मराठा आरक्षणावर पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत एक ट्विट केलं होतं. बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार कुटुंबात दुमत असल्याचे चित्र माध्यमांमध्ये रंगू लागले होते. दरम्यान, पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

पुण्यात अजित पवार यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याविषयी आपली भूमिका मांडली. अजित पवार म्हणाले की, “माझी बहिण सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की ती राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही. आता अलिकडची मुलं काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केलं, तुमच्या मुलाने ते ट्वीट केलं. मला तेवढाच उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो-तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला-त्याला अधिकार असतो. पण मराठा समाजाला असेल किंवा धनगर समाजाला असेल, ज्याला-त्याला आपला न्याय्य हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे.”

नेमकं काय म्हणाले होते पार्थ पवार
मराठा आरक्षणप्रश्नी पार्थ पवार सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं. बीडमधील विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येनंतर पार्थ पवार यांनी ट्वीट करुन मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं म्हणाले. ”मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या विवेकची बातमी ऐकून धक्का बसला. अशा दुर्दैवी घटनांची साखळी सुरु होण्यापूर्वी मराठा नेत्यांना जागं व्हावं लागेल आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे संकट सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पावलं उचलायला हवी.

विवेकने आपल्या मनात प्रज्वलित केलेली ज्योत संपूर्ण यंत्रणा पेटवू शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आलं आहे. मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही.मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचं दार ठोठावण्यासाठी तयार आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment