हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एका रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या पायाला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत. यांनतर इम्रान खान यांचे विशेष सल्लागार रऊफ हसन यांनी हा हल्ला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच इतरांसोबत मिळून केला आहे असा गंभीर आरोप केला आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि मेजर जनरल फैसल यांनी इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप रऊफ हसन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. तसेच हत्येचा कट रचल्याप्रकरणी या तिघांवरही एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचेही रऊफ हसन यांनी सांगितले.
मात्र, दुसरीकडे इम्रान खान यांच्या हल्लेखोराने मात्र हा निर्णय आपणच घेतल्याचे कबुल केलं आहे . फैजल भट्ट असे सदर आरोपीचे नाव आहे. त्याने इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याचे कारण स्पष्ट करताना म्हंटल की, मी हे केले कारण इम्रान खान लोकांची दिशाभूल करत होते त्यामुळे मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. मी फक्त इम्रान खानला मारण्याचा प्रयत्न केला. कोणालाही मारायचे नव्हते. या कटात माझ्या मागे कोणी नाही, मी एकटाच यात सामील आहे असेही त्याने सांगितले.