आंतराष्ट्रीय योग दिवस विशेष | श्रीकृष्ण शेवाळे
योग ही एक प्रकृतिशी समरस होणारी साधना आहे. योग या शब्दाचा अर्थ पाहिला असता जोडणे, एकत्र करणे, बांधणे, जुंपणे असा होतो. जोडणे म्हणजे शरिर आणि मनाला जोडणे असे होय. तसेच साधनेतून शरीराला आत्म्याशी एकत्र करण्यासाठी कार्य करणे म्हणजे योग होय. यासाठी पतंजली मुनींनी मानवी जीवणाच्या सर्व अडचणींवरती उत्तर सांगीतले आहे. पतंजलींनी सांगितल्याप्रमाणे योगाची जी आठ अंगे आहेत त्या अंगांचे कटाक्षाने पालन केले असता किंवा त्या अंगांना केंन्द्रबिंदू ठरवून साधना केली असता ज्या व्यक्तीला जी गोष्ट साधावयाची आहे किंवा नकोशी आहे, काढावयाची आहे ते या आठ अंगांच्या माध्यमातून प्राप्त करता येते.ती आठ अंगे/पायर्या पुढीलप्रमाणे आहेत.
१) यम
यामधे सार्वभौमिक वा नैतिक आचरणाचे नियम सांगितले आहेत. यामधे अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिगृह म्हणजे अवाजवी वस्तुंची साठवणूक न करणे हे यम म्हणजे समाज आणि व्यक्ती यांच्यासाठी नैतिक नियम असून ते मोडले असता सामाजिक आणि मानसिक व्यवस्था बिघडण्यास सुरवात होते.
२) नियम
नियम हे वयक्तीक आचरणासाठी आहेत. यामधे पतंजलींनी पाच प्रकार सांगीतले आहेत. पतंजलींनी सांगीतलेले प्रकार खालीलप्रमाणे –
१. शौच (स्वच्छता) – शरीराची निर्मलता.
२. संतोष – समाधान, संतुष्टता.
३. तपस – प्रकाशमान, तपश्चर्या. (कोणतेही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या नियमाचा उपयोग होतो.)
૪. स्वाध्याय – स्वत: अभ्यास करणे.
५. ईश्वर प्रणिधान – स्वत: केलेल्या कर्मावे फळ ईश्वराला अर्पण करणे. (अर्पण करणे म्हणजे स्वत:मधे असणारा मी पणाचा भाव काढून टाकणे होय.)
३) आसन
हे योगाचे तिसरे अंग/पायरी आहे. याच्या सतत अभ्यासाने स्थिरत्व, आरोग्य, शरीराचा लवचीकपणा, शरीराचा डौलदारपणा प्राप्त होतो. आसनांच्यामुळे ज्या व्यक्तीला शरीराची जी स्थिती ठेवणे आवश्यक आहे किंवा हवी आहे ती स्थिती मिळवता येते. जवळजवळ ८૪ दशलक्ष इतके आसनांचे प्रकार अस्तित्वात अाहेत असे म्हटले जाते. परंतु त्यातील व्यक्तीला ज्या आसनांची उपयुक्तता आहे त्या अासनांच्या अभ्यासातून, साधनेतून व्यक्तीचे वयक्तीक जीवन सुखकर बनवता येते. आसनांच्या अभ्यासासाठी बी. के. एस. अय्यंगार यांचे ‘योगदीपिका’ हे पुस्तक उत्तम आहे.
૪) प्राणायाम
प्राण म्हणजे श्वास, श्वसन. आयाम म्हणजे लांब, विस्तार, नियंत्रक करणे. प्राणायाम म्हणजे श्वास लांबवणे व नियंत्रीत करणे. प्राणायामाच्या विविध क्रियांच्या माध्यमातुन शरीरातील प्राण नियंत्रीत ठेवला जातो. जर का प्राण म्हणजे श्वास व्यक्तीच्या एकाच नाकपुडीतून उदाहरनार्थ उजव्या नाकपुडीतून जास्त होत असेल तर त्या व्यक्तीस भुतकाळाचे विचार जास्त येतात आणि डाव्या नाकपुडीतून जास्त श्वसन होत असेल तर भविष्यकाळाचे विचार जास्त येतात आणि व्यक्तीच्या दोन्ही नाकपुड्यांतुन समांतर श्वसन होत असेल तर तेव्हा तो व्यक्ती वर्तमानाशी अधिक समरस होतो. त्यामुळे आसनानंतर प्राण नियंत्रण करणे म्हणजे संतोष, समाधान, संतुष्टता मिळवणे होय.
५) प्रत्याहार
बाह्य विषयांच्या आणि इंद्रियांच्या प्रभावापासुन मनाला मुक्त करणे म्हणजे प्रत्याहार. या पायरीवरती साधक आत्मपरिक्षण करण्यास सुरवात करतो.
६) धारना
चित्ताला एकाग्र करण्याची साधना धारणेमधे साध्य होते.
७) ध्यान
मनाची निर्विचार स्थिती म्हणजे ध्यान होय. ध्यान ही एक अशी सातवी पायरी आहे की तेथे पोहोचले असता किंवा योग्य गुरुच्या सानिध्यात शिकले असता बाकिच्या इतर सहा पायर्या आपोआप कार्यरत होतात. त्या पयर्यांवरुन चालत येण्याची गरज भासत नाही.
८) समाधी
योगाची शेवटची पायरी/अंग यामधे मणुष्याला अंतिम ध्येयाची सिद्धी होते.
योग साधकाने या आठ पैकी फक्त एका पायरीचा जरी अभ्यास, साधना केली असता त्या व्यक्तीला आपले जीवण सुख शांतीमधे घालवता येईल.
श्रीकृष्ण शेवाळे
9405605570
(लेखक योगशास्त्राचे अभ्यासक असून अंयंगार इन्स्टिट्युट, पुणे येथे अध्ययन करत आहेत.)