पंतप्रधान मोदींची जनतेला कळकळीची विनंती; राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी फक्त ‘हे’ काम करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र अयोध्या येथील राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) उद्घाटनाची जोरदार चर्चा सुरु आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्या हस्ते नवंवर्षी 22 जानेवारीला राम मंदिराचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मात्र या सोहळ्याला नागरिकांनी जास्त गर्दी करू नये आणि घरी बसूनच या सोहळ्यात सहभागी व्हाव अशी कळकळीची विनंती मोदींनी केली आहे. मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील विविध विकासकामांचे लोकार्पण कऱण्यात आले. यावेळी जनेतला संभोधित करताना वरील विधान केलं.

नरेंद्र मोदी म्हणाले, एक काळ असा होता कि, अयोध्येत राम लल्ला तंबूत बसले होते. परंतु आज फक्त रामलल्लाच नव्हे तर देशातील 4 कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरूपी घर मिळाले आहे. खरं तर 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य दिव्य राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला अयोध्येत यावं अशी प्रत्येकाची इच्छा असेल, पण इथे येऊन गर्दी करू नका. उदघाटन सोहळा झाल्यानंतर कधीही तुम्ही येथे येऊ शकता. हे मंदिर आता वर्षानुवर्षे इथेच असणार आहे त्यामुळे घाई करू नका. या सोहळ्यासाठी मोजक्याच लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना निमंत्रित केले आहे त्यांनीच अयोध्येत यावे असे आवाहन मोदींनी केलं.

राम मंदिर उदघाटन सोहळा आपल्या सर्वांच्या नशिबात आलं हे आपलं भाग्य आहे. त्यामुळे 22 जानेवारीला सर्व 140 कोटी देशवासीयांनी आपापल्या घरी श्री राम ज्योती प्रज्वलित करून दिवाळी साजरी करा असेही मोदींनी सांगितलं. लंकेत रावणाचा वध करून प्रभू श्रीराम ज्या पद्धतीने अयोध्येत परतले होते आणि त्यावेळी ज्या पद्धतीने लोकांनी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी केली, त्याच पद्धतीने 22 जानेवारीलाही दिवाळी साजरी करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते २२ जानेवारी पर्यंत देशभरातील सर्व तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवावी अशी विनंतीही मोदीनी सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांना केली आहे. अयोध्येमध्ये आता इथून पुढे सतत वेगवेगळे भाविक येत राहतील, त्यामुळे आपल्याला ही भूमी नेहमी स्वच्छ ठेवायची आहे असं मोदी म्हणाले.