हॅलो महाराष्ट्र Exclusive । भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पक्षश्रेष्टींकडून सातत्याने डावलण्यात आल्याने पंकजा नाराज असल्याच्या चर्चा नेहमीच सुरु असतात. त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक मोठ विधान केलं आहे. येत्या काही दिवसांत पंकजा मुंडे या ठाकरे गटात येऊ शकतात असा मोठा दावा अंधारे यांनी हॅलो महाराष्ट्रासोबत Exclusive बातचीत करताना केला आहे. शिवसेनेला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी पंकजा मुंडेचे अप्रत्यक्षपणे नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘हॅलो महाराष्ट्र’ आयोजित महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री केव्हा मिळणार? या लाईव्ह शोमध्ये सुषमा अंधारे सहभागी झाल्या होत्या. यावेळी भविष्यात जर संधी आली तर तुमच्या मनातील शिवसेनेची महिला मुख्यमंत्री कोण असा त्यांना सवाल केला असता सुषमा अंधारे म्हणाल्या, आमच्या पक्षात अनेक नेत्यांची नाव आहेत. या व्यतिरिक्त सध्या आमच्याकडे जे इनकमिंग आत्ता सुरु आहे त्यामधून सुद्धा भविष्यात अनेक नेतृत्त्व येऊ शकतात. कदाचित पंकजा मुंडे यासुद्धा आमच्याकडे येऊ शकतात असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. अंधारे यांच्या या दाव्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडण्याची शक्यता आहे.
सध्या आमच्याकडे इनकमिंग फार जोरात आहे. आमच्याकडे आत्ता सत्ता नाही, आमच्याकडे 50 खोके नाहीत, आम्ही कोणाला मंत्रीमंडळाचे आमिष दाखवू शकत नाही, विधानपरिषद जागेबाबत कोणाला काही देऊ शकत नाही. आम्ही फक्त विश्वास देऊ शकतो तरी सुद्धा मराठवाड्यातील अनेक महिला नेत्या माझ्या संपर्कात आहेत. यामधील अनेक नेत्यांनी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार म्हणून काम केलय. आणि त्या आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे अशा अनेक महिला नेत्या आमच्या पक्षात येतील. त्यांनतर मग सर्वसमावेशक भूमिका ठरेल, परंतु आत्ता जे सध्या आमच्याकडे आहेत त्यापैकी कोणाला संधी मिळावी असं विचारल्यास किशोरी पेडणेकर यांना ती संधी मिळावी अशी इच्छा यावेळी सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.