औरंगाबाद – औरंगाबाद-जालना महामार्गावर शेकटा परिसरात गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक काल दुपारी दीड वाजता पाठलाग करून पकडला. या कारवाईत तब्बल एक कोटी पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी पेक्षा जास्त रकमेचा गुटखा घेऊन एम.एच.04 जेके 3615 हा ट्रक अमरावतीहुन मुंबईकडे जात होता. चार दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे बदली होऊन हजर झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांना या बाबत खबऱ्यामार्फत गोपनीय माहिती मिळाली होती. करमाड पोलिसांच्या सहकाऱ्यांनी भवर यांनी या ट्रकचा फिल्मीस्टाईलने पाठलाग केला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद जालना महामार्गावर शेकटा येथून गोलटगाव फाट्याकडे येताना ट्रक पकडला. तपासणीत गाडीमध्ये 1 कोटी पेक्षा जास्त रकमेचा नजर नावाचा गुटखा असल्याचे निदर्शनास आले.
औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निमीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भवर यांनी ही कारवाई केली असून करमाड पोलीस ठाण्याचे पोनी राजेंद्र बोकडे, सापोनी प्रशांत पाटील, पोऊनी राजू नागलोत, पोऊपनी दादा बनसोडे, पोह गणेश मुळे, सुरेश सोनवणे, पोना सुनील गोरे दीपक सुरसे आदिंनी या कारवाईत सहकार्य केले.