हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल- डीझेलच्या किमतीत वाढ होत असून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आगामी काळात पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
अजित पवार म्हणाले, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढतायत, त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार आहेत. म्हणून अर्थसंकल्प सादर करताना सिलेंडर वापरणारा महिला वर्ग, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या या सगळ्यांचा एक हजार कोटी टॅक्स माफ केला आहे. कोरोनानंतर अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाची वाढ केली नाही. उलट त्यातून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, शेवटी विकासही झाला पाहिजे, सरकारही चाललं पाहिजे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून स्थिर असलेल्या इंधनाच्या किमतीत आता मोठी वाढ होताना दिसत आहे. इंधन कंपन्यांनी शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. पाच दिवसांत तब्बल चार वेळ इंधन कंपन्यांनी ही वाढ केली. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांची वाढ झाली. अशा प्रकारे पाच दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरात ३.२० रुपयांची वाढ झाली.