टीम, HELLO महाराष्ट्र। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदार संघातील परभावनांतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात होते. भाजपच्या काही नेत्यांनीच मुंडेंचा पराभव घडवून आणल्याने त्या नाराज असल्याचेही बोलले जात होते. त्यातच त्यांनी भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती लावल्याने या चर्चेने अधिक जोर पकडला आहे. अखेर या सर्व प्रकारावरून मुंडेंनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
१२ डिसेंबरला दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती असते. या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या तयारीत व्यस्थ असल्याने कोर कमिटीच्या बैठकीला जाता आले नसल्याचे पंकजांनी सांगितले आहे. परंतु पंकजांच्या या अनुपस्थितीने त्यांच्या नाराजीवर शिक्का मोर्तब झाल्याचे अनेकांकडून सांगण्यात येत आहे.
१२ डिसेंबर ला होणाऱ्या या मेळाव्यात पंकजा यांनी सर्व समर्थकांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का? याबाबतीत तर्क वितर्क लावले जात आहेत. तसेच या कार्यक्रमाला भाजपचे इतरही नाराज नेते त्यामध्ये खडसे, तावडे, मेहता हे देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.