Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 6737

फूलं आणि काटे

Thumbnail
Thumbnail
प्रणव पाटील

रोज दुपारी मी औंधच्या ब्रेमन चौकात सिग्नलसाठी थांबतो. तेव्हा रोज एक चित्र हमखास पाहतो त म्हणजे सिग्नलची गरीब मुलं हातात गुलाबांचा गुच्छ घेऊन उभे असतात. “फक्त दहा रुपये, दहा रुपये” करत सिग्नल चालू होईल या भितीने गाड्यांच्या मधल्या बेचक्यातून सरसर पळताना दिसतात. या रोज दिसणाऱ्या चित्रामुळे मी अनेक वेळा अस्वस्थ व्हायचो पण आता मात्र मला काहीही वाटत नाही. मी एका पांढरपेशा आणि कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनातून बुर्झव्वा गटातील असल्यामुळे या सर्वात खालच्या, कष्टकरी, शेतकरी, मजूर ,कारागीर यांच्या घामावरचा फायदा घेणारा वर्गातून असल्यामुळे मला आशा गरिबांचं चित्र समोर असूनही त्या बाबतीत काहीही करु वाटत नाही. कारण मला त्यात माझा फायदा दिसत नाही. मला त्यात माझं काही कर्तव्य आहे असंही वाटत नाही. सरकार आशा गोष्टींसाठी काय ते काम करेल ही त्यामागची भावना असते.

प्राचीन काळात भले भारतात सोन्याचा धूर निघाला असेल पण तेवढिच गावकुसा बाहेर असणारी अमानवी अस्पृश्य प्रथा असणारी काजळी ही त्या इतिहासात पानोपानी पसरलेली आहे. मला काय या चकचकीत आणि गचाळ शहरातील रस्त्यावर फिरणारे दरिद्री, पुलाखाली राहणारे भटके, नदीपात्रात झोपडपट्टीत राहणारे दलित, मुस्लिम माझे भाऊ बंध वाटतात का? सध्या तरी मुळीच नाही. असं का होतयं. धावपळीच्या जगात आपल्या वेगाला जुळवून न घेऊ शकणारे मागे पडलेले वेगळे झालेले दिसतात. मला अजून आठवतं मी आशा वस्तींमधे गेलो, तर मला नवे मोबाईल, TV असे अधुनिक बाज असलेला मध्ययुगीन समाज दिसतो. जो अजूनही कुठेतरी हळूवारपणे आपल्या जून्या कोषातून बाहेर पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे असाही समाज, मित्र मैत्रिणी आहेत ज्यांचा वावर भारतात असला तरी मनाने ते अमेरिकेत असतात. तसाचा त्यांचा पोषाख,विचार,आणि वागणं. आजही कुठेतरी इंडीया च्या खूप मागे भारत आहे. जो भारत रोज डोळ्यांना दिसतो पण मनात मात्र जाणूनबुजून इंडीया चं फक्त दिसेल अशी व्यवस्था सर्वत्र आहे.

खरंतर अर्थव्यवस्थेतील अतिशय कटू सत्य जे कार्लमार्क्स सांगतो ते म्हणजे अतिउच्च श्रीमंतांचे पाय हजारो हातांवर उभे असतात. एका पातळी नंतर पैसा पैशाला खेचतो. काय भारतात एक दिवस या दोन्ही चित्रांची कल्पना शक्य आहे का? गरीब आजही त्या परिस्थितीतच का आहे? श्रीमंत अजून का श्रीमंत होत आहेत? परवा आपल्या देशाने जगाच्या अर्थ व्यवस्थेमधे ६व्या स्थानावरुन फ्रांन्सला मागे टाकत ५ वे स्थान गाठलं म्हणून काय आनंद झाला !!! पण काय आपण खरचं सर्वसमावेशक प्रगती केली आहे काय? युरोपीयन वृत्तपत्रांनी या गोष्टींची खिल्ली उडवली आणि सांगितलं की फ्रान्स मधे प्रति व्यक्ती उत्पन्न ३७,५००डॉलर आहे तर भारतात तेच प्रति व्यक्ती उत्पन्न फक्त १,७00 डॉलर आहे .मग तरीही भारत यात पुढे कसा? कोणत्या ठराविक समुहाचे उत्पन्न सतत वाढत आहे? काय ३% लोकांकडे आपल्या देशाची ७०% संपत्ती आहे ?
या ३% लोकांच्या हातात सत्ता, मिडीया, शिक्षणसंस्था, मनोरंजनाची साधने एकवटलेली आहेत. त्यामुळे नकळत माझ्या देशाच्या उत्थाना करिता असणाऱ्या जाणिवा कापल्या गेल्या आहेत ?
काय आपण फुलांसाठी कुण्याच्या तरी हातात काटे दिले आहेत का? आज तरी मला स्वतः हून या लोकांसाठी काहीही करावं वाटत नाही कारण नकळत माझं आणि पर्यायाने माझ्याकडून कुणाचं तरी आर्थिक शोषण होत आहे.ही साखळी सगळ्या भोवाती जेवढी घट्ट असेल तो पर्यंत मला काटे असूनही फक्त टवटवीत,लाल फुलंच दिसतील.

प्रणव पाटील

9850903005

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट   

Thumbnail ८
Thumbnail ८

 अमित येवले 

 जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो

           काही सिनेमे हे वेगळी भूमिका मांडणारे असतात तर काही सिनेमे समाजाला आरसा दाखवणारे असतात. ‘देऊळ ‘ हा चित्रपट याच प्रकारात मोडणारा आहे. सध्यस्थितीतले एकदम मार्मिक सत्य यामध्ये दिग्दर्शकाने योग्यपणे मांडले आहे. चित्रपटाची संपूर्ण मांडणी ही एका गावातील वास्तव दृश्यांवर दाखवण्यात आली आहे. की जे गाव काही तरी सुधारणा करू पाहत आहे, पण त्यांना हे विकासाचे गणित तयार करतांना पायाभूत सुविधांपेक्षा काही तरुणांना या ‘देऊळ’ ची संकल्पना ठीक वाटते आणि मग पुढील सर्व काही या देऊळ च्या भोवती विकास, राजकारण, रोजंदारी, झुंडशाही कशी निर्माण होते हे दाखवण्याच्या योग्य प्रयत्न केला आहे. आणि या सर्व जोडीला नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि नसिरुद्दीन शहा यांनी प्रभावी कामगिरी करुन या चित्रपटाला एका उंचीवर नेऊन सोडले आहे.

          सुरवातीला गिरीश कुलकर्णी (किश्या) हा त्याची करडी नावाची गाय शोधत असतो, ती त्याला बऱ्याच वेळेपासुन सापडत नव्हती, शेवटी एका टेकडीवर त्याला ती सापडते आणि मग तेथून हा सीनेमा ‘टर्न’ घेतो. किश्याला स्वप्नात औदूंबराच्या झाडामध्ये दत्त दिसतो, आणि नंतर सकाळी तेथे एक सुतार त्याच्या एका सवंगडयाला मोबाइल वरुन मापे सांगतांना त्या झाडावर खानाखुणा करतो आणि मग तेथे गावातील लोकांना दत्ताचा ‘त्रिमूर्ती’ आकार दिसतो. गावातील युवा राजकारणी आप्पा, महासंग्रामचा पत्रकार व त्यांचे एक दोघे बेकार मित्र याचा फायदा घेऊन दत्त अवतरल्याची बातमी छापतात. यामुळे आजुबाजुला चर्चा रंगल्यामुळे तेथील ग्रामसभा मंदिर बांधण्याचा निर्णय घेते. यामध्ये भाऊ (नाना पाटेकर) यांच्या विरोध असतांना देखील त्यांच्या निर्णय कसा पलटतो हे पहाणे गंमतीशीर वाटते.या सर्व प्रकारामुळे नाना कुलकर्ण्यांचे (दिलीप प्रभावळकर) ग्रामीण रुग्णालयाचे अभ्यासपूर्ण असे मॉडेल बाजूला पडते. त्यामुळे ते गाव सोडून बंगलौर येथे जाण्याचा निर्णय घेतात.

              मग दत्त मंदिर उभे करण्यासाठी पूर्ण गांव कामाला लागते. शाळेतील शिक्षक मुलांना घरूण देणगी आणायला भाग पाडतात, मुलांना इतरांच्या मोबाईल वर दताच्या संर्दभात मेसेज करायला लावतात. पूर्ण गांव दत्तमय होऊन जाते, दत्तमंदिराबाहेर स्टॉल लावण्यासाठी बोली सुरु होतात. प्रत्येक जण या मध्ये भाग घेताना दिसतो आणि यामध्ये आपला आर्थिक विकास कसा होईल ते पहात असतो. कोणी चारचाकी गाडीवर बळजबरीने दत्ताचे स्टिकर चिपकवते आणि पैसे घेते तर देवदर्शनाची माहिती दिली म्हणून माहिती सांगीतल्याचे पैसे घेतो.

                चमत्कारासाठी साधू आणून बसविला जातो, करडी मातेचे मंदिर बांधुन तिला चारा पैसे घेऊन दिला जातो.हे असे सगळे साक्षात्काराचे, चमत्काराचे मार्केटिंग दत्ताच्या नावाखाली खपने चालु होते. देवभाव कमी आणि व्यवहारी भाव जास्त प्रकट होतो. काही काही विबत्स चाली वर दत्ताची गाणी रचली जातात आणि त्याची मोठ्या प्रमाणात कैसेट च्या रुपात विक्री होते.

               जेव्हा पैसा हेच सर्वस्व बनते तेव्हा नैतिकता कुठतरी मागे पडते, माणसाची स्वार्थी हाव ही जन्म घेते मग कोण बरोबर आणि कोण चूक हे माणुस विसरतो. येथे पण हेच दाखवण्यात आले आहे. ज्याने दत्त प्रकटले हे सांगितले…व जिच्यामुळे दत्तदर्शन घडले, यांचा विसर येथे पडलेला दिसतो. करडी गायीच्या पायाला जखम झाली असते, पण तिच्या कडे दुर्लक्ष केले जाते, आणि किश्याला या मंदिरात मंत्री आल्यावर बाहेर अडवून मारहाण करण्यात येते.ही स्वतःची झालेली कोंडी पाहून किशा अस्वस्थ होतो. त्याला दरोडेखोर (नसरूदीन शहा) याच्या रुपात साक्षात्कार होतो.मग तो देवाची मूळ मूर्तीच चोरून नदीत विसर्जित करतो. पण यामधुन साध्य काहीच होत नाही लोकांच्या धार्मिकतेच्या भावनांवर येथील राजकारणी लगेच वाजत गाजत नवी दत्त मूर्तीची स्थापना मंदिरात करतात. यामध्येच चित्रपटाचा शेवट करण्यात आला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकाला एक सामाजिक दर्शन घडत जाते. नानांचे विचार, त्यांचा अभ्यास, त्यांची समाजाप्रती असलेली जाणीव हे वेगळे पणाने या मध्ये भासते. गिरीश कुलकर्णी यांचा अभिनय हा खूप पाहण्यासारखा आहे. सरपंचाची सासू म्हणून खूप मनोरंजक अशी भूमिका उषा नाडकर्णी यांनी केली आहे.

दिग्दर्शन
उमेश विनायक कुळकर्णी

निर्मिती
देविशा फिल्म्स (अभिजीत घोलप)

कथा
गिरीश कुलकर्णी

पटकथा
गिरीश कुलकर्णी

प्रमुख कलाकार
गिरीश कुलकर्णी, नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुळकर्णी, मोहन आगाशे, ज्योती सुभाष, उषा नाडकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, हॄषिकेश जोशी, श्रीकांत यादव, अतिषा नाईक, नासिरुद्दीन शाह

अमित येवले 

खासदार हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या त्या व्यक्तींवर होणार अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत कार्यवाही

Thumbnail
Thumbnail

नंदुरबार | हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करणारे मराठा आरक्षणाचे आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. चार आंदोलकांच्या पैकी तीन आंदोलकांना अटक करण्यात आली असून एका व्यक्तीचा पोलीस तपास करत आहेत. या चारी आरोपींवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांच्या गाडीवर चढून त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. ही घटना रविवारी ५ ऑगस्ट रोजी नंदूरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडली आहे. काल या घटने बद्दल हिना गावित यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. तसेच नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी केली होती. या घटनेच्या निषेधार्थ काल नंदुरबार जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमधे व्याख्यानाला

Thumbnail
Thumbnail
नांदेड प्रतिनिधी

नांदेड | दिनांक ६ ऑगस्ट रोजी स्टुडंट्‌स फेडरेशन ऑफ इंडिया तालुका कमिटी तसेच महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय यांच्या‍ संयुक्त विद्यमाने कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांची ९८ वी जयंती नांदेड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जीवणावर जाहिर व्याख्यान ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. एकलारे सर होते तर प्रमुख वक्ते म्हणुन प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले लाभले होते.

‘आण्णाभाऊंचे विचार समाजापर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. आण्णाभाऊ हे कुणा एका समाजाचे नसुन ते जनतेचे लोकशाहीर आहेत’ असे प्रतिपादन प्रा इंगोले यांनी केले. यावेळी एस.एफ.आय. चे माजी जिल्हा अध्यक्ष शिवाजी गेडेवाड, अंनिसच्या मेघाताई गऊळकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय लोहबंदे, जिल्हा कमिटी सदस्य शंकर बादावाड, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयाचे शिक्षक बालाजी लंगेवाड आदी उपस्थित होते.

१२ वर्षा खालील मुलींवर केल्या जाणाऱ्या बलात्काराला फाशीच

Women Rape

नवी दिल्ली | १२ वर्षा खलील मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. यासाठी गुन्हेगारी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. ३० जुलै रोजी लोकसभेने गुन्हेगारी कायदा सुधार विधेयक २०१८ पास केले होते. तेच विधेयक काल राज्यसभेने सम्मत केल्याने आता या कायद्याची वाट मोकळी झाली आहे.
कठुआ आणि उन्नाव प्रकरण झाल्यापासून सरकार वर चौफेर टीका होत होती या टिकेतून वाचण्यासाठी सरकारने याच कायद्याचा अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशाचे आता कायद्यात रुपांतर होणार आहे.

धक्कादायक! हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवतीने दिला रेल्वे खाली जीव

Thumbnail
Thumbnail

भाईंदर | सासरच्या लोकांकडून होत असलेल्या हुंड्याच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेने रेल्वेखाली जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईजवळी मीरा भाईंदर येथे घडला आहे. माहेरच्या माणसांकडून बुलेट गाडी घेण्यासाठी पैसे आण असे म्हणत रेणुका यादव या महिलेचा प्रचंड छळ होत होता. सासरच्या या त्रासाला कंटाळून रेणुका यांनी भाईंदर मध्ये रेल्वे स्टेशनवर लोकल ट्रेन खाली जीव दिला अाहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, ही घटना हुंडाबळीची असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कामेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटिव्ही फुटेजमधे सदरील महिला तिच्या दोन वर्षांच्या मुलीसहित रेल्वे येण्याच्या काही सेकंद अगोदर रेल्वे रुळावर झोपता दिसत आहे. रेणुका यादव ही गर्भवती होती तसेच तिच्या सोबत दोन वर्षांची मुलगी ही मरण पावली आहे. या अपघातात तीन जीव गेले असल्याने रेल्वेस्थानकावरील बघ्यांनी हळहळ व्यक्त केली.

रेणुका यादव हिचा पती पिंटू यादव याला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच रेणुकाच्या सासूची आणि सासऱ्याची पोलीस कसून तपासणी करत आहेत.

इतर महत्वाचे –

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आज पासून सुरू

Thumbnail
Thumbnail

मुंबई | राज्य सरकारी कर्मचार्यांनी आज पासून राज्यव्यापी संप पुकारला अाहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, दोन लाख रिक्त पदांची भरती करण्यात यावी तसेच निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये मंत्रालयातील सर्व कामगार सर्व, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी, महानगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी तसेच सरकारी दवाखान्यातील कर्मचारी यांचा सहभाग आहे.
दरम्यान सरकारने विभाग प्रमुखांना कामावर उपस्थित राहून संपावरील कर्मचाऱ्यांच्यावर शिस्तभंग नोटीस काढून शिस्त भंगाची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात सरकारने परिपत्रक प्रसारित केले आहे.

सुदाम्या टाईप बामण मित्रांचा विषय लय खोलंय – कुणाल गायकवाड

Thumbnail
Thumbnail

कुणाल गायकवाड

ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही

ब्राम्हण संघटनांनी आरक्षणासंबधी काही मागणी केली, त्यावर कुणीही कुत्सीत टोमणे मारण्याची गरज नाही. लोकशाही मार्गाने मागण्या होऊ द्या, कायच हरकत नाही. खरंखोट गुऱ्हाळ होत राहील. मराठा आरक्षणासंबधी काही ब्रम्हवृंदांनी कुत्सीत टोमणे मारले होते, तर काहीजण तार्कीक विरोध न करता निव्वळ मळमळ बाहेर काढत होते, आता त्याची प्रतिक्रीया म्हणून ब्राम्हण मोर्चांची खिल्ली उडवणं चुकच, अर्थात ते मोर्चे आणि मागण्या कितीही विनोदी वाटत असल्या तरीही. त्यामुळे कोणाचही बहुसंख्यत्वाचं राजकारण वाईटच.

आयुष्यात बरेच जीवाला जीव देणारे अन् एका गांडीनं हगणारे बामण मित्र हायेत, राहतील. ते फक्त मित्रच आहेत, ब्राम्हण नाहीत. अर्थात समाजशास्त्रात असं बोलता येत नस्तय म्हणा. मित्र इकल्डे पुण्याकडले नाहीत. आपले गावाकडचे मीत्र. गांधी हत्येनंतरही गावातंच राहिलेले. आपल्या सारखच मराठवाडी दख्खन्नीत बोलणारे, दिसयलाबी गव्हाळ सावळे. हालाखी कधीकधी शाखा -भाजपची लाईन असती गड्यांची. पण मी फुले आंबेडकर सांगू लागलो की बिचारे तानात येऊन जातेत. वातावरण तंग होतंय. तितक्यात ब्रिग्रेडचा दोस्त आला की विषयच थांबायचा. पण दोस्तान्यात सब माफ. आपल्या पिढ्यांनी केलेला अत्याचार त्यांना कबुलच अन् प्रीव्हीलेजही. पण घरातले संस्कार आणि बाहेर दोस्तांचा रेटा, बिचारा कुढायचा आतमधी. मग आमी मोक्कार सामाजिक विषय काढणं बंद करायचोत. असं प्रत्येका सोबत घडलं असेल. प्रत्येकाचा एक बामण रूममेट असतो. त्याला आपण सॉफ्ट टारगेट करत असतो. नंतर मग ‘दारू वाजता’ सगळं विसरून जातो. असो.

इतर महत्वाचे –

खुप आधी स्थलांतरीत झालेले ब्राम्हणं, शैक्षणीक-सांस्कृतिक सत्ता असलेले ब्राम्हणं त्यांच्या पिढ्या न् पिढ्या सुधरल्या. विदेशात गेले. संगीत,नाटक, शिक्षण, विज्ञान,प्रशासन सगळीकडे दबदबा ठेवला आणि काही प्रमाणात ब्राम्हण्यही ठेवलं. अर्थात ते सगळ्याच जातीत वेगवेगळ्या रूपात ब्राम्हण्य अस्तय म्हणा. आता मला या उत्कर्ष झालेल्या ब्राम्हणांविषयी घेणंदेणं नाहीये. ते तसेबी आपल्याला जवळ करत नाहीत. आपला विषय वेगळाये, जे ब्राम्हणं गाव निमशहरात राहिली. शेतीवाडी नसलेली गरीब सुदाम्या टाईप स्वभाव असलेली. आपल्या सोबत मावा खायला टपरीवर येणारी, पुण्यात वट नसणारी, ज्यांना आपण ‘ऐ.. बामण्या’ म्हणून दोस्तीत पुकारतो किंवा ‘पंत’ आणि ‘देवबप्पा’ असे विशेषण लावतो, जे अभ्यासात हुशार नसल्यामुळे आपल्या सोबतच राहिले, त्यांचा विषय लय खोलंय. ह्या बामण पोरांचे लग्नच जमनात राजेहो. एकतर बामण पोरी हुशार असतात, चांगले करिअर करतात. संगीत वैग्रे असेल तर गावखेड्यात काही खरं नाही. म्हणून परत शहरात. चागलं करिअरवाल्या पोरी कशाला देवबप्पा आणि बिगर इंजैनर-डॉक्टरवाल्या संग लगीन करतील? वयाच्या पस्तशीपस्तोर ही आपली देवबप्पा मंडळी गोसायासारखी मोक्कार फिरायली. बरं आंतरजातीयचा हिकडं इषयचं नाही.

तर एकंदरीत असे की, कोणत्याही समाजाचे प्रश्न असे एकस्तरीय वैग्रे नसतात. (आता ही ओळ मी उगा ग्यान दाखवण्यासाठी लिहली आहे) मुद्दा असा आहे की, ब्राम्हण मोर्चा आणि त्यानंतर चाललेली टिंगल टवाळी बघून मला थोडेसे आत्मपरिक्षण करत असताना आपले कैक जिगरी दोस्तांचे चेहरे दिसले, जे की ‘ब्राम्हण होते’ असे आठवावे लागते. भावायहो, तुमचे लग्न लवकर जमोत.
सदरील लेखामागे ग्यान देण्याचा हेतू नसून निव्वळ थर्ड अँगल सांगण्याचा हेतू आहे. राग लोभ नसावा.

n

कुणाल गायकवाड

Mob. no. – 9284268904
[email protected]

इतर महत्वाचे –

लष्कराच्या जवानाची किटकनाशक पिऊन आत्महत्या

Thumbnail
Thumbnail

जेजुरी | सुट्टीवर घरी आलेल्या लष्करी जवानाने विषारी किटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धालेवाडी भागात घडली आहे. लष्करी सेवेत असलेले चेतन रणदिवे (वय२३) हे सुट्टीवर आले असता त्यांनी आत्महत्या केली आहे.

हाती आलेल्या माहीतीनुसार, श्रीनगर येथे कार्यरत असलेले चेतन सुट्टी घेऊन गावी आले होते. सुट्टी संपत आल्याने ते माघारी लष्करात जाण्यासाठी तयारी करत होते. बॅगा वगैरे भरुन मित्राला भेटायला असल्याचे सांगून चेतन रविवारी चार वाजता दुचाकी मोटार सायकल घरा बाहेर पडले ते आलेच नाहीत. चेतन घरी परत न आल्याने त्याच्या कुटूंबियांनी सोमवारी पोलिसात तक्रार केली. दरम्यान कडे पठारावर दर्शनाला चाललेल्या एका भाविकाला झाडीं मध्ये मृत देह आढळल्याची पोलिसांना बातमी लागली. चेतनच्या बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात आधिच दाखल असल्याने पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह चेतनच्या घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

चेतन यांनी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे. जेजुरी पोलीस सदर घटनेचा अधिक तपास करत आहेत.
चेतन हे २०१५ साली लष्करात भरती झाले होते. ते श्रीनगर मध्ये कार्यरत होते.

कॉम्रेड सीताराम येचुरी यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार प्रदान

Thumbnail
Thumbnail

विटा | क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली १९४३ साली स्थापन झालेल्या सातारच्या प्रतिसरकारचे हे ७५ वे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने क्रांतिसिंह नाना पाटील यांची भुमी असणार्या विटा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिसरकारच्या स्थापनेनिमित्त दिला जाणारा यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी यांना देण्यात आला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्काराच प्रदान करण्यात आला.

यावेळी मा.सिताराम येचुरी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी, कामगार, कष्टकरी विरोधी धोरणावर टिका केली. तसेच जनतेला पर्यायी विकासनिती असलेल्या डाव्या लोकशाही पर्याय मजबूत करण्याचे आवहान केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॉ. नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे हे उपस्थित होते.