पुणे महापालिकेवर सत्ता ‘खेचून’ आणणार, जमलं ते सगळं करणार; अजित पवारांनी थोपटले दंड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता खेचून आणणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या २३ गावांच्या समावेशाची प्रक्रिया ‘योग्य’ वेळी पूर्ण केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने पुणे महापालिकेत जाऊन विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी त्यांनी महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढविण्यात येणार असल्याचे जाहीर करून महापालिकेवर पुन्हा सत्ता येण्याची खात्री दर्शविली होती.

यावर पवार म्हणाले, ‘सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत येणारच असे म्हणत असतो, तर विरोधी पक्ष सत्ता खेचून घेणार, असे म्हणतात. तसे मीदेखील म्हणतो, की पुणे महापालिकेवर सत्ता ‘खेचून’ आणणार.’नगरसेवकही ‘खेचून’ आणणार का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले ‘सगळे करणार. यापूर्वी पक्ष सोडून गेलेल्यांचा विचार करून एक-एक पाऊल उचलले जाणार आहे. मात्र, कोण निवडून येऊ शकतो, हे पाहूनच निर्णय घेण्यात येणार आहेत.’

महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून महापालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. ही प्रक्रिया केव्हा पूर्ण होईल, याबाबत पवार म्हणाले, ‘गावे समाविष्ट करण्यापूर्वी हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. तो कालावधी संपल्यानंतर ‘योग्य’ वेळी गावे महापालिकेत समाविष्ट होतील.’

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.