हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू जाहीर झाल्यापासून विजेच्या मागणीत घट झाल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे २२ टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. २० मार्च रोजी १६३.७२ गिगा वॅटच्या तुलनेत बुधवारी १२७.९६ गिगा वॅटपर्यंत विजेचा वापर कमी झाला आहे. याचाच अर्थ लॉकडाऊन दरम्यान देशातील वीजपुरवठ्याच्या मागणीत ३५ गिगा वॅटची घट झाली आहे.
काय कारण आहे?
विजेच्या मागणीतील घट ही उद्योग व राज्य वीज वितरण सुविधांमधील बंदमुळे झाली आहे. लॉकडाऊनमुळे औद्योगिक व व्यावसायिक युनिट संपूर्ण देशभर पूर्णपणे बंद आहेत.
विजेच्या मागणीत कशी घट झाली
उद्योग क्षेत्रातील स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० मार्च रोजी विजेची मागणी १६३.७२ गिगा वॅट इतकी होती. हीच मागणी २१ मार्च रोजी १६१.७४ गिगा वॅटपर्यंत खाली आले. तर २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूमुळे ही मागणी आणखी कमी होऊन १३५.२० गिगा वॅट इतकी झाली. गेल्या सोमवारी विजेची मागणी १४५.४९ गिगा वॅट राहिली. त्यानंतरच्या दोन दिवसांत, मंगळवार आणि बुधवारी ती आणखी अनुक्रमे १३५.९३ गिगा वॅट आणि १२७.९६ गिगा वॅटपर्यंत खाली आले.
विजेच्या किमतीत सुद्धा घट
वीजपुरवठा कमी मागणीमुळे इंडियन एनर्जी एक्सचेंजवरील स्पॉट पॉवर प्रति युनिट किंमत ६० पैशांनी घसरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज गुरुवारी विजेची प्रति युनिट किंमत २.४० रुपये इतकी आहे. तर शुक्रवारपर्यन्त विजेची प्रति युनिट किंमत २ रुपयांवर येऊ शकते.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.