हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचे आंदोलन सुरु असेल तर सर्व प्रथम राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सर्वात आधी निशाण्यावर असतात. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरु असून मराठावाड्यातील काही जिल्ह्यात या आंदोलनामुळे हिंसक स्वरूप मिळताना दिसून येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पंढरपूरमधून मराठवाड्यात जाणारी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.
मराठवाड्यातील अनेक बस आगार बंद :
मराठवाडा व विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी येत असतात. लाखो भाविक महाराष्ट्राच्या सेवेत असणाऱ्या लालपरीच्या साहाय्यानेच पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात . परंतु सध्या सुरु असलेले मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन व लालपरीची होणारी तोडफोड यामुळे मराठवाड्यातील अनेक आगारातील बस सेवा बंद करण्यात आली असून परभणी , बीड , हिंगोली, नांदेड येथील सर्व महामंडळाचे आगार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
रेल्वेमार्गाच्या साहाय्याने मराठवाडा गाठणे शक्य होणार :
मराठवाड्यातील बीड बस स्थानकातील 70 पेक्षा अधिक बसेस काल रात्री फोडण्यात आल्या आहेत. तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी लालपरीवर दगडफेकीच्या घटना होताना दिसत आहेत. लालपरीस होणारे नुकसान टाळण्यासाठी पंढरपूर मधून मराठवाड्यात येणाऱ्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पंढरपूरहुन मराठवाड्यात जाणाऱ्या अनेक प्रवाश्यांची मोठी अडचण होणार आहे. सध्या पंढरपूर मार्गे लातूर रोड – परभणी अशी रेल्वे सेवा सुरु आहे. त्यामुळे याच मार्गाचा फायदा घेत प्रवाश्यांना रेल्वेमार्गाच्या साहाय्याने मराठवाडा गाठणे शक्य होणार आहे.