पनवेल महापालिकेचं चाललंय काय ? प्रदूषणाविरुद्धची कार्यवाही अजूनही अहवालातच अडकलेली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई । नाजुका सावंत

वाढत्या प्रदूषणाच्या समस्यांनी पनवेल शहराचं आणि त्यायोगे शहरांचा आसरा घेतलेल्या चाकरमान्यांचं आयुष्य दिवसेंदिवस जर्जर होत आहे. ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पनवेल महापालिकेचा पर्यावरण अहवाल सादर करण्यात आला होता. त्यामध्ये काही त्रुटी सापडल्याने सुधारणा करून नवीन अहवाल सादर होणे आवश्यक होते, परंतु सदरचा अहवाल अद्याप पालिकेला प्राप्त झालेला नसल्याने प्रदूषणाच्या समस्या दूर करण्यासाठी पालिका प्रशासन प्रत्यक्षात उपाययोजना कधी करणार असा प्रश्न नागरिक तसेच पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे.

यासंदर्भात प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी प्रभाग क्रमांक १ म्हणजेच खारघरचा शहरी भाग व पालिका हद्दीतील इतर गावातील रहिवासी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून खारघर मधील सेंट्रल पार्क येथे एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. हवामान बदलामुळे औद्योगिक परिसरातून सोडण्यात येणारी प्रदूषित हवा सर्वत्र पसरत असल्याने थंड हवामानाच्या कालावधीत प्रभाग क्रमांक १ मधील गावे तसेच खारघर वसाहतीमधील काही भागांना हवेतून होणाऱ्या दुर्गंधीचा आणि प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी हीच परिस्थिती असताना त्यावर कारवाई मात्र होत नाही. २ ऑक्टोबर रोजी खारघरवासी सेंट्रल पार्क येथे एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई न झाल्यास आंदोलना छेडण्यात येईल अशी माहिती खारघर तळोजा कॉलनी वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे यांनी दिली.

पनवेल येथील स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाकडे पालिका हद्दीतील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाविरोधात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर लवादाने औद्योगिक वसाहतीमधून होत असलेल्या सर्वच प्रकारच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ तसेच प्रदूषण महामंडळाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. पनवेल पालिका हद्दीतील प्रदूषण दिवसागणिक गंभीर स्वरूप धारण करत आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा कार्यान्वित करून प्रदूषण नियंत्रणासाठी वेळेत पाऊले उचलणे अपेक्षित असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं.

नक्की काय आहे प्रकरण ??

पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांच्या अपेक्षेनुसार पालिका हद्दीतील प्रदूषणाचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी मुंबई विद्यापीठाच्या पर्यावरण विभागावर सोपवली होती. त्याप्रमाणे विद्यापीठीय समितीने पर्यावरणाकरिता घातक ठरणाऱ्या घटकांचे मोजमाप करण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरवात केली होती. या समितीतर्फे ऑक्टोबर २०१८ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान पालिकेच्या चारही प्रभागातील प्रदूषणासाठी घातक ठरणाऱ्या घटकांचा अभ्यास करण्यात आला. ऑगस्टमध्ये झालेल्या पालिकेच्या महासभेतही प्रदूषणाचा अहवाल सदस्यांसमोर सादर करण्यात आला होता. अहवालावर महासभेत घेण्यात आलेल्या चर्चेनंतर अहवालात काही त्रुटी आढळून आल्यामुळे त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही करण्यात आल्या होत्या. सदर गोष्टीला दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरीही अहवाल अजून सादर करण्यात आलेला नाही.