मुंबई | केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात घोषित केल्यानंतर महाराष्ट्रानेही पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात केल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे राज्यातील पेट्रोल लिटरमागे 5 रुपयांनी स्वस्त झाले असून जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) वाढत्या किंमतीचा परिणाम म्हणून जगभरात इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशांतर्गत याचा प्रतिकूल परिणाम होऊन जनतेला त्याची झळ बसू नये म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली.
तसेच, राज्यांनीही आपला वाटा म्हणून इंधनावरील मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अडीच रुपयांची कपात करावी, असे आवाहनही श्री. जेटली यांनी केले आहे. या आवाहनाला तातडीने प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये अडीच रुपयांची कपात केल्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात लिटरमागे पेट्रोल एकूण 5 रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह श्री. जेटली यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.