कराड प्रतिनिधी । सकलेन मुलानी
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेटे अजित पवार यांनी बंड करत भाजप सोबत संधान साधल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. यावर आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिम्मित कराड येथील प्रितिसंगम येथे त्यांना आदरांजली वाहिली.
शरद पवार म्हणाले, “अजित पवार यांच्या बंडखोरी बाबत पक्ष सर्वानुमते कार्यवाहीचा निर्णय घेईल. याबाबत निर्णय पक्षातील नेत्यांशी चर्चा करुन घेण्यात येईल. पक्षामध्ये शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा निर्णय एक व्यक्ती घेत नसतो तर त्यामध्ये पक्ष आपली भूमिका व्यक्त करीत असतो. शरद पवार यांनी यावेळी भाजपवर देखील जोरदार टिका केली. सध्याच्या केंद्रातील सरकारकडून राष्ट्रपती व राज्यपाल यापदांचा दुरूपयोग केला जात आहे.”
“कुठल्याही स्वरूपाचे बहुमत नसतांना राज्यात भाजपाने कसकाय सरकार स्थापन केले हा न समजण्यापलीकडचा विषय आहे. अजित पवार यांचा निर्णय हा पूर्णपणे व्ययक्तीक आहे. त्यांच्या बंडामागे पक्षाची कसलीही राजकीय भूमिका नाही. अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी व्यक्त केली.”