जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने बेपत्ता होण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली असून ती व्हॉट्सअॅपवर पोस्ट केली आहे. व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने आपला फोन बंद केला आणि तो बेपत्ता झाला. त्याने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या संपूर्ण घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
जालना जिल्ह्यातील सेवली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या उखळी गावात गावठी दारूच्या अड्ड्यावर कारवाई करण्यात आली होती. कारवाई एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची माहिती कोणी तरी दिली होती. यामुळे आरोपी आणि त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन या पोलीस कर्मचाऱ्यासोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली होती. एवढेच नाहीतर या लोकांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकीसुद्धा दिली होती.
यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलले असल्याचे समजत आहे. आपण प्रभारी अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, अशी चिट्ठी लिहून त्याने पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केली. सुसाईड नोट व्हॉट्सअॅपवर पोस्ट केल्यानंतर आपला मोबाइल बंद करून हा पोलीस कर्मचारी बेपत्ता झाला आहे. आपल्या मरणास संबंधित प्रभारी अधिकारी, आरोपी पती-पत्नी जबादार राहणार असून, त्याची सर्व माहिती माझ्या पत्नीस द्यावी असे त्याने त्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते.