कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेले वर्षभरात राज्यातील शेतकरी कोरोनामुळे उध्दवस्त झालेला आहे. अशा काळात सरकार चुकीच्या पध्दतीने भरमसाठ व्याज लावून वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुट करीत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शब्दाला पक्के होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री हे लबाड असल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले. कराड येथे बळीराजा शेतकरी संघनेच्यावतीने वीज कनेक्शन तोडणी विरोधात वीज बिले फाडून विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचेही कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, ऍड. समीर देसाई, राज्य संघटक दिपक पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
पंजाबराव पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. सध्याचे मुख्यमंत्री लबाड आहेत. या मुख्यमंत्र्यांनी गेल्या वर्षी नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार देण्याची घोषणा केली. मात्र आजअखेर एक कवडीसुध्दा मिळाली नाही. अशावेळी मुख्यमंत्र्यांचा निषेध करत आहे. वीज वितरणचे कर्मचारी घरात वीज बिल तोडण्यासाठी आले आणि वीज तोडण्याचा प्रयत्न केला. तर ती वीज जोडून देण्याचे काम बळीराजा शेतकरी संघटना करील. बळीराजा शेतकरी संघटना व शेकापच्यावतीने दत्त चौक येथील शिवाजी पुतळा ते तहसिलदार कार्यालय या मार्गावर मोर्चा काढून तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’