सांगली | सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कडक लॉकडाऊन लावला आहे. अशातच लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असतानाच मंगळवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट खेळणाऱ्यां युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. संचारबंदी लागू असताना ही मैदानावर एकत्रित येऊन खेळणाऱ्या 14 जणांवर कारवाई करत 7 हजारांचा दंड शहर पोलिसांनी वसूल केला आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. तरीही काही नागरिक कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर फिरताना आढळत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी सकाळी कृष्णा नदी काठी पोहायला जाणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता.
सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर काही मुले क्रिकेट खेळत असल्याची माहिती पोलिसांच्या कंट्रोल केबिनला मिळाली होती. त्यांनी तातडीने शहर पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर हे तातडीने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले. ग्राउंडवर क्रिकेट खेळणाऱ्या 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.