औरंगाबाद : काही दिवसापासून शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी, उपलब्ध बेड कमी पडत आहेत.म्हणून आता आठ दिवसानंतर रुग्णाची इच्छा आणि त्रास कमी असेल तर त्याला रुग्णालयातून सुटी दिली जात आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर रुग्णावर दहा दिवस उपचार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. सुट्टी झाल्यानंतर पुढील सात दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक आहे. पण मार्च महिन्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मनपाने सुरू केलेले कोविड केअर सेंटर हाऊसफुल झाले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांना कुठलाही त्रास नाही. पण त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्यांना दाखल केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मनपाने पाच हजार नवे बेड उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात या बेडसाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटर सुरू करता येईल अशा मंगल कार्यालयांची यादी प्रशासनाने मागवली आहे.
जागा अंतिम झाल्यानंतर त्या ठिकाणी पलंग गाद्या व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे ज्यांना गंभीर लक्षणे नाहीत अशांना आठ दिवसात घरी पाठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पण हा निर्णय रुग्णाने घ्यायचा आहे त्यासाठी संबंधित डॉक्टरांची संमती असणे गरजेचे आहे असे डॉक्टर पाडळकर यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group