PM Vishwakarma Yojana । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त पारंपरिक कामगारांसाठी एक नवीन योजना अखेर आजपासून सुरू केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana) असे या योजनेचं नाव आहे. देशातील कारागीर, शिल्पकार, कुंभार यांच्यासहित जवळपास 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश पडावा या उद्देशाने सरकारने ही योजना आज लाँच केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील ३० लाख लाभार्थ्यांना सरकार विना हमीचे ३ लाख रुपयांचे कर्ज तेही अवघ्या ५ टक्के व्याजदराने देणार आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
मोदी काय म्हणाले-
पीएम विश्वकर्मा योजनेच्या (PM Vishwakarma Yojana) लौंजिंग वेळी नरेंद्र मोदी म्हणाले, “आज विश्वकर्मा जयंती आहे. हा दिवस देशाच्या कारागिरांना आणि शिल्पकारांना समर्पित आहे. मी विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देऊ इच्छितो. मला आनंद होत आहे की आज, मला आमच्या विश्वकर्मा सदस्यांमध्ये सामील होण्याची संधी मिळाली. ‘पीएम विश्वकर्मा’ योजना आज सुरू करण्यात आली आहे जी कलाकार आणि शिल्पकारांसाठी आशेचा किरण म्हणून उदयास येईल. या योजनेंतर्गत विविध 18 व्यवसाय करणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि सरकार ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेवर 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
https://x.com/ANI/status/1703323455096299605?s=20
सरकार देतंय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज- PM Vishwakarma Yojana
मोदी म्हणाले, पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत, सरकार कोणत्याही (बँक) हमीशिवाय 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देईल. यासाठी व्याजदरही फक्त ५ % असणार आहे. सरकार सर्वप्रथम 1 लाख रुपयांचे कर्ज देईल, त्याची परतफेड केल्यानंतर सदर लाभार्थ्यांना आणखी 2 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येईल. पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला दररोज 500 रुपये सरकारकडून दिले जातील. याशिवाय अवजारांच्या खरेदीसाठी सरकार तुम्हाला 15 हजार रुपये एडवांस सुद्धा देतंय.
कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश –
सरकारने या योजनेत 18 पारंपारिक कौशल्य व्यवसायांचा समावेश केला आहे यामध्ये सुतार, होडी बनवणारे कामगार, लोहार, कुलूप बनवणारे कारागीर, सोनार, मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवणारे कुंभार, शिंपी, शिल्पकार, गवंडी, माशांचे जाळे बनवणारे, टोपली/चटई/झाडू बनवणारे, खेळणी बनवणारे आणि हातोडा आणि टूलकिट अशा कारागिरांचा समावेश आहेत.
कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता-
आधार कार्ड
ओळखपत्र
रहिवासी दाखला
जात प्रमाणपत्र
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक खाते पासबुक.
कुठे करावा अर्ज-
जर तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी (PM Vishwakarma Yojana) अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता. तसेच या योजेनबाबत अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in ला भेट देऊ शकता.