हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे उद्या पुणे (Pune) दौऱ्यावर आहेत. उद्या १ ऑगस्ट रोजी मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन करण्यात येणार आहे. मोदींच्या या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या असून पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त उद्या सकाळी ६ पासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे शहरातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे, त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करा असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
कोणकोणत्या मार्गात बदल –
त्यानुसार, पुणे शहरातील टिळक (अलका टॉकीज) चौक, संचेती चौक, देशभक्त केशवराव जेधे चौक, विमानतळ रस्ता, गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन कॉलेज) रोड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, बुधवार चौक, संगमवाडी रस्ता, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, सेवासदन चौक, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक या ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी त्यांचीगैरसोय होवू नये याकरीता या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वापर करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारसबागेकडे जाण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.
कात्रजकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी ब्रिज वरून न जाता लक्ष्मीनारायण चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे
वेगासेंटर पासून घोरपडी पेठ उद्यान, राष्ट्रभुषण चौक पासून हिराबाई चौककडून इच्छित स्थळी जावे
दरम्यान, लोकमान्य टिळक पुरस्काराचे मानकरी ठरलेले मोदी उद्या सकाळी पुण्यात येणार आहेत. सकाळी ११ वाजता ते प्रसिद्ध अशा दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतील. आणि त्यानंतर कार्यक्रम स्थळी जातील. या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार प्रमुख पाहुणे राहणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर दुपारी १२.४५ वाजता मोदी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मेट्रो १ च्या दोन मार्गिकांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मोदींच्या या दौऱ्यानिमित्त तब्बल २ हजार पोलिसांचा बंदोबस्त पुण्यात तैनात करण्यात आला आहे