मुंबई प्रतिनिधी । भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या हक्काच्या परळी मतदार संघातून विधानसभेसाठी उभ्या होत्या. मात्र त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.
यानंतर पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन आपली भाजपा संदर्भातली ओळखही काढून टाकली. त्यामुळे पंकजा भाजपाला रामराम करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं.यावर आता ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. ‘पंकजा यांच्या बद्दलच्या त्या सर्व अफवा आहेत. त्या भाजपच्या महत्वाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्या बद्दलच्या अश्या अफवा पसरवणे थांबवावे’असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.