पालघर प्रतिनिधी । पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्यात एकूण एकूण-19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील नालासोपारा विधान सभेत 2 लाख 86 हजार 4 पुरुष, तर 2 लाख 33 हजार 20 स्त्रिया आणि इतर- 58 असे एकूण-5 लाख 19 हजार 82 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
तर वसई विधानसभेत 1 लाख 57 हजार 70 पुरुष व 1 लाख 47 हजार 592 स्त्रिया आणि इतर-12, एकूण-3 लाख 4 हजार 674 मतदार आज मतदान करणार आहेत. नालासोपारा विधानसभेत 453 मूळ मतदान केद्र असून 47 सहाय्य्यकारी मतदार केंद्र मिळून 500 मतदार केंद्र आहेत. तर वसई विधानसभेत 332 मूळ मतदान केद्र, आणि 08 सहाय्यकारी मतदार केंद्र असे 340 मतदार केंद्र आहेत. नालासोपारा येथे 24 तर वसई मध्ये 1 मतदान केंद्र संवेदनशील आहे. तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 14 हजार 114 अधिकारी कमर्चारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 3 हजार 960 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात यावेळी 4 हजार 830 दिव्यांग मतदार असुन त्यांच्यासाठी 1 हजार 53 व्हीलचेअरची व्यवस्था मतदान केद्रांवर करण्यात आली आहे. तर 310 सैनिक मतदारांची संख्या असुन त्यांना मतदान पत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. नालासोपारा विधानसभेत शिवसेनेचे प्रदीप शर्मा आणि बहुजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर यांच्यात सरळ लढत होणार आहे तर वसई विधानसभेत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आणि शिवसेनेचे विजय पाटील यांच्यात सरळ लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये आता सेना बाजी मारणार कि बहुजन विकास आघाडी आपली सत्ता कायम ठेवणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण दोन्ही पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.