजिरेटर म्हणजे घरातले अनेक पदार्थ टिकवण्याचे हक्काचे कपाटच म्हणावे लागेल . भाजी आणि फळांसह इतर अनेक पदार्थ, सॉसेस, मसाले असं बरच सामान आपण फ्रिजमध्ये ठेवतो. मात्र अनेकदा गडबडीत गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवले जातात. तुम्ही देखील दूध किंवा इतर गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवत असाल तर पदार्थ आणि फ्रिज दोन्ही खराब होण्याची शक्यता असते. तुम्ही जर गरम पदार्थ फ्रीजमध्ये तसेच ठेवले तर फ्रिजचा कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो. आता हे असं का होतं तर याच्याबद्दल (Kitchen Tips) चला जाणून घेऊया
फ्रिजचे काम काय ? तर फ्रीजमधल्या वस्तूंचं (Kitchen Tips) तापमान कमी ठेवणे. त्यामुळे त्यामध्ये ठेवलेले पदार्थ हे दीर्घकाळ टिकून राहतात. फ्रिज मधला थंड पणा हा टिकून ठेवावा लागतो. तरच अन्नपदार्थ हे टिकून राहतात आणि फ्रीजचं हे कुलिंग नियंत्रित ठेवण्याचं काम हे कॉम्प्रेसर करत असतो. जर तुम्ही एखादी गरम वस्तू फ्रीजमध्ये ठेवली तर फ्रिजचे तापमान वाढतं त्यामुळे कॉम्प्रेसर वरचा ताण वाढतो आणि कॉम्प्रेसरला जलद काम करावं लागतं. जर तुम्ही एकदा दोनदा फ्रीजमध्ये असे गरम पदार्थ ठेवले तर फ्रिज खराब होत नाही मात्र वारंवार (Kitchen Tips) ही गोष्ट होऊ लागली तर निश्चितच फ्रीजचा कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला बराच खर्च करावा लागेल. कारण कॉम्प्रेसर दुरुस्त करण्यासाठी बराच खर्च येतो.
अनेकदा विजेचा खर्च वाचवण्यासाठी किंवा पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये बाहेर थंड (Kitchen Tips) हवा असते त्यामुळे फ्रिज बंद केला जातो. मात्र फ्रिज पूर्णपणे बंद करू नका अशा परिस्थितीमध्ये कमीत कमी फ्रिज दोन ते तीन नंबर वर ठेवावा. फ्रिजचा नंबर जर तुम्ही व्यवस्थित सेट केला नाही तर त्यामध्ये ठेवलेले अन्नपदार्थ हे खराब होऊ शकतात.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अंधश्रद्धेतून घडणाऱ्या घटना आणि अघोरी प्रकरणे थांबवण्यासाठी राज्यांमध्ये अनेक संघटना काम करत आहेत. परंतु असे असताना देखील वारंवार असे प्रकार घडताना दिसत आहेत. कारण की, कोल्हापुरमध्ये (Kolhapur) गुप्त धनासाठी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर हादरून गेले आहे. तसेच, हे प्रकरण नेमके काय आहे? यामागे कोणाकोणाचा हात आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथील कौलव गावातल्या एका घरामध्ये चार ते पाच फूटांचा खड्डा खणला असल्याचे निदर्शनास आले आहे. या खड्ड्याच्या बाजूलाच मंत्रोच्चार करणारा, गळ्यात रुद्राक्षांची माळ घातलेला एक साधू बसला होता. घराच्या शेजारच्यांना हे मंत्रोच्चार ऐकून संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर त्यांना देवघरामध्ये खड्डा खाल्ल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी चौकशी केली तर हा खड्डा गुप्तधन मिळवण्यासाठी खोदण्यात आल्याचे सांगण्यात आले.
महत्वाचे म्हणजे, या खड्ड्याच्या बाजूला पानविडा, फुल आणि इतर अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. हे दृश्य सर्वांनाच विचलित करणारे होते. या सर्व घटनेमध्ये संशय व्यक्त केला जात आहे की, गुप्तधन मिळवण्यासाठी या ठिकाणी नरबळी देण्यात आला असावा. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत 6 जणांविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात शरद माने नावाचा व्यक्ती मुख्य आरोग्य आहे. आता पोलीस शेजारच्यांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारावर घटनेचा तपास करत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया आज मायदेशी भारतात दाखल झाली आहे. क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतीय चाहत्यांनी सर्व खेळाडूंचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केलं. ढोल ताशांच्या गजरात सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आलं. नुकतीच टीम इंडियाने (Team India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून संध्याकाळी मुंबईत सर्वांची विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतीय संघातील ४ महाराष्ट्रीयन खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. त्यामुळे प्रथमच टीम इंडियाचे खेळाडू आपल्याला विधिमंडळात पाहायला मिळतील.
प्रताप सरनाईक म्हणाले की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैसवाल हे महाराष्ट्राचे खेळाडू आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विनंती केली आहे कि या मुंबईच्या खेळाडूंचा सन्मान करावा. कारण यामुळे भविष्यात तयार होणाऱ्या नव्या क्रिकेटपटूंना यामुळे ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळेल. विधिमंडळाच्या आवारात ५ जुलैला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह मुंबईकर खेळाडू येणार आहेत. त्याबाबतचा अधिकृत ईमेलही त्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. उद्या या खेळाडूंचा सन्मान करावा. असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
दरम्यान, आज सकाळी दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात टीम इंडियाच्या खेळाडूंचे स्वागत केले. विमानतळावरून हॉटेलपर्यंत जात असताना खेळाडूंच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर सुरु झाला, ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या मराठमोळ्या जोडीने चांगलाच ठेका धरला आणि गणपती डान्स करत चाहत्यांचे लक्ष्य वेधलं. आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने न लाजता किंवा कोणता अटीट्युड न दाखवता मनसोक्त डान्स करत पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचे मन जिंकलं. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवने सुद्धा गणपती डान्स करत फुल्ल एन्जॉय केला.
आज संध्याकाळी मुंबईत भारतीय संघाची ओपन बस मधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत हि रॅली निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया असं रोहित म्हणाला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही योजना 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून दरमहा महिलांना पंधराशे रुपये दिले जातील. सध्या अशा अनेक इतरही योजना राज्यामध्ये महिलांसाठी सुरू आहे. या योजना नेमक्या कोणत्या आहेत? आणि त्याचा लाभ कसा घ्यावा याविषयी जाणून घ्या.
लेक लाडकी योजना (Lek Ladaki Yojana) – राज्यातील मुलींसाठी लेक लाडकी योजना सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते ते अठरा वर्षाची होईपर्यंत सरकार एकूण 1 लाख 1 हजार रुपये प्रदान करते. या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना घेता येऊ शकतो. तसेच, 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्म झालेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येत आहे.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना (Annapurna Yojana) – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही देखील महिलांसाठी राबविण्यात येणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. या योजनेचा राज्यातील 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना लाभ घेता येईल. या योजनेची घोषणा देखील अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी केली आहे.
लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Yojana) – लखपती दीदी योजनेअंतर्गत केंद्र सरकार पात्र महिलांना 1 ते 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देते. जेणेकरून त्या स्वयंरोजगार सुरू करू शकतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा देशातील महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधीचा उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव (Dharashiv) .. तुळजापूरच्या आई भवानीच्या सहवासाने पावन झालेल्या या जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र काट्यानं काटा काढावा असं, आणि घराणेशाहीचा शिक्का मारलेलं राहीलं… राजकीय चेहरे बदलत गेले पण जिल्ह्याचे प्रश्न कायम राहीले… सुमसाम एमआयडीसी, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे वाजलेले तीन तेरा, पाण्याचा प्रश्न आणि दिवसागणिक छातीत धडकी भरावा असा वाढणारा शेतकरी आत्महत्यांचा आकडा.. हे सगळं धाराशीवच्या बकाल जिल्ह्याला आणखीनच पोकळ बनवतं… लोकसभेला शिवसेना ठाकरे गट तर विधानसभेला काँग्रेस – राष्ट्रवादीला कौल देणारा धाराशीवचा पॅटर्न जरा वेगळाच आहे.. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारतंय? उमरगा, परंडा, उस्मानाबाद, तुळजापूर (4 विधानसभा एकत्रित मॅप ) या चार जागांवर यंदा आमदारकीला नेमकी कुणाची फिल्डींग गुलालापर्यंत घेऊन जातीय? शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीचा विधानसभा निवडणुकीवर कसा इपॅक्ट पडताना दिसेल? त्याचंच केलेलं हे पॉलिटीकल डिकोडींग…
यातला पहीला मतदारसंघ येतो तो धाराशीव विधानसभेचा… पॉलिटीक्समधील बिग बी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मतदारसंघ म्हणून धाराशीव विधानसभेची आगळीवेगळी ओळख.. १९७४ पासून ते २००९ पर्यंत सलग सात वेळा निवडून येण्याचा रेकाॅर्ड हा पद्मसिंह पाटलांच्या नावावर राहीला.. पण राष्ट्रवादीच्या आणि पद्मसिंह पाटलांच्या या बालेकिल्ल्याला पहिल्यांदा नख लागलं ते २००९ साली…पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना विधानसभेच्या पदार्पणातच पवनराजे निंबाळकरांनी ( Rana Jagjit Singh Vs Omraje ) मात देत शिवसेनेचा भगवा धाराशीववर फडकवला… पण पवनराजेंची खळबळजनक हत्या झाल्यानं आणि या हत्याकांडाचे धागेदोरे जगजितसिंह पाटलांपर्यंत येऊन पोहचल्याने पाटील आणि निंबाळकर घराण्यात राजकीय विस्तव पडला, त्याची आग आजही विझलेली दिसत नाही… राणा जगजितसिंह यांनी २००९ च्या पराभवाचे उट्टे २०१४ ला काढले… ओमराजे वर्सेस राणा जगजीतसिंह अशा झालेल्या या लढतीत राणा जगजीतसिंह यांनी आमदारकीचा गुलाल उधळला… शिवसेना आणि भाजपातील मतविभाजनाचा फटका त्यावेळस राणा जगजीतसिंह यांच्या पथ्यावर पडला… पण खरी टशन झाली ती लोकसभा निवडणुकीला…
२०१९ ला धाराशीव लोकसभेसाठी राणा जगजिसिंह आणि ओमराजे निंबाळकर हे दोन्ही दिग्गज आमने सामने आले.. पण लोकसभेला मात्र राणा जगजितसिंह यांचं पानिपत झालं आणि ओमराजे भल्या मोठ्या लीडने थाटात खासदार झाले… बदलेली राजकीय समीकरण पाहून विधानसभेआधीच पद्मसिंह पाटलांनी भाजपची वाट धरली.. युती असल्यामुळे धाराशीवची जागा शिवसेनेला सोडावी लागल्यामुळे राणा जगजीतसिंह तुळजापुरला गेले आणि धाराशीवची लढत झाली ती राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर तर शिवसेनेकडून कैलास पाटील यांच्यात इथे अटीतटीचा सामना झाला… आणि शिवसेनेच्या कैलास पाटलांनी मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला.. सध्या कैलास पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटात असल्यानं महाविकास आघाडीकडून यंदाही तेच उमेदवार असतील. खासदार ओमराजेंची साथ, मतदारसंघातला जनसंपर्क, कडव्या शिवसैनिकांची साथ पाहता यंदाही कैलास पाटीलच आमदारकीचा गुलाल उधळतील, असं इथलं वातावरण आहे. बाकी महायुतीकडून म्हणावा असा उमेदवार सध्या तरी रिंगणात दिसत नाहीये..
दुसरा मतदारसंघ येतो तो तुळजापूरचा.. तुळजाभवानीच्या मंदीरात पूजा करताना धोतर परिधान करावं लागतं म्हणूनच की काय तुळजापूरला धोतरवाला आमदार होतो, अशी जणू अलिखीत परंपरा होती.. शिवाजीराव पाटील बाभूळगावकर, शिक्षणमहर्षी आलुरे गुरुजी आणि यानंतर चार टर्म काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण या धोतरवाल्या राजकारण्यांनी तुळजापूरची आमदारकी आपल्या ताब्यात ठेवली… अगदी उतारवयातही धोतर घालून विधीमंडळ गाजवणारा राजकारणी म्हणून मधुकररावांची ओळख होती… लोकल बोर्ड, जिल्हा बँक, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद ते विधानसभेचे उपाध्यक्षपदही त्यांनी याच आमदारकीच्या जीवावर कमावलं… आघाडी सरकारच्या काळात ते काही काळ मंत्री देखील राहिले… पण एवढा सारा राजकीय वारसा लाभूनही मतदारसंघाचा म्हणावा असा विकास झाला नाही… त्यात तरुण आमदार देण्याची भाषा प्रत्येक निवडणुकीत करण्यात आली… पण त्याला विरोधकांना यश काही आलं नाही… पण 2018 पासूनच अशोक जगदाळे यांनी फिल्डींग लावत मधुकरराव चव्हाणांच्या विरोधात रान तापवलं… मतदारसंघातील महिलासाठी देवदर्शन सहल, फिरता दवाखाना, टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा, जनावरासाठी चारा वाटप करत यंदा काहीही झालं तरी तुळजापूरची आमदारकी मिळवायचीच… असं जणू स्वतःशी चंग बांधला होता.. पण या सगळ्यात नवा ट्विस्ट आला तो म्हणजे निवडणुकीच्या काही दिवसांआधीच लोकसभेत पराभवाचा दणका बसलेल्या राणा जगजीतसिंग यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करत भाजपकडून तुळजापूरची उमेदवारी मिळवली… प्रचाराला अवघे काही दिवसच मिळूनही जगदाळेंनी मधुकररावांच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणाचा फायदा राणा जगजीतसिंग यांना मिळाला… आणि प्रस्थापित मधुकरराव चव्हाणांचा पराभव करत तुळजापुरातून आमदारकी मिळवली…थोडक्यात 2019 ला धोतर नेसणारा आमदार म्हणून तुळजापूरची जी परंपरा होती ती मोडीत काढण्यात राणा जगजीतसिंग यांना यश आलंच…. मात्र यंदाच्या विधानसभेला तुळजापूरची राजकीय समीकरण पूरती बदलून गेली आहेत… महायुतीकडून इथून राणा जगजीतसिंग हेच मैदानात दिसतील… तर दुसऱ्या बाजूला ओमराजेंचा जनसंपर्क, काँग्रेसची साथ असं प्लसमधलं समीकरण असल्याने खूप विचारपूर्वक महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागणार आहे…दयानंद रोजकरी आणि शरद पवार गटात असणारे अशोक भाऊ जगदाळे हे राणांना कडवी आणि निर्णायक फाईट देऊ शकतात… थोडक्यात पत्नीच्या पाठोपाठ आता राणा रणजीतसिंग यांच्या आमदारकीवरही पराभवाची टांगती तलवार दिसतेय…असं म्हणायला हरकत नाही…
तिसरा मतदारसंघ येतो तो उमरगा विधानसभा… अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या उमरगा विधानसभेत ज्ञानराज चौगुले हे तब्बल तीन टर्मचे आमदार राहिले आहेत… माजी खासदार रवींद्र गायकवाड Ravindra Gaikwad With Dnyanraj Chougule यांचा मदतीचा हात मिळाल्यानं चौगुले विधानसभेवर निवडून आले… पुढे प्रामाणिक आणि कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती… पण शिवसेनेच्या फुटीत शिंदे गटात गेल्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंची मशाल इथून बॅकफुटला फेकली गेली.. पण लोकसभेच्या निकालात उमरग्यातून तब्बल 43 हजारांचं लीड मशालीच्या पाठीशी राहिल्यामुळे आता ठाकरे गटातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत… अशोकराजे सरवदे, रमेश धनशेट्टी, विरपक्ष स्वामी या सगळ्यांची नावं चर्चेत असली तरी प्रा. डॉ. संजय कांबळे Multiple 2 हे यामध्ये सर्वात जास्त आघाडीवर आहेत… चळवळीत काम करण्यापासून ते राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता ज्ञानराज चौगुले यांना ते कट टू कट लढत देतील…बाबा पाटील, ओमराजे आणि इतर अनेक नेत्यांशी त्यांचे असणारे संबंध पाहता धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशा सद्यस्थितीत पाहायला मिळणाऱ्या लढतीत मशालीला अप्पर हँड आहे..
आता पाहूयात शेवटचा आणि चौथा मतदारसंघ तो म्हणजे परंडा विधानसभा… भूम परंडा हा विधानसभा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचा…राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंनी 2004 पासून सलग तीन टर्म भूम परंडाची आमदारकी पटकवली… शिवसेना प्रत्येक वेळेस इथून जिंकण्यासाठी फोर्स लावत आली… पण परंड्यात होणारा मत विभाजन हे मोटेंच्या पथ्यावर पडत आलं… पण 2019 ला तानाजीराव सावंतांनी शिवसेनेतील वाढवलेली पत पाहून जनतेतून निवडून जाण्याचा निर्णय घेतला… त्यामुळे विधान परिषदेवर असणारे तानाजीराव सावंत यांनी परंड्यातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली… मतदारसंघातला मोटे विरुद्ध सावंत असा झालेला आतापर्यंतचा सर्वात अटीतटीचा सामना… सावंत यांच्या विकास कामांचा धडाका, पक्षात असलेलं वजन आणि युतीची साथ यामुळे मतदारसंघातील मोटेंच्या वर्चस्वाला धक्का देत सावंतांनी अखेर शिवसेनेचा भगवा झेंडा भूम परंडामध्ये फडकवलाच… पण पुढे तानाजीराव सावंत हे शिवसेनेच्या बंडावळेस शिंदे गटात गेले… मंत्री झाले… यानंतर त्यांच्या इमेजला मोठा डॅमेज बसू लागला… आधी गद्दारीचा टॅग Tanajirao Sawant Angry त्यानंतर मंत्रिपदावर असताना केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य यामुळे सावंत टारगेट झाले… मराठा आरक्षणावर त्यांनी केलेल्या कमेंटमुळेही त्यांची बरीच अडचण झाली… हे कमी होतं की काय म्हणून या मंत्री महोदयांच्या मतदारसंघातूनच मशालीला दोन नंबरचं लीड मिळालंय… थोडक्यात धनशक्तीने तगडे आमदार असणाऱ्या सावंतांची आमदारकी सध्यातरी धोक्यात आहे… त्यात राहुल मोटे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असल्यामुळे भूम परंड्यात ‘राहुलभैया फिरसे’ असं वार सध्या तरी दिसतंय… बाकी रणजीत दादा पाटील की राहुल मोटे? हा निर्णय महाविकास आघाडीला घ्यावा लागणार आहे… तर अशी आहे सध्याची धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभांच्या संभाव्य चार लढती… आणि त्यांचा संभाव्य निकाल…बाकी धाराशिवमध्ये निकाल कसा लागेल? याबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज सोने चांदीच्या किमतीत (Gold Price Today) घसरण झाली आहे. मॅलिटी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज २४ कॅरेट १० ग्राम सोने 72050 रुपयांवर व्यवहार करत आहेत. कालच्या तुलनेत या किमतीत 110 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र 91575 रुपयांवर व्यवहार करत असून यामध्ये 371 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
आज MCX वर सोन्याचा भाव ७२२४४ रुपयांपासून सुरु झाला.. मात्र थोड्याच वेळात या किमती (Gold Price Today) घसरल्याचे पाहायला मिळाले. १० वाजून १५ मिनीटांनी सोन्याचा भाव ७२२१० रुपयांवर पोचला . त्यानंतर १० वाजुन ५३ मिनिटांनी सोन्याची किंमत ७२१६० रुपयांच्या निच्चांकी पातळीवर गेला. सध्या 10 ग्राम 24 कॅरेट सोने 72050 रुपयांवर करत आहेत. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याची किंमत ७३०९० रुपये आहे. तर 22 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव ६७००० रुपये आहे.
गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-
पुणे- 67,000 रुपये मुंबई – 67,000 रुपये नागपूर – 67,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 73,090 रूपये मुंबई – 73,090 रूपये नागपूर – 73,090 रूपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कापूस उत्पादक (Cotton Farmers) शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना हेक्टरी 5000 रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्राचे पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत घोषणा केली आहे . कापूस पिकासोबत सोयाबीन उत्पादकांनाही मदत जाहीर केली जाईल अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी दिली. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
कापूस हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील जिल्ह्यांमध्ये कापसाची सर्वाधिक लागवड होते. मात्र कापसाला अपेक्षित असा भाव न मिळाळ्याने शेतकऱ्याचे घातलेले पैसेही परत मिलन मुश्किल झालं. अनेक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत कापसाची विक्री करावी लागल्याने सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली याचा फटकाही लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला. कापसासारखीचं परिस्थिती सोयाबीनची देखील राहिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकार शेतकऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात आहे.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, हरिभाऊ बागडे, नारायण कुचे, यशोमती ठाकूर, किशोर जोरगेवार, राजेश एकडे, आदी सदस्यांनी कापूस उत्पादकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावर्षी कापूस खरेदीला विलंब केला जाणार नाही. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं होईल, असं सत्तार यांनी सांगितलं.दिवाळीपूर्वी खरेदी सुरू करण्यात येईल. आखूड धाग्याच्या कापसाला ७,१२१ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाला ७,५२१ क्विंटलमागे भाव दिला जाईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल १७ वर्षानंतर T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर आज रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया बार्बाडोस वरून भारतात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास टीम इंडिया दिल्ली एअरपोर्टवर दाखल झाली होती. यावेळी विमानतळाबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यानंतर विमानतळावरून हॉटेलपर्यंत जात असताना खेळाडूंच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर सुरु झाला, ढोलताशांचा आवाज ऐकताच रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Dance) या मराठमोळ्या जोडीने चांगलाच ठेका धरला आणि गणपती डान्स करत चाहत्यांचे लक्ष्य वेधलं. सोशल मीडियावर याबाबतचा विडिओ व्हायरल झाला आहे.
भारतात दाखल झाल्यानंतर टीम इंडिया दिल्लीतील ITC मौर्य हॉटेलमध्ये थांबले आहेत. हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात टीम इंडियाच्या खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं. यावेळी जाबी ढोल ऐकताच रोहित शर्मा स्वतःवर कंट्रोल ठेऊ शकला नाही, आणि त्याने चांगलाच ठेका धरला. आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या रोहितने न लाजता किंवा कोणता अटीट्युड न दाखवता मनसोक्त डान्स करत पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांचे मन जिंकलं. रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादवने सुद्धा गणपती डान्स करत फुल्ल एन्जॉय केला.
दरम्यान, आज संध्याकाळी मुंबईत भारतीय संघाची ओपन बस मधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. मरीन ड्राइव्ह पासून वानखेडे स्टेडियम पर्यंत हि रॅली निघणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्माने संपूर्ण देशातील चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी मरीन ड्राईव्हमध्ये येण्याचं निमंत्रण दिलंय. रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, “आम्हा सर्वांना तुमच्याबरोबर या खास क्षणाचा आनंद साजरा करायचा आहे. चला तर मग 4 जुलैला संध्याकाळी 5 वाजल्यापासून मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम या विजयी परेडसह हा आनंद साजरा करूया.
आज कसा असेल टीम इंडियाचे शेड्युल ?
06:00 hrs: दिल्ली विमानतळावर आगमन 06:45 तास: ITC मौर्या, दिल्ली येथे आगमन 09:00 वाजता: ITC मौर्य येथून पंतप्रधान कार्यालयासाठी प्रस्थान 10:00 – 12:00 वाजता: पंतप्रधान कार्यालयात समारंभ 12:00 वाजता : ITC मौर्या साठी प्रस्थान दुपारी 12:30: ITC मौर्या येथून विमानतळासाठी प्रस्थान 14:00 वाजता: मुंबईसाठी प्रस्थान 16:00 तास: मुंबई विमानतळावर आगमन 17:00 वाजता: वानखेडे स्टेडियमवर आगमन 17:00 – 19:00 वाजता: खुल्या बसमधून विजयी मिरवणूक 19:00 – 19:30 वाजता: वानखेडे स्टेडियमवर छोटा समारंभ 19:30 वाजता: हॉटेल ताजसाठी प्रस्थान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच मी जनतेची आणि शेतकऱ्यांची कामे करतो म्हणून मला शिव्याशाप मिळत आहेत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अजित पवारांनी आज राज्याच्या १३ कोटी जनतेला महत्त्वाचा संदेश दिला आहे. ट्विटरवर यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करत अजितदादांनी जनतेशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र वासियांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी मी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचा अशा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभले याचा मला अभिमान आहे. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये येणार आहेत. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपये सरकारने खर्च केले आहेत. कधी कधी आर्थिक अडचणीमुळे मुलांपेक्षा मुलींकडे दुर्लक्ष होतं. पण, लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून माता-भगिनींची ही विवंचना निश्चित दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील. राज्यातील प्रत्येक महिला आर्थिक आणि सामाजिकदृष्टया सक्षम व्हावी आणि स्वतःच्या पायावर उभी राहावी अशी माझी इच्छा आहे. आमच्या सरकारने अनुभवाच्या जोरावर अशक्य वाटणारे काम शक्य करू दाखवलं आहे.
राज्यातील मतभगिनी पुरुषांच्या तुलनेत कुठे मागे राहणार नाहीत हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत. अर्थसंकल्पात २५ हजार नव्या उद्योगांच्या उभारणीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३० टक्के युनिटमध्ये महिला उद्योजकांना मदत मिळणार आहे. महिलांना पिंक रिक्षा चालवण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. शाळा आणि कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. तसेच तरुण-तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण आणि १० हजार ‘स्टाइपेन्ड् देण्यात येणार आहे, अशी माहितीही अजितदादांनी दिली.
वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, विरोधकांमध्ये नकारात्मकता भरली आहे. अनेकजण अकारण टीका करत आहेत, काहींकडून तर या बजेटला लबाडाच्या घरच आवताण सांगितलं आहे परंतु त्यांच्यात आणि तुमच्या दादात हाच फरक आहे. ते राजकारण करतात पण, तुमचा दादा काम करणारा आहे. राजकारणात आल्यापासून मी कधीही पक्ष बदललेला नाही. राज्याची जनता हाच माझा पक्ष राहिला आहे.मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आजही जनतेचाच आहे. मी जे काही करतो ते जनतेच्या हितासाठीच करतो. राज्याच्या सर्वागीण विकासाचा विचार नेहमी माझ्या डोक्यात असतो. जे लोक बजेटच्या नावाने नाक मुरडत आहेत त्यांचे चेहरे आजच बघून घ्या, हे तेच लोक आहेत ज्यांना विकासाची गंगा तुमच्या घरापर्यंत येऊ द्यायचं नाही, सरकारी योजनांच्या लाभापासून तुम्हाला दूर ठेवायचं आहे असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.