हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलिस विभागात भरती होण्यासाठी अनेक तरुण सध्या प्रयत्न करत आहेत. मात्र, पोलिस भरतीचा पेपर फुटणार असल्याच्या चर्चा सध्या होत आहेत. त्यामुळे तरुणांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पेपर फुटीची पाळेमुळे माण तालुक्यापासून ते मंत्रालयापर्यंत असल्याचा दावा केला जात आहे. आता पेपर फुटल्यास मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी कमांडोने दिला आहे.
राज्य सरकारकडून पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. माण – खटावसारख्या भागात भरती इच्छुकांची संख्या मोठी आहे. बहुतेक सर्वच जिल्ह्यातील पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ते मुंबई शहर पोलिस भरतीकडे. तब्बल 7076 इतक्या जागा याठिकाणी उपलब्ध आहेत.
या जागांसाठी 5 लाखांपेक्षा जास्त जणांनी मैदानी चाचणी दिली होती. यातील जवळपास 80 हजार जण लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. 7 मे रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्यांना शोधून त्यांना पास करण्याचे आमिष दाखविणारी टोळी सध्या सक्रिय झाली आहे. माण, खटाव व फलटणमधील हे दलाल 8 लाख रुपये द्या व अंतिम प्रश्नपत्रिकेतील 98 गुणांचे प्रश्न मिळवा, अशी खुली ऑफर देत आहेत. ही ऑफर स्वीकारणाऱ्यांकडून प्रथम सर्व मूळ कागदपत्र ताब्यात घेण्यात येत आहेत. त्यानंतर परीक्षेपूर्वी शंभरपैकी 98 गुणांचे प्रश्न दिले जाण्याची हमी दिली जात आहे.