सिंधुदुर्गातील ‘त्या’ मुलीच्या जिद्दीला सलाम ठोकत खुद्द पंतप्रधान कार्यालय आलं मदतीला धावत

नवी दिल्ली । सिंधुदूर्ग जिल्ह्यातील एका मुलीला ऑनलाइन लेक्चर्सच्या माध्यमातून शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुलीची मदत केली आहे. या फोटोमध्ये एक मुलगी टेकडीवर नेटवर्क येत असल्याने झोपडीवजा शेडमध्ये ऑनलाइन लेक्चर्सला हजेरी लावताना दिसत होती. यासंदर्भातील बातम्या समोर आल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने या मुलीला मदत करण्यासंदर्भातील सूचना संबंधित यंत्रणांना केल्या आणि या मुलीला अगदी इंटरनेट कनेक्शनपासून लॅपटॉपर्यंत सर्व सुविधात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील फोटो भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असणाऱ्या विजया राहटकर यांनीही ट्विटवरुन शेअर केला आहे.

सिंधुदूर्गमधील दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार या मुलीचा एक फोटो मागील काही दिवसांपासून व्हायरल होत होता. लॉकडाउनमुळे गावातच अडकल्याने मुंबई विद्यापिठामार्फत घेण्यात येणाऱ्या ऑनलाइन लेक्चर्सला उपस्थिती लावण्यात स्वप्नालीला अनेक तांत्रिक अडचणींचा समाना करावा लागत होता. स्वप्नालीला लेक्चरला बसता यावे म्हणून तिच्या भावांनी घरापासून २ किलोमीटर अंतरावर तिला एका टेकडीवर छोटी शेड तयार करुन दिली. त्यामध्ये बसून स्वप्नाली अभ्यास करायची आणि ऑनलाइन लेक्चरला उपस्थित रहायची.

तिचा हाच फोटो व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक तसेच राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी स्वप्नालीच्या जिद्धीची आणि इच्छाशक्तीची कथा समोर आणली आणि याची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने घेतली. एका आठवड्यामध्येच भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान आणि भारत नेट खात्यामधील अधिकारी स्वप्नालीच्या गावी पोहचले. त्यांनी थेट ग्रामपंचायतीपासून स्वप्नालीच्या घरापर्यंत इंटरनेटचे कनेक्शन दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”