Friday, December 12, 2025
Home Blog Page 6699

गुगल बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? | Happy Birthday Google

Happy Birthday Google
Happy Birthday Google

Techबाबा | तसं पहायला गेलं तर ’गुगल’ एक सर्च इंजिन. पण त्याची भूरळ लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच. काहीही अडलं की आपण लगेच म्हणतो, ’अरे गुगलवर शोध ना’ सापडेल. यावरून आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुगलने जे स्थान निर्माण केलंय त्याची महती कळते. खरंच आजच्या ऑनलाईन जमान्यात ’गुगल’आपला गुरू, मार्गदर्शक बनलाय. कॉलेज प्रोजेक्ट असो किंवा एखादा पत्ता शोधणे, नेटकनेक्शन जोडल्या जोडल्या डोक्यात पहिल्यांदा क्लिक होणारे आणि ए टू झेड सर्व माहिती पुरवणारे गुगल २० वर्षांचे झाले आहे. जगातील कोणतीही माहिती हवी असल्यास तिच्या पर्यंत पोहचण्यासाठी मदत करण्यात गुगल या सर्च इंजिनचा कोणीच हात धरु शकत नाही. आज याच गुगलचा २० वा वाढदिवस. त्यानिमित्ताने गुगल विषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊयात…

१) लॅरी आणि सर्गी यांनी गुगलची स्थापना केली, पण तुम्हाला हे माहित नसेल की, ऑगस्ट १९९८ मध्ये सन मायक्रोसिस्टिम कंपनीचे सहसंस्थापक अँडी बॅचतोलशॅयम यांनी दोन्ही मित्रांना 1 लाख डॉलर इतकी रक्कम दिली. त्यायोगे त्यांना गुगल कंपनी सुरू करता आली.

२) ‘आय अ‍ॅम फिलिंग लकी’ हे बटण देण्यासाठी गुगलला दरवर्षी ६८२ कोटी इतकी रक्कम द्यावी लागते. यात जाहिरात न पाहता युजरला थेट रिझल्ट मिळतो.

३) गुगलने ई-मेलसोबत सोशल मीडियात जबरदस्त आघाडी मिळवली असून कंपनीने २०२० पर्यंत तब्बल १२ कोटी ९० लाख पुस्तके स्कॅन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

४) सौदी अरबच्या वाळवंटामध्ये स्ट्रीट व्ह्यूच्या शूटिंगसाठी गुगलने भाड्याने उंट घेऊन त्याच्या पाठीवर कॅमेरे बसवले होते. कठीण मोहीम सहजसोपी करण्यासाठी ही शक्कल लढवण्यात आली.

५) गुगलच्या सर्च इंजिनवर दर मिनिटाला २० लाख गोष्टी सर्च केल्या जातात. २४ तासांत १६ टक्के अशा गोष्टी सर्च केल्या जातात. ज्या यापूर्वी कधीही गुगलमध्ये नोंदल्या गेल्या नव्हत्या.

६) लॅरी आणि सर्गी यांनी १९९६ मध्ये इंटरनेटवर सर्च इंजिन तयार केले. याचे नाव आधी बॅकरब होते. १९९७ मध्ये कंपनीला गुगल डॉट कॉम डोमेन मिळाले.

७) गुगलचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी मायक्रोसॉफ्टने युजर्सना ‘बिंग’ वापरण्यासाठी काही रक्कम देण्याची लालूच देखील दाखवली. पण गुगलच्या युजर्सवर याचा परिणाम झाला नाही.

८) गुगल कंपनीतील एखाद्या कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्यास त्या कर्मचार्‍याच्या पत्नीला पुढील १० वर्षे अर्धा पगार दिला जातो. त्याचबरोबर मुलांना १ हजार डॉलर इतकी रक्कम तो १९ वर्षांचा होईपर्यंत दिली जाते.

..तर मग पेट्रोल,डिझेल दर आणखी वाढणार

Petrol Dizel Price Hike
Petrol Dizel Price Hike

नवी दिल्ली | अमेरिकेने निर्बंध घातल्याने इराणकडून तेलखरेदी करणे बंद करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असे झाले तर भारतातील इंधनाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच इराणलाही याचा जोरदार फटका बसणार असून आंतरराष्ट्रीय व्यापारावर याचा परिणाम होईल असे म्हटले जात आहे.

भारतीय तेल रिफायनरी कंपनी इंडियन ऑईल कार्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम यांनी नोव्हेंबरमध्ये तेल खरेदी करण्यासाठी नोंदणीच केली नसल्याने भारत इराणकडून तेलखरेदी करणे बंद करणार आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे. अमेरिकेने इराणकडून तेल खरेदीला ४ नोव्हेंबरची शेवटची मुदत देण्यात आली आहे. २०१४ नंतर प्रथमच तेलाची किंमत १०० डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे.

इराणवरील निर्बंधांमुळे त्या देशाकडून येणाऱ्या कच्च्या तेलामध्ये घट झाली आहे. यामुळे बॅरलचा दर चार वर्षातील सर्वोच्च पातळीवर आहे. उत्पादन कमी झाल्याने तेलाच्या किंमती वाढणार आहेत. यामुळे रिफायनरी दुसऱ्या देशांकडून तेल आयात करण्याचा विचार करत आहेत. जगातील सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि रशियाकडेच उत्पादन वाढविण्याची क्षमता आहे.

चीननंतर भारत हा इराणकडून तेल विकत घेणारा दुसरा मोठा देश आहे. भारताने यंदा प्रति दिन सरासरी ५ लाख ७७ हजार बॅरल तेल मागविले आहे. हे तेल मध्य पूर्व देशांच्या तुलनेत २७ टक्के आहे.

फौजिया खान यांनी पेटवले ईव्हीएम मशीन

Fauziya Khan NCP
Fauziya Khan NCP

सातारा | ‘संविधान बचाव, ईव्हीएम हटाव’ चा नारा देत सातारा येथे काढण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादीच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या हस्ते ई.व्ही.एम. मशीन पेटवून देण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे ‘संविधान बचाव, ई.व्ही.एम. हटाव’ हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुरुषांच्या सोबतच राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मोर्चात भाजप शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच ‘मनुस्मृती हटाव, देश बचाओ’ असे फलक झळकविण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, सातारा जिल्हा महिला कार्यध्यक्षा जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, प्रदेश सेवादल मुख्य संघटक राजेंद्र लावंघरे, पांडुरंग पोतेकर, दीपिका घाडगे, शाफिक शेख, भटके विमुक्त अध्यक्ष जाधव, संगीता देशमुख, प्रिया नाईक, रुपाली भिसे, वैशाली सुतार, संजय बनकर, बबन निकम, अरुण माने, बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड होणार बंद, या तारखेआधी करा अपडेट

Debit Card ATM Card

मुंबई | बँकेचे एटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लवकरच तुमचं जुनं एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्ड बंद होणार आहे. मॅग्नेटिक स्ट्राईपचे कार्ड बंद करण्याचा निर्णय बँकांनी घेतला आहे. देशात सध्या फक्त २ प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. एक मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप असणारं कार्ड. पण आता बँक मॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार आहेत. चिप असणारे कार्ड त्याला रिप्लेस करणार आहेत.आरबीआयच्या आदेशानंतर बँकांना ग्राहकांना कार्ड रिप्लेस करुन देणं अनिवार्य असणार आहे. कार्ड बदलण्यासाठी डिसेंबरपर्यंत मुदत असणार आहे. ग्राहकांचं डेबिट आणि क्रेडिटकार्ड यामुळे आणखी सुरक्षित होणार आहे.

आरबीआयच्या मते मैग्नेटिक स्ट्राइप कार्ड आता जुनी झाली आहे. असे कार्ड बनवणे देखील आता कमी झाले आहे. हे कार्ड पूर्णपणे सुरक्षित देखील नव्हते. यामुळेच ते बदलण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. या जागी आता EMV चिप कार्ड ग्राहकांना दिले जाणार आहेत.

आरबीआयचे आदेश –
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने २०१६ मध्ये सगळ्या बँकांना आदेश दिले होते की, ग्राहकांना सामान्य मॅग्नेटिक स्ट्राईप कार्डच्या ऐवजी चिपचे कार्ड दिले जावे. डिसेंबर २०१८ पर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामुळेच बँक आता फक्त चिप असणारे एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड देणार आहे. ग्राहकांना यासाठी सूचना देखील देण्यात आले आहेत. देशात सध्या ३९.४ मिलियन अॅक्टिव क्रेडिट कार्ड आणि ९४४ मिलियन अॅक्टिव डेबिट कार्ड वापरले जात आहे.

जागतिक हदयदिनानिमित्त चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक तर्फे विशेष कार्यक्रम

ह्रदयरोग दिन
ह्रदयरोग दिन

पुणे | चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर तर्फे जागतिक हदयदिनानिमित्त २९ सप्टेंबर २०१८ रोजी एस.एम.जोशी हॉल येथे सकाळी १० वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रसिध्द शास्त्रज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय भटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. त्याचबरोबर आरोग्य विद्यापीठ, नाशिकचे माजी कुलगुरू प्रा.अरूण जामकर, वरिष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ.पी. एस. कृष्णमुर्ती, सीसीएच दिल्लीचे माजी उपाध्यक्ष डॉ.अरूण भस्मे, मिटसॉटचे प्रकल्प संचालक डॉ.मिलिंद पांडे व वरिष्ठ पत्रकार संदीप आचार्य हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. या कार्यक्रमाबाबतची माहिती पत्रकार परिषदेत चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरचे संस्थापक व होमिओपॅथी हदयरोगतज्ञ डॉ.विद्यासागर उमाळकर आणि होमिओपॅथी तज्ञ डॉ.आश्‍विनी गुगले यांनी दिली.

याप्रसंगी बोलताना डॉ.विद्यासागर उमाळकर म्हणाले की, चैतन्य होमिओ हार्टकेअर क्लिनिक अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर गेल्या 33 वर्षांपासून होमिओपॅथी द्वारे हदयविकारांवर यशस्वी उपचार करत आले आहेेत. हदयविकार हे आपल्या देशांत मृत्युचे प्रमुख कारण बनत चालले असून हे थांबविणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाद्वारे हदयविकारांच्या उपचारामध्ये होमिओपॅथीची भूमिका याबाबत आम्ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

याप्रसंगी बोलताना डॉ.आश्‍विनी गुगले म्हणाल्या की, हदयचैतन्य हा आम्हाला एक वार्षिक कार्यक्रम म्हणून प्रस्थापित करण्याचे आमचे ध्येय असून याद्वारे निरोगी हदयासाठी समग्र आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करायचे आहे. या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुण्यांचे मनोगत तसेच आम्ही उपचार केलेल्या काही रूग्णांचा अनुभव लोकांसमोर मांडला जाणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सूत्रसंचालक राजेश दामले हे डॉ.विद्यासागर उमाळकर यांची हदयविकार आणि होमिओपॅथी उपचार यावर प्रकट मुलाखत घेतील.

फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाऊंडेशन तर्फे मुक्तोत्सव २०१८ चे आयोजन

फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाऊंडेशन
फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाऊंडेशन

पुणे | फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाऊंडेशन तर्फे मुक्तोत्सव २०१८ या मधुमेहींसाठीच्या महत्त्वपूर्ण वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २९ सप्टेंबर २०१८ रोजी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास असणार आहे. जे मधुमेही अवघड अशी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (जीटीटी) पास झाले आहेत, अशांचा मुक्तोत्सव या वार्षिक कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात लोकांना मधुमेहापासून मुक्ती मिळवण्यासाठी आहार व व्यायाम याचे मार्गदर्शन डॉ प्रमोद त्रिपाठी यांसकडून केले जाईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असणार आहे.

याबरोबरच कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांच्या तर्फे विशेष कार्यक्रम सादर होणार आहे.मधुमेहींसाठी खास डायबेटीक फ्रेंडली सूप्स,सॅलडस,चटणी अ‍ॅन्ड डीप्स या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.क्लॅप जॅम आणि ड्रम सर्कल हा मनोरंजनाचा कार्यक्रम देखील प्रेक्षकांसाठी असणार आहे.

मधुमेहींसाठी नवीन अ‍ॅप
फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशन तर्फे या कार्यक्रमाचे औचित्य साधून फ्री फ्रीडम फ्रॉम डायबेटीस हे मधुमेहींसाठी विकसित केलेले अ‍ॅपचे अनावरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी सांगितले कि, फ्रीडम फ्रॉम डायबेटीस रिसर्च फाउंडेशन ही संपूर्ण परिवर्तनाचा अनुभव निर्माण करणारी संस्था असून ती मधुमेहींना इन्सुलिन आणि औषधांपासून नैसर्गिकरीत्या मुक्त होण्यासाठी प्रशिक्षिण, प्रेरणा आणि सहायता देते. जे मधुमेही व त्यांचे परिवारातील सदस्य या संस्थेच्या संपर्कात येतात, त्यांच्या आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण व सकारात्मकतेत अमुलाग्र बदल घडतो. एकंदर अनुभव इतका सक्षम असतो की बरेच मधुमेही औषधे व इन्सुलिन पासून मुक्त व्हायला लागतात. विलक्षण व अत्यंत फायदेशीर परिणाम व सर्वांच्या सदिच्छेने आता हि एक सामाजिक चळवळ बनली आहे. डॉ.प्रमोद त्रिपाठी यांनी 2011 मध्ये फ्रिडम फ्रॉम डायबेटीस हा अभिनव कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमाद्वारे साडे पाच हजारांहून अधिक लोकांची मधुमेहासाठीच्या औषधांपासून आणि एक हजार लोकांची इन्सुलिनपासून मुक्तता झाली आहे.

डॉ.प्रमोद त्रिपाठी पुढे म्हणाले की, ’मुक्तोत्सव’ चे मुख्य उद्देश्य फ्रीडम फ्रॉम डायबेटीस कार्यक्रमामार्फत ज्या मधुमेहींनी जीटीटी टेस्ट पास केली आहे त्यांचे यश साजरे करणे आहे व इतर मधुमेहींना यासाठी प्रेरित करणे आहे. भारतात मधुमेहाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे पण तरीही यावर मात करणे शक्य आहे आणि हेच आम्हांला या कार्यक्रमामार्फत दाखवायचे आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्याासाठी व मोफत नोंदणीसाठी संपर्क : 7776077760

राही सरनोबत यांना अर्जुन पुरस्कार, रुस्तम-ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान

National Sport Awards
National Sport Awards

नवी दिल्ली | सतिश शिंदे

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्रकन्या नेमबाज राही सरनोबत यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज अर्जुन पुरस्कार तर रुस्तम- ए- हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८’ चे वितरण करण्यात आले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) राज्यवर्धनसिंह राठोड, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री सर्वश्री रामदास आठवले आणि विजयसिंह सांपला, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत,केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचे सचिव राहुल भटनागर यांच्यासह विविध क्षेत्रातातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या शानदार कार्यक्रमात नेमबाज राही सरनोबत आणि रुस्तम- ए- हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राही सरनोबत या नेमबाजीमधील २५ मीटर ०.२२ स्पोर्टस पिस्टल प्रकारातील आघाडीच्या नेमबाज आहेत. नुकतेच जकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तर याच वर्षी आशियाई स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकावले होते. २००८ साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दादू दत्तात्रय चौगुले यांनी कोल्हापुरात हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले. दादू चौगुले यांनी ३ मार्च १९७३ ला मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला. त्यानंतर ३ एप्रिल १९७३ ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला. दादू चौगुले यांनी १९७० मध्ये पुणे येथे व १९७१ साली आलिबाग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

क्रिकेटपटू स्मृती मानधना यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, श्रीलंकेत सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यामुळे त्या आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत.

जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य भागीदार

जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद
जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद

नवी दिल्ली | सतिश शिंदे

दिनांक २ ते ५ ऑक्टोबर २०१८ दरम्यान होणाऱ्या जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य भागीदार असणार आहे. राष्ट्रीय मीडिया केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय ऊर्जामंत्री (स्वतंत्र प्रभार) आर. के. सिंह यांनी ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्ञान भवनात २ ऑक्टोबरला सांयकाळी ६.३० ला होणार असून पुढील कार्यक्रम हा इंडिया एक्स्पो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे होणार आहे.

जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषदेमधील ‘आंतराराष्ट्रीय सौर आघाडी’ ची पहिली बैठक, इंडियन ओशन रिम असोसिऐशनची (आयओआरए) नवीनीकरण ऊर्जा मंत्रालयीन’ बैठक ‘जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूक परिषद’ आणि प्रदर्शन (रिइन्वेस्ट-२०१८) कार्यक्रमांचेदेखील आयोजन होणार आहे. या जागतिक परिषदेत जगातील ५० पेक्षा अधिक राष्ट्र सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री सिंह यांनी दिली.

ग्रेटर नोएडा येथे होणाऱ्या रि-इन्वेस्ट परिषदेच्या ठिकाणी प्रदर्शन असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने 3 हजार चौरस वर्ग फुटाचे दालन उभारण्यात येणार आहे. या दालनामध्ये महाराष्ट्राने अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा क्षेत्रात केलेली यशस्वी कामगिरी येथे मांडण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) चे नोडल अधिकारी महेश आवाड यांनी दिली.

राज्य सरकारने ३१ मार्च २०१८ पर्यंत ८३४३ मेगावॅटची सौर क्षमता स्थापित केलेली आहे याची माहिती देणारा लघुपट, संगणकीकृत सादरीकरण येथे मांडण्यात येणार आहे. यासोबतच राज्यामध्ये ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’, ‘मुख्यमंत्री सौर पेयजल योजने’मध्ये केलेली कामगिरीही या ठिाकणी दर्शविण्यात येणार असल्याचेही श्री.आवाड यांनी माहिती दिली.

आंतराराष्ट्रीय परिषदेमध्ये भागीदार राज्य म्हणून महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्रालय सहभागी होणार आहे. महाराष्ट्र सोबतच कर्नाटक, गुजरात तसेच अन्य काही राज्यही सहभागी होणार आहेत.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जगातील आदर्श राष्ट्रीय उद्यान बनविणार – सुधीर मुनगंटीवार

Ravina Tandon and Sudhir Mungantivar
Ravina Tandon and Sudhir Mungantivar

मुंबई | मुंबईला प्राणवायू देणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देशातीलच नव्हे तर जगातील एक आदर्श राष्ट्रीय उद्यान व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यात सर्वांचे योगदान अपेक्षित असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आयोजित कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वनमंत्र्यांनी अभिनेत्री रविना टंडन यांची संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उद्यान राजदूत म्हणून अधिकृत घोषणा केली. त्यांनी श्रीमती टंडन यांना उद्यान राजदूत पदाचा सॅश तसेच पर्यावरणस्नेही पद्धतीने करण्यात आलेल्या ३ डी प्रिंटेड बिबट्याची प्रतिकृती प्रदान केली.

कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी,आमदार सर्वश्री मनिषा चौधरी,प्रकाश सुर्वे, प्रविण दरेकर, सरदार तारासिंग, वन विभागाचे सचिव विकास खारगे, अनेक स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी, उद्यानाला ई बग्गी भेट देणारे महेंद्र मोरे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष धर्मेंद्र जोरे आणि त्यांचे सहकारी, उद्यानातील आदिवासी पाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रविना टंडन यांनी धन को नही वन को महत्व दिया असं सांगत श्री. मुनगंटीवार म्हणाले की, श्रीमती टंडन या उद्यान राजदूत झाल्याने उद्यानाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळेल. आज रविना टंडन यांनी एक बिबट दत्तक घेतले आहे. त्यांच्या पुढाकारातून या कामास आणखी गती मिळेल. त्या स्वत: उत्कृष्ट वन्यजीव छायाचित्रकार आहेत. त्यांनी स्वत: काढलेली छायाचित्रे रुद फाऊंडेशनच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. यातून येणारा निधी त्या उद्यानाच्या विकासासाठी, वन्यजीव संवर्धनासाठी वापरणार आहेत. सामाजिक दायित्व निधी मिळवण्यासाठी त्या प्रयत्नशील असून यातूनच त्यांनी उद्यानाला ई बग्गी उपलब्ध करून दिली आहे.

जगाच्या पाठीवर राष्ट्रीय उद्याने किंवा वने खूप आहेत परंतु मुंबईसारख्या महानगरात, दाटीवाटीच्या लोकसंख्येत वसलेले हे १०३ चौ.कि.मी चे जंगल खूप वेगळे आहे,असे कुठही आढळत नाही. हे मुंबईला आरोग्यसंपन्न प्राणवायू देणारे, मुंबईचे हे फुफ्फुस आहे. देशात सर्वाधिक आयकर जमा करणारे शहर मुंबई आहे. या शहरातील १२ टक्के नागरिकांना या उद्यानातील जलाशयाचे पाणी पिण्यासाठी मिळते. अशा या उद्यानाची जपणूक करण्यासाठी, पर्यावरण आणि वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

SC आणि ST कर्मचाऱ्यांना सरकारी नोक-यांच्या बढत्यांमध्ये आरक्षण नाहीच

Thumbnail
Thumbnail

मुंबई | सतिश शिंदे

अनुसूचित जाती-जमातीच्या कर्मचा-यांच्या बढत्यांतील आरक्षणामधील काही महत्त्वाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निर्णय दिला. यामध्ये (SC/ST) च्या कर्मचा-यांना नोकरीमधल्या बढत्यांमध्ये आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अनुसूचित जातींना सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीत आरक्षण देण्यासाठी डेटा जमा करण्याची गरज नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यासही नकार दिला आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटींच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबतच्या नागराज खटल्याचेही उदाहरण दिले. नागराज खटल्यात अनुसूचित जाती आणि जमातींच्या मागासलेपणाचे अधिकृत रेकॉर्ड असावे हे स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र राज्यांनी विविध वर्गांचं मागासलेपण दूर करण्यासाठी सार्वजनिक रोजगारात त्या वर्गाचं प्रतिनिधीत्व पुरेसं नसल्याचं रेकॉर्ड ठेवण्याची गरज नसल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं. दरम्यान, २००६मध्ये नागराज खटल्यात दिलेला निर्णय ७ सदस्यांच्या खंडपीठाकडे सोपवण्याची गरज नाही. हा निर्णय योग्यच आहे आणि त्यावर पुन्हा विचार करण्याची गरज नसल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं.

पदोन्नतीत आरक्षणाबाबतचा वाद अनेक वर्षांचा आहे. १९९२ साली सुप्रीम कोर्टाने ‘इंदिरा सहानी विरुद्ध सरकार’ या खटल्यात पदोन्नतीतले आरक्षण घटनाबाह्य ठरवणारा निकाल दिला. १९९५ साली काँग्रेस सरकारने घटनादुरुस्ती करून त्यात ‘अनुच्छेद १६/४अ’चा समावेश केला आणि पदोन्नतीत आरक्षणाचे धोरण चालू ठेवले. या दुरुस्तीनंतरही प्रकरण पुन्हा कोर्टात गेले. २००६ साली ‘नागराज विरुद्ध केंद्र सरकार’ याचिकेत सुप्रीम कोर्टाने सरकारची घटनादुरुस्ती मान्य केली; मात्र या संदर्भात कोणताही कायदा बनवण्यापूर्वी तीन शर्तींचे सक्तीने पालन करण्याचा आदेशही दिला होता. या शर्ती अशा- १) अनुसूचित जाती आणि जमातींच्या मागासलेपणाचे अधिकृत रेकॉर्ड तयार करावे २) पदोन्नतीत या जाती-जमातींना योग्य जागा मिळाली, अथवा खरोखर वंचित ठेवण्यात आले याचेही रेकॉर्ड तयार करावे ३) पदोन्नतीतल्या आरक्षणामुळे प्रशासकीय क्षमतेवर कोणताही विपरीत प्रभाव पडणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.