सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अभिनेता सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने पोलिसांच्या गोळीबार मैदानावर विकसित होत असलेल्या देवराई मध्ये 20 फूट उंच पिंपळाच्या वृक्षाची लागवड करण्यात आली. पुण्यातून आणलेल्या या झाडाची महामार्गापासून देवराईपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर ‘विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय’ या संकल्पनेवर आधारित शिल्पांची निर्मिती देवराईत केली गेली. त्यातील एक शिल्प तयार झाले असल्याची माहिती अभिनेते सयाजी शिंदे उपस्थितांना दिली.
सातारा येथे देवराईमध्ये 20 फूट उंच तयार असलेल्या पिंपळाच्या वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सलं, बाळासाहेब पानसरे, किशोर ठाकूर यांच्यासह सातारा पोलिस, सह्याद्री देवराई व वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, सातारा पोलिस, सह्याद्री देवराई आणि सातारा वनीकरण विभाग यांच्या माध्यमातून ही देवराई फुलवण्यात येत आहे. पुढील पिढीला वृक्ष, निसर्ग याविषयी माहिती मिळावी, यासाठी हा एक प्रयत्न आहे. सातारा येथे एक पर्यटनासाठी निसर्गसंपन्न असे ठिकाण निर्माण होत आहे.