जालना प्रतिनिधी | राज्यातील दुष्काळी स्थितीवर उपाय म्हणून राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात येणार आहे. यासाठी केंद्राच्या विविध विभागाच्या परवानग्या पुढील आठवड्यात घेण्यात येणार असून महिना अखेर पर्यंत कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी रित्या महाराष्ट्रात राबवला जाणार आहे अशी माहिती स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जालना येथे दिली.
महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला आहे. शेतात पिके जळून चालली आहेत. तर काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती सुधारण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे अशी माहिती देताना बबनराव लोणीकर यांनी युद्ध पातळीवर या कामाला प्राधान्य दिले जात आहे असे सांगितले आहे.
इस्राईल आणि गुजरातच्या धर्तीवर राज्यातील पहील्या वॉटर ग्रिडचा प्रोजेक्ट जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील 176 गावात संयुक्त होत आहे. या प्रोजेक्टची हायड्रोलिक टेस्ट पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी त्यांनी सर्व कामकाजाची पाहणी करत येत्या एक महिन्यात तालुक्यातील शंभर गावांना केवळ सात रुपयात एक हजार लिटर पाणी मिळणार असल्याची माहिती दिली.